आयुष्य खूप काही शिकवते...
महा एमटीबी   07-Aug-2018


 


तेलंगणातल्या शेतमजुराचा मुलगा डॉ. व्ही. गोपाल मुंबई शहरात वैद्यकीय माध्यमातून जनसेवा करत आहे. कधीकाळी रा. स्व. संघाशी त्याचा संपर्क आला. त्या संपर्काचा धागा त्यांनी आजही जपून ठेवला आहे.

 

व्ही. गोपाल यांचा दवाखाना सकाळी दहा वाजता उघडणार आणि रात्री अकरा वाजता बंद होणार. गेली ३० वर्षे यात खंड पडलेला नाही. सण-उत्सव, दंगल, बंद काहीही होवो, डॉ. व्ही. गोपाल यांचा दवाखाना कधीच बंद नसतो. पण, त्यादिवशी त्यांचा दवाखाना चक्क दोन तास बंद होता. कारण, रा. स्व. संघाचे वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय स्तरावरचे सोमायाजलू मुंबईत आले होते. लहान मुलांच्या उत्साहात ते सोमायाजलूंना भेटायला गेले होते. तो एकच दिवस त्यांचा ३० वर्षांमधील ‘स्वत:चा’ म्हणावा लागेल. ही निष्ठा, हे संस्कार डॉ. गोपाल यांनी स्वत:पुरते न ठेवता समाजात पेरायचे काम केले आहे.

 

डॉ. गोपाल हे मूळचे तेलंगणच्या एका खेडेगावातले. त्यांच्या लहानपणी एकदा त्यांची आई आजारी पडली. गावात एकमेव असलेल्या कामचलाऊ डॉक्टरने आईचा उपचार चुकीचा केला. तिची तब्येत आणखीन बिघडली. गावात आणि पंचक्रोशीत एकतरी चांगला डॉक्टर असता, तर आईला इतका त्रास झाला नसता. ही घटना गोपालच्या मनावर ठसली आणि आपण मोठेपणी डॉक्टर बनावे, असे त्यांनी मनोमन ठरवले. गोपाल सरकारी शाळेत शिकू लागला. शाळा म्हणजे झाडाखाली पाथऱ्या टाकायच्या. सगळ्या विषयांना एकच शिक्षक. पाऊस पडला, ऊन जास्त झाले, तर शाळेला आपोआप सुट्टी. गोपालचे वडील जमीनदाराकडे शेतमजुरी करत. एकेदिवशी गोपाल वडिलांसोबत जात असताना जमीनदाराने अडवले आणि तुच्छतेने म्हणाला, ‘‘तुला मुलाला शिकवून काय करायचे? शिकला तर शहरात पळेल.’’ जमीनदाराच्यापुढे मान तुकवून उभे राहणे, हाच गावाचा नियम असल्याने गोपाळचे वडीलही शांत उभे होते. त्यानंतर गोपाळने ठरवले की, आता मात्र आपण शिकायचेच. सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे, चालत यायचे. घरची आर्थिक सुबत्ता नव्हतीच. एक शिसपेन्सील शेवटचे अक्षर लिहिपर्यंत वापरावी लागायची. पुढे बारावीच्या चांगल्या उत्तीर्ण गुणांमुळे त्यांना मेडिकलला प्रवेश मिळाला. त्यात ऐंशीच्या दशकातही हैद्राबादमध्ये मुस्लिमांचे वर्चस्वच. डॉ. गोपाळ म्हणतात, ‘‘अशा वातावरणात कॉलेजच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंकली. परिषदेचा कार्यकर्ता बापूरेड्डी जिंकून आला. मी गावाहून आलेला. मनात कायम धाकधूक की, इथे एकटे आहोत. कसे होणार? पण, प्रकाशने संपर्क साधत मला धीर दिला. इतकेच नव्हे, तर त्याने मला रेड्डी वसतिगृहात राहण्यासाठी मदत केली.’’

