रवींद्र पवार यांचे निधन
महा एमटीबी   09-Aug-2018


 
 


मुंबई
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबई महानगर तसेच कोकण प्रांतामध्ये गेल्या चाळीस दशकांहून अधिक काळ स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणारे आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे रवींद्र तुकाराम पवार यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मुंबईतील प्रभादेवी येथील राहत्या घरी पवार यांचे निधन झाले. प्रारंभी रवींद्र पवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. त्यानंतर पवार १९७५ मध्ये आणीबाणीनंतरच्या कालखंडादरम्यान रा. स्व. संघाच्या मुंबई महानगराचे सहकार्यवाह होते. तसेच कोकण प्रांताच्या रचनानिर्मितीनंतर ते दीर्घकाळ प्रांत सहकार्यवाहपदी होते. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन मुली असा परिवार आहे. रवींद्र पवार यांच्या निधनामुळे संघ परिवारातून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.

 

कोणत्याही अडचणीतून अचूक मार्ग काढणारा कुशल कार्यकर्ता

 

रवींद्र पवार यांना गेली 20 वर्षे कार्यात सक्रियतेने काम करताना मी पाहिले आहे. तळमळीने, परिश्रमाने, प्राथमिकता देऊन प्रत्येक काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून अचूक मार्ग शोधून काढण्याची कुशलता त्यांचे पाशी होती. कामाचा कितीही ताण डोक्यावर असला, तरी तो जाणवू न देता भोवतालच्या कार्यकर्त्यांची सुख-दुःखे व गुण-विकास यांचे प्रतिसंवेदनशीलता ते जपत असत. अलीकडच्या काळात दीर्घ आजारपणातूनसुद्धा हिंमतीने त्यातून उठून उभे राहत पुन्हा पूर्वीसारखे झोकून देऊन त्यांची काम करण्याची उमेद ही तर सर्वांनाच परिचित असेल. त्यांचे सोडून जाणे सर्वांच्याच मनात वेदना व पोकळी उत्पन्न करून जाते. कोण कुणाचे सांत्वन करणार अशी स्थिती आहे. नियतीच्या निष्ठुरपणापुढे उपाय नाही. परिवारजनांना व आम्हा सर्वांना हा आघात सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, अशी प्रार्थना करीत मी रवींद्र पवार यांच्या स्मृतीला माझी व्यक्तिगत आणि रा.स्व.संघातर्फे श्रद्धांजली वाहत आहे.

-डॉ. मोहनजी भागवत,

सरसंघचालक