अपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले
महा एमटीबी   09-Aug-2018नवी दिल्‍ली : राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार हरिवंश नारायणसिंह विजयी झाले. सिंह यांनी संपुआचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव करत, विरोधी पक्षांच्या तथाकथित आघाडीच्या ऐक्याचा फुगा फोडला. हरिवंश नारायणसिंह यांच्या विजयाने रालोआचे मनोबल उंचावले असून विरोधी पक्षांना मोठा धक्‍का बसला आहे.

 

भाजपने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जदयुचे हरिवंश नारायणसिंह यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना संपुआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. हरिवंश नारायणसिंह यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपचे अमित शाह, जदयुचे आरसीपी सिंह, शिवसेनेचे संजय राऊत आणि अकाली दलाचे सुखदेवसिंह धिंडसा यांनी मांडला. बी. के. हरिप्रसाद यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसचे भुवनेश्‍वर कलिता, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, सपचे रामगोपाल यादव आणि राजदच्या मिसा भारती यांनी सादर केला. हरिवंश नारायणसिंह यांना १२५ , तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. दोन सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. राज्यसभेची सदस्यसंख्या २४४ आहे. सभागृहात सर्व सदस्य उपस्थित असते तर विजयासाठी १२३ मतांची गरज होती. मात्र मतदानाच्या वेळी सभागृहात २३२ सदस्यच उपस्थित होते. त्यामुळे विजयासाठी ११७ मतांची आवश्यकता होती.

 

राज्यसभेतील रालोआ बहुमतात!

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जदयुचे हरिवंश नारायणसिंह यांच्या विजयामुळे आता राज्यसभेतही रालोआने आपले बहुमत सिद्ध केले आहे. आतापर्यंत राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे बहुमत होते, तर भाजपच्या नेतृत्वातील रालोआ अल्पमतात होती. राज्यसभेत रालोआजवळ ९१ सदस्य होते. अपक्ष अमरसिंह आणि तीन नामनियुक्‍त सदस्यांनीही भाजपच्या बाजूने मतदान केले. यामुळे भाजपचे संख्याबळ ९५ झाले.