आता जबाबदारी नेत्यांचीच...!
महा एमटीबी   05-Aug-2018

 
 
 
 
 
 
आषाढी एकादशीचे पर्व! माऊलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्यांच्या पालख्या नि त्या सोबत पायी निघालेले शिस्तप्रिय वारकरी, हे बघितल्यानंतर आजही विठूमाऊलीच्या भक्तांची गिणती शब्दात करता येणार नाही. हा सोहळा आणि हे दृश्यच शब्दांच्या पलीकडलं आहे. वंशपरंपरागत तुळशीमाळ आजही भक्तांच्या गळ्यात आहे. आजही देवाचा महिमा, भक्ती, श्रद्धा, विश्वास आहे. हा मनोहारी सोहळा बघून खरंच मनाला आनंद होतो.
 
 
खरे तर विठूमाऊली कोण्या एका जातीची, एका पंथाची नाही, तर ती दीन-दुबळ्यांची, वंचितांची माय आहे. म्हणूनच तिचे भक्त सर्वत्र आढळतात. आज संतांची आणि भक्तांची ओळख विठूमाऊलीच्या नावातून होतेय् आणि या सार्यातून संपूर्ण जगाला भक्तिमार्गाचा संदेश मिळतोय्.
 
 
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या नावातच मोक्षाचा मार्ग आपल्याला दिसतो. एवढेच नव्हे, तर माऊलीच्या भजनात रंगलेल्या जनाबाई, सावतामाळी, गोराकुंभार, चोखामेळा, नरहरी अशा अनेक भक्तांच्या मदतीला माऊली धावत जायची, हेही आपल्याला माहिती आहे.
 
 
विठूमाऊलीच्या भजनात, नामाच्या गजरात ही शिस्तबद्ध वारकरी दिंडी पाहिली, की उर भरून येतो. हा कौतुकास्पद सोहळा असतो. पंढरीला जाणार्या या वारकरी मंडळीत माऊलीवर प्रेम करणारा शेतकरी वर्गच अधिक असतो. यावर्षी 15 लाख वारकरी असतानाही शिस्तबद्ध सोहळा पार पडला आणि कसलाही गोंधळ, चेंगराचेंगरी झाली नाही. सारं काही अगदी शिस्तबद्ध!
यावर्षी पंढरपूरच्या संस्थेनी वारकर्यांची आजपर्यंत कधी नाही, इतकी मोठी व्यवस्था केली होती. वारकर्यांना रांगेतच पाण्याच्या बिसलरी, वेफर्स, खाण्याचे पदार्थ दिले गेले. इतकेच नव्हे, तर तळपायांना इजा होऊ नये म्हणून आठ किलोमीटरचे लाल कारपेट या दर्शनमार्गावर अंथरले होते.
 
 
आजपर्यंत केवळ नेत्यांसाठी, श्रीमंतांसाठी लाल कारपेट टाकले जायचे. पण यावर्षी पहिल्यांदाच माऊलीच्या सामान्य भक्तांसाठी कारपेट अंथरले गेले. वारकर्यांमध्ये विठूमाऊलीच्या भक्तांना एकच ध्यास, एकच निर्धार ‘माऊलीचे मुखदर्शन!’ कारण ते झाले किंवा कळस दर्शन घेतले की वारी पूर्ण होते व वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. या वारकर्यांच्या गर्दीचा वापर आरक्षणाच्या आंदोलनाकरिता करणे बरोबर वाटत नाही. विठू माऊली कुण्या एका जातीची नाही. ती त्याच्यावर निस्सीम भक्ती करणार्या भक्तांची आहे. तिच्या पूजेला मुख्यमंत्र्यांना अडविणे, हे मनाला पटत नाही. मुख्यमंत्र्याच्या मूळ मुक्कामी त्यांच्या घरी श्रीविठ्ठल- रुख्माईचे मंदिर असून वंशपरंपरागत पूजा होते. इतकंच नाही, तर भजन-कीर्तन होते. महाप्रसाद होतो. त्यामुळे विठूमाऊलीची मनोभावे कुठेही पूजा केली, तरी ती भक्तांना पावते, हे त्यांना माहीत आहे. वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. परंतु, या आंदोलनाला लागलेले वळण किती भयानक होते. मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. न्याय्य मार्गाने आपली मागणी मांडणे, हे लोकशाहीत योग्यच आहे. परंतु, देशाच्या-शासनाच्या संपत्तीचे नुकसान करणे म्हणजे पर्यायाने जनतेच्या पैशाचे नुकसान करणे, कितपत योग्य आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. बसेस फोडणे-जाळणे, प्रवासी बसलेल्या बसला प्रवाशांसहीत आग लावणे, टायर जाळून रस्ते अडविणे, नागरिकांना त्रास देणे, गोटमार करून पोलिसांना जखमी करणे, हे लोकशाहीचे प्रतीक नाही. हिंसा ही आंदोलनाचा भाग होऊ शकत नाही. ज्या बसला पेटविले, त्यात शाळकरी मुले व प्रवासी होते. ही हिंसा नव्हे काय? ही क्रूरता नव्हे काय? आंदोलकांनी त्यावेळी अविचारी कृत्य केले, त्यामुळे आंदोलकांबद्दलची सहानुभूती तेव्हाच संपली.
 
