डीआरडीओकडून एएडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
महा एमटीबी   03-Aug-2018बालेश्वर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. भारताच्या अवकाश सीमांच्या रक्षणासाठी डीआरडीओने अॅडव्हान्स एअर डिफेन्स यंत्रणा विकसित केली असून या यंत्रणेची यशस्वी चाचणी देखील डीआरडीओने केली आहे. त्यामुळे भारतावर होणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी भारतीय संरक्षण दले आता आणखी सक्षम झाले आहेत.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयी माहिती दिली असून ओडीसातील बालेश्वर येथे ही चाचणी घेतली गेली आहे. बालेश्वरजवळील ए.पी.जे.अब्दुल कलाम या बेटावरून एएडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने समोरून येणाऱ्या लक्षावर मारा केला. बेटापासून २५ किमी अंतरावरच त्याने आपल्याकडे येणाऱ्या लक्षाचा अचूक वेध घेतला. यामुळे क्षेपणास्त्राचा वेग आणि अचूक लक्ष्यभेद करण्याची त्याची क्षमता सिद्ध झाली आहे. दरम्यान या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर सर्व स्तरातून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे.