गाईच्या शेणापासून कपडे...
महा एमटीबी   06-Aug-2018


 


नेदरलँडमधील एका स्टार्टअप कंपनीने गायीच्या शेणापासून ड्रेस बनवायला सुरु केली आहे. आज जगाच्या पाठीवर अनेक शोध लागत आहेत. यातील हा शोध क्रांतिकारी म्हणायला हवा कारण गोवंश, गोरक्षण, गोहत्या अशा विविध मुद्यांवरून भारतात मोठा वादंग उठला असल्याने यावर ही चपराकच म्हणायला हवी.

 

भारतीय संस्कृतीत गाय व गोवंश यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच तर आपण तिला ‘गोमाता’ असे म्हणतो. कारण प्राचीन काळापासून भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा समजली जाते. गाईपासून शेण, दूध, गोमूत्र, तूप, दही, ताक, लोणी अशा बहुमूल्य गोष्टी मिळतात. या सर्व गोष्टींना प्राचीन काळापासून आयुर्वेद व मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे. गायीपासून मिळणारे शेण अनेक दृष्टीने मानव जातीसाठी फायदेशीर असते. शेतीसाठी खत, गोबर, कीटकनाशक, आयुर्वेद, अशा विविध प्रकारे आपण गायीच्या शेणाचा दैनंदिन जीवनात उपयोग करत असतो. पण, शेणापासून कपडे बनविल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? गाईच्या शेणाला अमृत मानणाऱ्या आपल्या देशात हा नक्कीच आश्चर्याचा धक्का असणार आहे. परंतु, खरंच नेदरलँडमधील एका स्टार्टअप कंपनीने गायीच्या शेणापासून ड्रेस बनवायला सुरु केले आहे. आज जगाच्या पाठीवर अनेक शोध लागत आहेत. यातील हा शोध क्रांतिकारी म्हणायला हवा कारण गोवंश, गोरक्षण, गोहत्या अशा विविध मुद्यांवरून भारतात मोठा वादंग उठला असल्याने यावर ही चपराकच म्हणायला हवी.

 
 
 

गाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस बनविण्याचे तंत्र विकसित करणारा नेदरलँडमधील हा स्टार्टअप बायोआर्ड लॅबच्या जलिला एसाईदी या महिलेने सुरु केला आहे. यामध्ये गाईच्या शेणापासून सेल्युलोज वेगळा करून यापासून कपडा तयार केला जातो. या कापडाला ‘मेस्टिक’ असे नाव देण्यात आले आहे. याच स्टार्टअपने शेणातून सेल्युलोज वेगळा करून बायो-डीग्रेडेबल प्लास्टिक आणि पेपर बनवण्यातही यश मिळवले आहे. कंपनीने विकसित केलेल्या कापडापासून बनवलेल्या शर्ट आणि टॉप यांची विक्री देखील सुरू केली आहे. ग्राहकांमध्ये मोठी मागणी वाढत आहे. या यशस्वी स्टार्टअपबद्दल व संशोधनाबद्दल इसाइदी यांना चीवज वेंचर अॅन्ड एचअॅन्डएम फाउंडेशनकडून ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले असून त्यांना १.४० कोटी रुपयांचा पुरस्कारही मिळाला आहे.

 

 
 

जगभरात कापड तयार करण्यासाठी सामान्यतः कापसाचा उपयोग केला जातो. कापसापासून सामान्य कपडा तयार करण्यासाठी त्यावर घातक तेलांची प्रक्रिया केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा नष्ट होते तसेच याचा निसर्गावरदेखील परिणाम होताना दिसून आला आहे. परंतु, गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या कपड्यासाठी फायबर बनण्याची प्रक्रिया गायीच्या पोटातुनच सुरू होत असते. यातून मिळणारे सेल्युलोज उच्च दर्जाचे असते, असे संशोधनातून सुद्धा सिद्ध झाले आहे. यामुळे या प्रक्रियेतून ऊर्जेची बचत तर होऊच शकते मात्र त्याच बरोबर निसर्गाचे सरंक्षण सुद्धा होऊ शकते. एसाइदी सध्या येथील १५ शेतकऱ्यांच्या मदतीने या प्रोजेक्टवर काम करत आहेत. लवकरच त्या मॅन्योर रिफायनरी युनिटला औद्योगिक स्तरावर लाँच करणार आहेत. यामुळे वस्त्रउद्योगात मोठी क्रांती घडू शकते आणि कापड बनवण्यासाठी कापसाला पर्याय मिळू शकतो.

 

एसाइदी या संशोधांविषयी म्हणाल्या, आपण शेणाला वेस्ट मटेरियल आणि दुर्गंधीयुक्त समजतो. मात्र प्रत्यक्षात कापड बनविण्याच्या इतर पद्धतीत सुरुवातीला वापरण्यात येणारे तेलही चांगले नसते. आम्ही शेणात लपलेले सौंदर्य जगाला दाखवत असून पहिल्या टप्प्यात आम्ही कापड बनवले आहे. आता कपड्यांचे पुढील भविष्य हेच असणार आहे.