 
फायर ब्रिगेडची गाडी जाळणे, खाजगी गाड्या जाळणे, सर्वत्र आगी लावण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व आंदोलकांचे नेते थांबवू शकले असते. परंतु, आंदोलक त्यांच्या हाताबाहेर गेल्याचेच दृष्य दिसत होते. दुकानांवर गोटमार, भाजी विक्रेत्यांच्या भाज्या फेकणे, टी-स्टॉल उलटविणे, सामानाची नासधूस करणे, गरिबांचे नुकसान करणे, यात आंदोलकांना प्रसिद्धी मिळते. टीव्ही, वृत्तपत्रात नावे येतात. परंतु, जनतेला त्रास होतो, विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होतात, तेव्हा अशा वेळी आपण जनतेची सहानुभूती गमावतो.
 
 
शेतकर्यांसाठी आंदोलन होते. त्यावेळी त्यांच्याच मेहनतीच्या वस्तूंची नासाडी करणे, दूध रस्त्यावर ओतणे, टँकर जाळणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे, मोटर सायकली जाळणे हा सर्व प्रकार बघितला, तर असं वाटलं, की खरंच शेतकरी स्वत: उत्पादन केलेल्या, मेहनतीने पिकविलेल्या वस्तूंचे नुकसान करणार नाही. मग प्रश्न पडला की, या मागे कोण ? याचाही विचार होणे आज गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून या अशा आंदोलनाला उत आलेला आहे. ही नासधूस, ही जाळपोळ, हे नुकसान टाळले पाहिजे.
     
 
मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे, हे माहीत असूनही, समजून-उमजूनही ‘आरक्षणाची ताबडतोब घोषणा करा,’ म्हणणं हे कितपत योग्य आहे? मेगा भरतीत मराठ्यांच्या हक्काचा 16 टक्के जागा न भरण्याचा निर्णय व उर्वरित जागा भरण्याचा घेतलेला शासनाचा निर्णय हा मराठ्यांच्या फायद्याचा असताना इतर समाजावर अन्याय का? अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटक्या जमाती आणि इतर सगळ्याच बेरोजगारांचा प्रश्न यातून काही प्रमाणात सुटणार! असे असताना मेगा भरतीला विरोध का? यातून आंदोलनाला जनतेची कोणती आणि कशी सहानुभूती मिळणार? मग हा अट्टहास का? केवळ असंतोष निर्माण करणे हाच उद्देश असावा, असे वाटते.
   
 
 
आजपर्यंत महाराष्ट्रात शरद पवारांसह 11 मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी साधे मराठा मुलांसाठी वसतिगृह बांधले नाही. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. आरक्षणाची मागणी त्याही वेळी होती, ती साधी चर्चेलाही घेतली नाही. तेव्हा कोणी असे आंदोलन केले नाही? मग आज हे सरकार पूर्णपणे तुम्हाला मदत करीत असताना, हिंसक आंदोलन कशासाठी? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. या शासनानी घेतलेले निर्णय हे लोकपसंतीला उतरलेले आहे. शेतकर्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील किंवा इतर बारा बलुतेदारांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, आता मेगा भरतीचे बेरोजगारांचे प्रश्न असतील या शासनाने लिलया सोडविलेले आहे. असे असतानाही वारंवार कुठले ना कुठले आंदोलन करून शासनाला काम करण्यास अडथळे निर्माण करणे योग्य नाही.
जलसमाधी घेण्याची घोषणा नेत्यांनी करणे किती घातक आहे. त्यातून खरं तर काकासाहेब शिंदेंचा मृत्यू होणे, ही दुदैवी घटना आहे. नेत्यांनी घोषणा करीत असताना पूर्ण विचार करणे गरजेचे आहे.
 
 
अंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सकल मराठा समाजाने आंदोलन मागे घेऊनही हिंसा, जाळपोळ थांबली नाही. तेव्हा मराठा समाजाच्या नेत्यांनी पोलिसांना विनंती केली की, आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे. तरी सुद्धा दगडफेक, जाळपोळ सुरू आहे. यात जे समाजकंटक आहेत, त्यांच्यावर कारवाई करा! आता आंदोलन आटोक्याबाहेर गेलं आहे. त्याची जबाबदारी कुणाची? याचाही विचार करण्याची गरज आहे.
 
 
आता सर्वच नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजयिंसह मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नरसय्या आडम आणखी इतर निरनिराळ्या नेत्यांनी हिंसक आंदोलनाचा निषेध केला व शांततेनी आंदोलन करण्याबाबत विचार व्यक्त केला. तरी, हे आंदोलन आटोक्यात येत नसेल, तर नेत्यांनीच पुढाकार घेऊन आंदोलकांना नियंत्रणात आणणे, आज तरी काळाची गरज आहे. हे झाले नाही, तर नुकसान तुमचेच होणार आहे.
 
 
 
शोभा फडणवीस 
9422135500