स्वातंत्र्यदिना दिवशीचा घातपाताचा डाव उधळला
महा एमटीबी   06-Aug-2018

जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक

दिल्लीत घातपात करण्याचा होता डाव

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यामधून एका दहशतवाद्याला काल रात्री अटक केली असून स्वातंत्र्यदिना दिवशी राजधानीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना या दहशतवाद्याकडून मिळाली आहे. या दहशतवाद्याकडून पोलिसांनी ८ ग्रेनेड जप्त केले आहे. तसेच दिल्ली पोलिसांना देखील सतर्क राहण्याचा इशारा जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिला आहे.


जम्मू-काश्मीर पोलीस अधिकारी एस.डी.सिंग जमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड्यातील गांधीनगर येथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडून एकूण ८ ग्रेनेड जप्त करण्यात आले असून याविषयी विचारणा केली असता, हे सर्व ग्रेनेड तो दिल्लीतील एका व्यक्तीला देणार होता, असे त्याने सांगितले. तसेच हे सर्व ग्रेनेड नवी दिल्लीत स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वापरले जाणार होते, असे देखील त्याने सांगितले आहे. दरम्यान या माहितीनंतर दिल्ली पोलिसांना याविषयी तत्काळ सूचना देण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील त्या संबंधित व्यक्तीच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची देखील चौकशी केली जात आहे, असे सिंग यांनी सांगितले आहे.