आयुष्य सुंदर आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |

 

 
 
‘आयुष्य’ म्हणजे कठीण प्रसंगाचा एक गोफ... काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची एक झलक मिळावी म्हणून लोकांचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. अर्थात, सगळ्यांचे जीवन हे दु:खकष्टाने भरून राहिले आहे, असे म्हणता येणार नाही. पण, ज्यांनी दुर्दैवाने दु:ख खूप भोगले आहे, त्यांचा जीवनातील प्रवास मात्र खडतर झाला आहे. त्यांनाच ‘छोटेसे दिल में गम बहुत है। जिंदगी में मिले जख्म बहुत है।‘ याचा अनुभव सतत येत असतो.
 

आयुष्यात क्षणभराचा आनंद मिळविण्यासाठी असंख्य क्षणांचा मोबदला द्यायला लागतो. बर्‍याच वेळा आपल्या एका जगण्यात आपण खूप काही जगायचा प्रयत्न करत असतो. आपली खूप ध्येये असतात. आपली भरकटलेली नाती असतात. विखुरलेली स्वप्ने असतात. या सगळ्यांचा भावनिक भार आपल्याला सांभाळायला जमत नाही. मन विकल होते. हा सगळा निराशाजनक अनुभव हृदयाशी धरून चालायचे म्हटले, तर जीवन नको नकोसे वाटते. आपली सगळी स्वप्ने उद्धवस्त झालेली बघत जगणे दुरापास्त होते. आपल्यच श्वासांचा आपल्याला भार वाटतो आणि मग हे सगळे सोडून आयुष्य हलके करावसे वाटते. पण, कधी कधी जगण इतकं असह्य होते की, आयुष्यच आता नको असे वाटायला लागते. मृत्यूच जगण्यापेक्षा अधिक सोप्पा सहज वाटायला लागतो. सगळ्या समस्यांतून सुटण्यासाठी आयुष्यच संपवावं असे वाटायला लागते. आता आपण राहिलोच नाही, आयुष्यातील जटील प्रश्नांची उत्तरे शोधायचे कष्ट आपल्याला घ्यायला लागणारच नाहीत, असा काहीसा वेडा विचार आपल्या मनात भुंग्यासारख्या घोंगावायला लागतो. आता जरा हे सगळं मर्यादेपलीकडे गेले आहे असे वाटते. कुणाची मदत मागायची सवय नसली, तर मदत मागण्यापेक्षा आयुष्यच नकोसे वाटते. हताश वाटते. भविष्याबद्दल निराशा वाटते व आपल्याला संकटांशी व कठीण परिस्थितीशी दोन हात करायची ताकद उरली नाही, असे उगाचच वाटायला लागते. ही अशी निराशाजनक परिस्थिती अविचाराने भावूक होऊन विचार करणार्‍या लोकांची असते. हा आठवडा जगभरात असे आयुष्य अविवेकाने म्हणा किंवा मानसिक आरोग्यांच्या समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळे आत्महत्या करणार्या लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समर्पित केलेला आहे.

 

१० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसम्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. आयुष्य कठीण आहे. पण लक्षात ठेवायला पाहिजे की, कठीण काळ टिकत नाही; पण कठीण माणसे मात्र टिकतात. ज्या काही ‘कठीण’ कारणासाठी काही व्यक्तींना आत्महत्या करावीशी वाटते, त्याचा कठीण परिस्थितीला सामोरे जात असंख्य लोक या जगात धैर्याने जगत असतात. आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन आपल्या मर्यादा व कमतरता याबद्दलचे आपले नकारात्मक विचार यामुळे खरे तर आपले आयुष्य आपल्याला समस्यांनी भरलेले व त्रासदायक वाटते. आपण थोडा जास्त प्रयत्न करून आपली कठीण समस्या सोडवायचा प्रयत्न कधी केला आहे का? इतर कोणाचा सल्ला किंवा मदत घ्यायचा प्रयत्न का केला नाही? आयुष्यात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी दुर्दैवाच्या फेर्‍यातून बाहेर येऊन आयुष्याला दुसरी संधी कशी दिली. हे बघण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? आपण आपल्या आयुष्याबद्दल सकारात्मक होण्यासाठी प्रयत्न का करत नाही? या अशा जीवनाला जगण्यासाठी उत्तर देणार्‍या प्रश्नांकडे वळल्यास आयुष्याबद्दल इतके पराभूत वाटणार नाही. आयुष्य व आपला अनुभव या संकल्पना खर्‍या अर्थाने आपल्या जगण्याच्या फिलॉसॉफी’वर अवलंबून आहेत. आपली ‘फिलॉसॉफी’ आपणच बदलू शकतो. आपले आकाश आपणच ओळखू शकतो. आपल्याला किती उंच भरारी घ्यायची आहे, हे आपणच ठरवू शकतो.

 

कठीण परिस्थितीला सामोरे जाणारे आपण एकमेव नाही आहोत, इतकं समजलं तरी आपल्याला जगण्याची स्फूर्ती मिळेल. आयुष्यात आपण काहीतरी सुंदर आणि विधायक करू शकतो. या विचाराची ताकद अमर्याद आहे. शेवटी एक लक्षात घ्यायला पाहिजे की, निराशाजनक मन आशादायक जीवन जगू देत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारांचा कृतींचा व भावनांचा पाठपुरावाच केल्यास ‘आयुष्य सुंदर आहे,‘ हे कळायला क्षणसुद्धा लागत नाही. तेव्हा प्रसन्न राहायची सवय लावून घ्याच!

- डॉ. शुभांगी पारकर
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@