करूणानिधी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी - मुख्यमंत्री
महा एमटीबी   08-Aug-2018
 
 
 
 
मुंबई :  तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
 
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देशाच्या राजकारणात एक वरिष्ठ नेते असलेल्या करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. अतिशय लोकप्रिय नेते असलेल्या करूणानिधी यांचे तामिळनाडूच्या विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान राहिले आहे. सिद्धहस्त लेखक आणि प्रभावी वक्ते असलेल्या करूणानिधींचा सामाजिक सुधारणा हा विशेष आस्थेचा विषय होता. पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या करूणानिधींची तामिळनाडूसोबतच देशाच्या राजकारणातही नेहमीच महत्त्वाची भूमिका होती. तामिळनाडूचा राजकीय इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
 
 
 
 
काही काळ तामिळनाडूचे राज्यपाल राहिलेले, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी देखील द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 
 
 
करुणानिधी हे तमिळनाडूचे अतिशय लोकप्रिय आणि करिष्मा लाभलेले नेते होते. राजकारणातील भीष्माचार्य असलेल्या करुणानिधी यांचा अखेरपर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव होता. ‘कलाईनार’ या नावाने लोकप्रिय असलेल्या करुणानिधी यांना गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत आस्था होती. पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेल्या करुणानिधी यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. प्रतिभा संपन्न असलेले करुणानिधी लेखक, पटकथालेखक, साहित्यिक म्हणून देखील लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने तामिळनाडूच्या जनतेने ‘गरीबांचा मसीहा’ गमावला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तामिळनाडूच्या जनतेला आणि त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवीत आहे, असे विद्यासागर राव यांनी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.