सुवर्णपदकासाठी मनजीतला कारावा लागला ‘हा’ त्याग
महा एमटीबी   29-Aug-2018


 

हरियाणा : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला धावपटू मनजीत सिंह चहलवर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ८०० मीटर शर्यतीत मनजीतने भारताला सुवर्ण मिळवून दिले. पण हे सुवर्ण मिळविण्यासाठी मनजीतने मोठा त्याग केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनजीत आशियाई स्पर्धेसाठी मेहनत घेत होता. या दरम्यान मनजीतला त्याच्या मुलाच्या जन्माच्यावेळी उपस्थित राहता आले नाही. मनजीतचा मुलगा अबीर हा आता ५ महिन्यांचा झाला आहे. गेल्या ५ महिन्यांत मनजीतला त्याला एकदाही भेटता आलेले नाही. त्यामुळे कधी एकदा घरी जाऊन अबीरला उचलून घेतोय असे मनजीतला वाटत आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना मनजीतने ही माहिती दिली.
 

 
 
मनजीत हा २७ वर्षांचा असून अबीर हे त्याचे पहिले अपत्य आहे. परंतु या पितृसुखापासून मनजीतला स्वत: ला दूर ठेवावे लागले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान मनजीत नेहमी आपल्या मोबाईलमधील अबीरचा फोटो पाहायचा. मनजीतने जर हा त्याग केला नसता तर आज भारताला सुवर्णपदक मिळाले नसते. मनजीतचा मुलगा अबीर जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला नक्कीच आपल्या वडिलांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा व मिळवलेल्या सुवर्णपदकाचा अभिमान वाटेल.
 

मनजीतचे वडील हे एक दुध विक्रेते आहेत. संपूर्ण कुटंबाची जबाबदारी ही त्यांच्या एकट्यावर आहे. मनजीतला त्यांनी आजवर खूप प्रोत्साहन दिले. आर्थिक परिस्थिती नसूनही मनजीतच्या स्पोर्ट्समधील करिअरसाठी त्यांनी पैशाची तजवीज केली. त्यामुळेच मनजीत ही सुवर्णकामगिरी आज करू शकला. मनजीतच्या पाठीशी त्याचे वडिल खंबीरपणे उभे असल्यानेच तो आज इथवर पोहोचला आहे. असे मनजीत आवर्जून सांगतो.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/