रुपेरी सिंधूचं 'सुवर्णा'च स्वप्न भंग
महा एमटीबी   05-Aug-2018

डब्ल्यूबीसीच्या अंतिम सामन्यात कॅरोलिन मरिनकडून सिंधूचा पराभव
नानजिंग : चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०१८ च्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधू हिला परभभवाचा सामना करावा लागला आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सिंधूवर २१-१९, २१-१० असा सहज विजय मिळवला असून स्पर्धेमध्ये यंदा सिंधूला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.

खेळाच्या सुरुवातीपासून सिंधूने आपल्या नेहमीच्या आक्रमक खेळीचा वापर करत पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्या सेटमध्ये सिंधूने प्रथम १४-९ अशी आघाडी घेतली होती. परंतु मरिनने देखील आपल्या अनुभवी खेळीची झलक दाखवत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरीनने देखील सिंधुवर मात करत झटपट ६ गुण मिळवले व सिंधूशी १५-१५ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही एकमेकांच्या आक्रमनांना प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा १८-१८ अशी बरोबरी साधली. मात्र, त्यापुढे मरिनने आपले वर्चस्व राखत पहिला सेट २१-१९ अशा गुणांनी जिंकला. यानंतरच्या दुसऱ्या सेटमध्ये देखील मरिनने आपले वर्चस्व कायम राखत सिंधुवर २१-१० अशी सहज मात केली.

दरम्यान सिंधूला या अगोदर देखील या स्पर्धेतील सुवर्णपदकाने दोन वेळा हुलकावणी दिलेली आहे. सिंधूने गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी २०१३ आणि २०१४ या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाचा पराभव हा तिच्यासाठी थोडा जड जाणार असल्याचे दिसत आहे.