कृष्णभक्ती परंपरेचा ‘संदेश’ देणारा ‘संत’
महा एमटीबी   29-Aug-2018


 

संदेश संदीप संत... वय वर्ष अवघे २५. शिक्षण - मानसशास्त्रात पदवी आणि आता वैदिक शिक्षण. नाशिकच्या कापड पेठेतील श्री मुरलीधर मंदिराची धुरा सांभाळणाऱ्या या तरुण ‘संता’विषयी...
 
 

भारतात कृष्णभक्तीची मोठी परंपरा आहे. उत्तरेत मथुरा, द्वारका येथे या परंपरेचे दर्शन घडते. तेथे कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातदेखील ‘विठ्ठल’ हे साक्षात कृष्णाचेच रूप मानले जाते. वारकरी आणि विविध संप्रदाय ही परंपरा जोपासताना दिसतात‘कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामांचे निखळ प्रबंध, माजी आत्मचर्चा विषद उदंड गाती,’ असे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. नाशिकच्या कापड पेठेतील श्री मुरलीधर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरामुळेच त्या गल्लीला ‘मुरलीधर लेन’ असे नाव प्राप्त झाले आहे. वर्षात अन्य वेळी हे मंदिर तसे शांत असते. मात्र, श्रावण महिना सुरू झाला आणि रक्षाबंधनानंतर जन्माष्टमी पर्व सुरू झाले की या मंदिरात अखंड भक्तांची रीघ लागते. हे भक्त केवळ नाशिकमधून किंवा राज्यातूनच येतात असे नव्हे, तर भारतातून आणि परदेशातूनदेखील त्यांचे आगमन होते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सन १९०० पासून श्रावण कृष्ण प्रतिपदा ते श्रावण कृष्ण अष्टमी या काळात मुरलीधरास विविध वेशभूषा केल्या जातात. ही दर दिवशी बदलणारी सजावट पाहण्यासाठी भक्तगण विशेषत: महिला मोठ्या प्रमाणावर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. सर्वांना त्याचे मोठे आकर्षण असते. या मंदिरातील हा सर्वात मोठा उत्सव आता दोनशेव्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या पंधरा पिढ्यांपासून ही परंपरा अखंडपणे जोपासली जात आहे. दिवसमान पाहता या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्याची जोपासना करणे, अत्यंत परिश्रमाचे असले तरी संत परिवार मोठ्या निष्ठेने हा वारसा जतन करीत आहेतसध्या ही धुरा सांभाळत आहेत, अत्यंत तरुण तडफदार संदेश संदीप संत. संदेश अवघ्या २५ वर्षांचे आहेत. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण मानसशास्त्र विषयात पूर्ण केले. सध्या वैदिक शिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या नऊ वर्षांपासून ते मंदिराची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

१८२५ मध्ये संदेश यांचे पूर्वज पूजनीय गुंडराज महाराज यांनी यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी या मंदिराची स्थापना गोदेकाठी केली. त्यानंतर पूज्य गोपाळ महाराज, एकनाथ महाराज, हरी महाराज, सखाराम महाराज, दामोदर महाराज, कृष्ण हरी महाराज, शांताराम महाराज, सुधाकर महाराज, डॉ.संदीप महाराज, हभप सोमनाथ महाराज यांनी ही परंपरा जोपासली आणि वृद्धिंगत केली. आपले वडील डॉ. संदीप आणि काका सोमनाथ यांच्यानंतर संदेश महाराज हे ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अमित महाराज आणि चैतन्य महाराज संत हे सहकार्य करतात. पूजेची जबाबदारी संदेश महाराज, तर भजन, कीर्तन जबाबदारी अमित आणि चैतन्य महाराज सांभाळतात. हे तिघेही अत्यंत तरुण आहेत. चैतन्य महाराज आणि अमित महाराज यांचे वय संदेश महाराज यांच्यापेक्षा कमी आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पांढऱ्या पाषाणात घडविलेली ही दुर्मिळ मूर्ती आहे. दुसरीकडे अशी मूर्ती आढळत नाही. एकनाथी भागवताच्या दशम स्कंधात मुरलीधराची मूर्ती कशी असावी, याबाबत वर्णन आलेले आहे. त्यातील वर्णनानुसार गोलाकार कान, कमरेला लंगोट, हातात मुरली, गुडघे उठावदार अशी शास्त्रशुद्ध मूर्ती येथे पाहायला मिळते, असे संदेश महाराज यांनी सांगितले.

 
 

१९०० मध्ये या मूर्तीला विविध पोशाखात सजविण्याची पद्धत सुरू झाली. त्यापूर्वी फक्त अर्धनारीनटेश्वर रूप सजविले जात असे. मात्र, विविध पोशाखात सजविण्यामुळे या मंदिराची लोकप्रियता खूपच वाढली. ते मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य बनले. तिथी आणि नक्षत्रानुसार हा पोशाख बदलला जातो. या परंपरेची जोपासना करणारे संत परिवारातील सर्व वारसदार अत्यंत सात्त्विक विचार आणि वर्तन असलेले आहेत. त्यामुळे अनेकांचे उत्तम सहकार्य त्यांना मिळत असते. त्यामुळेच प्रत्यक्ष मुरलीधर आपला उत्सव पार पाडतो अशी संदेश यांची भावना आहे. मात्र, त्यासाठी उत्सवकाळात अष्टौप्रहर जागे राहावे लागते, ही एकप्रकारची साधनाच आहे.  उत्सवकाळात दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो. सकाळी सहा वाजता काकड आरतीने सुरुवात होते. त्यानंतर आठ वाजेपर्यंत पूजा, त्यानंतर पोशाख सजावट, दुपारी एक वाजता नैवेद्य, आरती, दुपारी विविध मंडळांची भजने, आठ वाजता देवाचा पहारा, रात्री साडेदहा वाजता महाआरती, कीर्तन असे कार्यक्रम सुरू असतात. अष्टमीस रात्री १२ वाजता कृष्ण जन्म असतो. या दिवशी पवमानसूक्ताने श्रीकृष्णाला अभिषेक केला जातो. नवमीस महाप्रसाद, दशमीस पालखी सोहळा असतो. एकादशीस घोंगडी परिधान केलेले श्रीकृष्णाचे रूप येथे पाहायला मिळते. द्वादशीस देवाचे बारसे होते. त्या दिवसापासून शेजारती सुरू होते. यामधील काळात शेजारती होत नाही, हे आगळे वैशिष्ट्य संदेश महाराजांनी सांगितले. संदेश महाराजांनी आणखी घडविलेले बदल म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी मुरलीधरास मल्हारी मार्तंड रूपात सजविले जाते. दत्त जयंतीस दत्ताचे रूप, तर एकादशीस विठ्ठल रूप पाहायला मिळते. नृसिंह जयंतीस मुरलीधर नरसिंह रूप धारण करतो. अशाप्रकारे मुरलीधर मंदिरात वर्षांनुवर्षे श्रीकृष्ण भक्तीचे आगळे रंग पाहायला मिळतात. त्यामागे ‘संत घराण्या’ची परंपरा आणि संदेश यांचे मोठे योगदान आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/