प्रा. चंद्रदेव कवडे यांची जागतिक हिंदी संमेलनासाठी निवड
महा एमटीबी   03-Aug-2018
 
 
 
नवी दिल्ली : हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष तथा मूळचे महाराष्ट्रातील असलेले प्रा. चंद्रदेव कवडे यांची मॉरीशस येथील ११ व्या जागतिक हिंदी संमेलनासाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये निवड झाली आहे. मॉरीशस मध्ये दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०१८ या कालावधी दरम्यान ११ वे जागतिक हिंदी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमलेनासाठी भारतातून जाणा-या शासकीय शिष्टमंडळामध्ये प्रा. चंद्रदेव कवडे यांची निवड करण्यात आली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यांची निवड केली आहे.
 
 
मुळचे उस्मानाबाद जिल्हयातील वाशी येथील प्रा. कवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेटची पदवी मिळविली असून ४० विद्यार्थ्यांनी एम.फील. केले आहे. प्रा. कवडे हे २००३ पासून हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत.