यशाचे पैलतीर गाठण्यासाठी...
महा एमटीबी   27-Aug-2018 

अपंगत्वाचे जू झुगारून कष्ट आणि मेहनतीने आनंद काळे यांनी स्वत:चा पेनं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. स्वत:सोबतच संपर्कातील दिव्यांगाचे आयुष्य उजळावे यासाठी शुन्यातून सुरुवात केली.
 

1965चे साल होते. बाबुरावांनी आपला पारंपरिक चप्पल बनवणे किंवा शिवण्याचा व्यवसाय केला नाही. बाबुराव काळे हे सेन्चुरी मिलला कामाला होते. पण, ही मिल बंद पडली आणि सेन्चुरी मिलच्या वसाहतीमध्ये राहणेही बंद झाले. बाबुराव आणि त्यांची पत्नी चंद्रभागा वरळी येथील बीडीडी चाळीत राहू लागले. बाबुराव छोटी-मोठी कामे करत, तर चंद्रभागा वरळी बीडीडीहून हाजी अलीच्या दर्याकिनाऱ्यावरील पॉश इमारतीमध्ये घरकाम करत असे. काळे दाम्पत्यांना चार मुले. दोन मुली, दोन मुलगे. यापैकीच एक आनंद काळे. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांना पोलिओ झाला. मग त्यांच्या आईवडिलांनी जंगजंग पछाडले. पण आनंदाचा एक पाय अधूच झाला. घरी अठरा विश्वे दारिद्रय. तेसुद्धा इतके की, आई वरळीहून हाजी अलीला घरकामाला जाताना पायी चालत जायची. प्रवासाच्या वाचलेल्या पैशांतून दररोज संध्याकाळी घरी येताना मोठा बनपाव घेऊन यायची. घरातली चिल्लीपिल्ली त्या पावाची समान वाटणी करून दुधाबरोबर नव्हे तर पाण्याबरोबर आवडीने खायची.

 

कुटुंबवत्सल बाबुरावांना दारूचे व्यसन लागले. आईचा खांदा जबाबदारीने मोडून पडत होता. पण, तिने मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्या पश्चात आपल्या दिव्यांग आनंदचे काय होईल, या विचाराने तिचे मन भरून येई. आनंद शिकला, तर चांगली नोकरी लागेल, त्याचाही संसार होईल, असे तिला मनापासून वाटे. त्यामुळे दुसऱ्यांकडून ती पाटी, पुस्तकं, वह्या मागून आणायची. मुलांनी शिकलेच पाहिजे, याकडे तिचा कटाक्ष असे. आनंद दहावी झाले. तोपर्यंत त्यांच्या दोन बहिणींची लग्न झाली होती. आनंद आणि धाकटा भाऊ घरीच असायचे. एक निमित्त होऊन आनंद यांच्यावर आभाळ कोसळले. 18-19 वर्षांच्या आनंद यांची आभाळ असलेली आई, वडील आणि आजोबा दोन महिन्यांच्या कालावधीत मरण पावले. दोन महिन्यांत आनंद निराधार झाले. काय करावे? कुठे जावे? त्यांना काही काही माहिती नव्हते. पण, स्वत: जगण्यासाठी आणि लहानग्या भावाला जगविण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. हा विचार करून आनंद आई जिथे काम करायची, तिथे गेले. काम देण्यासाठी म्हणून विनंती करू लागले. त्यांना हाजी अली समुद्रालगत लागून असलेल्या निऑन साईन जाहिरातीच्या बोर्डाची देखभाल करण्याचे काम त्या माणसांनी दिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बोर्डाकडे लक्ष द्यायचे. बोर्ड खराब झाले, तर कारागिरांकडून बनवून घ्यायचे. (समुद्रात आणि समुद्रालगत असलेले बोर्ड समुद्री वातावरणामुळे सातत्याने खराब होत असत.) सहा वाजता काम संपले की, ते भेंडीबाजारात जात. तिथे रात्री दोन वाजेपर्यंत केबलचे काम करत. या दरम्यान त्यांची ओळख सागरकिनाऱ्यावरच्या कोळी राजांशी झाली. आनंद तिथे जाळे विणायला शिकले. त्यांनी पहिल्यांदा भागीदारीमध्ये जाळे विणण्याचा व्यवसाय सुरू केला. कष्ट काही संपत नव्हते. पोटापुरता पैसा मिळू लागला. त्याचवेळी ‘अपंग स्टॉल’च्या नियमानुसार त्यांना तिथे स्टॉल मिळाला. घरी मोठे कोणी नव्हते. दोन बहिणी आणि मेव्हण्यांनी आनंद यांचे लग्न करायचे ठरवले. सुनिता नावाच्या मुलीसोबत त्यांचा विवाह झाला.