 

तिथूनच गोपाळ यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. त्या वसतिगृहावर दररोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरायची. तिथे सोमायाजलू नावाचे स्वयंसेवक यायचे. मैदानी खेळ, बौद्धिक यांच्यामुळे गोपाळ यांच्या मनोवृत्तीत खूपच बदल झाला. शिकायचे फक्त कुटुंबासाठी नाही, तर समाजासाठी. आपली छोटीशी कृतीही समाजाच्या आणि पर्यायाने देशहिताची असली पाहिजे, हा विचार गोपाळ यांच्या मनात पेरला गेला.

 

डॉक्टरी शिक्षण पूर्ण झाल्यावर गोपाळ गावी परतले. गावात खूपच चांगल्या डॉक्टरांचे दवाखाने सुरू होते. डॉ. गोपाळ मुंबईला आले. त्यांनी विक्रोळीला दवाखाना उघडला. बघता बघता डॉ. गोपाळ यांचा दवाखाना समाजकेंद्रच बनला. राजकीय नेते, कार्यकर्ते, समाजकार्यकर्ते, विविध क्षेत्रात उच्च-कनिष्ठ स्तरावर काम करणारे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. डॉ. गोपाल त्यांना विविध विषयांवर सल्ला देऊ लागले. गरजूंना प्रत्येक आघाड्यांवर मदत करू लागले. ‘नाही रे’ गटातल्या जगण्याला ‘आहे रे’चे परिमाण देणे सोपे असते. पण, त्या ‘आहे रे’ गटामध्ये परिघाबाहेरच्यांना सामावण्याचा प्रयत्न डॉ. गोपाल करत आहेत.

 

विक्रोळीतल्या समस्त डॉक्टरांची एक संघटना आहे. ‘विक्रोळी मेडिकल असोसिएशन’ या संघटनेचे ते सेक्रेटरी आहेत. या असोसिएशनद्वारे डॉक्टरी पेशात नित्यनव्याने होणाऱ्या बदलांबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल अभ्यासवर्ग आयोजन केले जाते. गरीब रुग्णांना अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी त्यांनी एक संस्था निर्माण केली, आर. आर. फाऊंडेशन. घरच्या आघाडीवरही गोपाळ मागे नाहीत. दहावी पास होऊन लग्न करून आलेल्या त्यांच्या पत्नीचे शिक्षण त्यांनी पुन्हा सुरू केले. त्यांची पत्नी आज मुंबई उच्च न्यायालयात वकील आहे. पत्नीला शिकवू नये, म्हणून डॉ. गोपाळच्या आणि पत्नीच्या नातेवाईकांनीही आकाशपाताळ एक केले. पण, डॉक्टरांनी ऐकले नाही. ते म्हणतात, ‘‘आजही ‘डॉक्टरांची पत्नी डॉक्टर’ असे म्हणतात. का? त्या स्त्रीला स्वत:ची ओळख असायला हवीच ना? म्हणून पत्नीने शिकावे, असे मला वाटले. तिनेही मेहनत केली.’’

 

डॉ. गोपाळ यांचे माणूसपण वेगळे वाटते. लहानपण तरुणपण अभावातच गेले. पण, त्याबद्दल कोणताही आक्रोश विद्रोह त्यांच्यात नाही. उलट गावामध्ये ‘आहे रे’ व ‘नाही रे’ तणावामुळे मार्क्सवाद चळवळ फोफावत असताना डॉ. गोपाळ यांनी कष्ट व मेहनतीचा पर्याय स्वीकारला. रा. स्व. संघाच्या विचारधारेशी आलेला संपर्क हा त्यांनी संपर्काबाहेर राहूनही कायम जपला. तुमच्या कामाची प्रेरणा काय, असे विचारल्यावर गोपाळ म्हणतात, ‘‘प्रतिकूल परिस्थितीतला संघर्ष आयुष्यात खूप काही शिकवतो.’’