इंडोनेशियामध्ये भूकंप, ८२ नागरिकांचा मृत्यू
महा एमटीबी   06-Aug-2018लोमबोक : इंडोनेशियामधील लोमबोक या बेटाला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपामध्ये आतापर्यंत ८२ नागरिकांचा मृत्यू झाला असून २००० हजाराहून अधिक नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तसेच अद्याप अनेक नागरिक हे बेपत्ता असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे कार्य इंडोनेशिया सरकारकडून सुरु करण्यात आले आहे.


इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या पुर्वेला असलेल्या लोमबोक बेटामध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा तीव्र झटका बसला. या भूकंपाचा केंद्र बिंदू हा लोमबोकमध्येच असून त्याची तीव्रता ७ रिश्टर इतकी मोजण्यात आली आहे. त्यामुळे बेटावरील मोठा प्रदेश यामुळे उद्धवस्त झाला आहे. अनेक ठिकाणी घरे जमीनदोस्त झाले असून रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा देखील यामुळे नष्ट झाल्या आहेत. दरम्यान या भूकंपामुळे समुद्रकिनारी उंच लाटा उसळ्याचे देखील वृत्त समोर आले आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.दरम्यान इंडोनेशिया सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांना कामाला लावले आहे. विस्थापित नागरिकांसाठी शिबिरे उभारणे, बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्याच बरोबर याठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील विशेष प्रयत्न केला जात आहेत.