कोहली इज 'बेस्ट'
महा एमटीबी   05-Aug-2018

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वलस्थानी भारत-इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या झुंजार शतकी खेळीचा परिणाम आता आयसीसीच्या क्रमवारी देखील झाला आहे. विराटच्या दमदार शतकी खेळीमुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा सध्या पहिल्या क्रमांकावर आला असून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ याला देखील त्यांने मागे टाकले आहे. विराटच्या या कामगिरीमुळे सध्या सर्व स्तरातूनच त्याचे कौतुक केले जात आहे.

आयसीसीने नुकतीच आपली ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कसोटी क्रमवारीतील उत्तम फलंदाजाचा यादीमध्ये विराटला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले असून सचिन तेंडूलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान आपल्या कामगिरीमुळे त्याने स्मिथ देखील मागे टाकले आहे. स्मिथच्या खात्यात सध्या ९२९ गुण असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर इंग्लंडचा जोई रूट हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गेल्या गुरुवारी भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यामध्ये कोहलीने सर्वात तळातल्या खेळाडूच्या सोबतीने इंग्लंडविरोधात १४९ धावांची खेळी केली होती. भारताने हा कसोटी सामना जरा गमावला असला तरी देखील कोहलीच्या या खेळामुळे त्याने सर्वांचीच मने जिंकली होती. तसेच यामुळे इंग्लंडकडे फक्त १३ धावांचीच आघाडी राहिली होती. विशेष म्हणजे कसोटी क्रमवारीमध्ये भारताकडून आतापर्यंत सुनील गावस्कर, दिलीप वेंगसकर, गौतम गंभीर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकर या खेळाडूंनाच कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठता आले आहे.