 

या दरम्यान आनंद स्टॉलवरही बसत आणि रात्री केबलच्या कामालाही जात. मात्र, नंतर छोट्या भावालाही व्यवसायाचे गणित जमावे म्हणून त्यांनी भावाला भेंडीबाजारात केबलच्या कामासाठी पाठवायला सुरुवात केली. भावाच्या मदतीने आईचे स्वप्न पुरे करायचे, घरात सुख आणायचे, हा आनंद यांचा विचार होता. पण, त्यांच्या विचाराप्रमाणे होऊ शकले नाही. केबल मालकाने भावाला जावई बनवून घेतले आणि भावाने मुस्लीम धर्म स्वीकारला. पुन्हा एकटेपण आले. घरी नुकतीच लग्न झालेली पत्नी. एकाला दोन हात कामाला बरे म्हणून तिने काही छोटी-मोठी नोकरी करू का, अशी विचारणा केली. पण, त्यांच्या डोळ्यांसमोर आई उभी राहिली. व्यसनी नवरा, चार छोटी मुले आणि अठरा विश्वे दारिद्र्यात संसार आटोकाट जपण्यासाठी 24 तास राबणारी आई! आईसारखी स्थिती पत्नीची करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी ठरवले, आपणच काही तरी करायला हवे.

 

आनंदनी काहीतरी करायचे ठरवले. जम बसत नव्हता. त्यात दोन मुले झालेली. एकेदिवशी ते पाय घसरून पडले. पायाचे हाड मोडले. दीड वर्ष अंथरूण पकडावे लागले. या दीड वर्षात त्यांच्या मनात नको नको ते विचार आले. काय करावे? मुले तर शिकत होती. पत्नी कधी घराच्या बाहेर गेलेली नव्हती. केवळ टेलिफोन बुथवर संसार कसा चालणार? अशातच त्यांच्याकडे मोबाईल फोन आला. स्वयंरोजगार शोधताना त्यांना पेनं बनवणे हा व्यवसाय नजरेत आला. पेन कसे बनवायचे? हे ते मोबाईलवरूनच शिकले. पेन बनविण्याच्या मशीनची किंमत 20 हजार रुपये होती. त्यांनी बँकेतून कर्ज काढले. पेन बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा विकणार कुठे? तर त्यांनी आजूबाजूच्या दुकानांमध्ये, शाळा, महाविद्यालयांमध्ये पेनांची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. इतकेच नाही तर रेल्वेमध्ये, बसमध्येही ते स्वत: पेनं विकू लागले. एक पाय अधू असल्याने चालायला त्रास होई. पण, आपण बनवलेले पेन लोक विकत घेतात, दुसऱ्यांदा पुन्हा पेन विकत घ्यायला येतात, ही गोष्ट त्यांना हुरूप देत होती. ते यावरच थांबले नाहीत, तर ओळखीच्या दिव्यांग पण बेरोजगारांनाही ते व्यवसाय मार्गदर्शन करू लागले. आनंद म्हणतात, “अपंग व्यक्ती शरीराने अपंग असली तरी त्यांचे मन सशक्त असेल, तर ती सगळ्या प्रतिकूल परिस्थितींवर मात करू शकते. यशाचे पैलतीर गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा हवी आणि प्रामाणिक प्रयत्न हवेत.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/