कलम ३५ अ आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महा एमटीबी   31-Aug-2018


नवी दिल्ली : देशभरात सध्या प्रमुख चर्चाचा मुद्दा बनलेल्या जम्मू-काश्मीरच्या कलम ३५ अ संबंधीच्या सुनावणीला आज पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. कलम ३५ अ वर सुनावणी होऊ नये, यासाठी म्हणून राज्यातील फुटीरतावादी नेत्यांनी खोऱ्यातील वातावरण अत्यंत दुषित केले आहे. या सुनावणी विरोधात अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने करत काश्मिरी नागरिकांनी या सुनावणीला जोरदार विरोध करावा, असे आवाहन खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला देखील या प्रकरणी सुनावणी करण्यात आली होती. यावेळी खंडपीठाचे एक सदस्य न्यायाधीश अनुपस्थित असल्यामुळे यावरील सुनावणी टाळण्यात आली होती. तसेच हे प्रकरण संविधानिक पीठाकडे सुपूर्द करण्याविषयी देखील न्यायालयाने आपले मत स्पष्ट केले होते. त्यामुळे आज सुनावणीमध्ये याविषयी देखील निर्णय देण्यात येण्याची शक्यता आहे.


काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणाऱ्याकलम ३७० आणि ३५ अ ला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विरोध होत आहे. या कलमानुसार जम्मू-काश्मीर वगळता देशातील इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांना काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली. हे कलम बेकायदेशीर असून यामुळे काश्मीर भारताच्या इतर भागापासून दुरावला जाईल, असे मत अनेकांनी वेळोवेळी व्यक्त केले होते. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. परंतु काश्मीरचा आणि तेथील पर्यटन व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी हे कलम रद्द करण्यात यावे, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे.