जगत असताना कोण आले?
महा एमटीबी   26-Aug-2018
 

विजय चव्हाण हरहुन्नरी अभिनेता. या ताऱ्याच्या मृत्यूनंतर चाललेला वादविवाद मूलभूत प्रश्न घेऊन उभा आहे. मरणापूर्वी कुणी विचारले नाही. मात्र, मेल्यानंतर त्याच व्यक्तीचे देव्हारे बांधायचे बाकी ठेवले जातात. त्यामुळेच आजारी असताना विजय चव्हाणांना भेटायला कोण गेले होते? हा प्रश्न मूलभूत आणि कालजयी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

या प्रश्नावरूनच आठवले की, शंतनू कांबळे या शाहिराचे स्मृतिपूजन सुरू आहे. त्यासाठी अभिवादन सभाही होणार आहे. एका सभेला निखिल वागळेपासून संभाजी ब्रिगेडचे अमोल मिटकरी ते माजी न्या. कोळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. शंतनूने समाजाचे किंवा लोकांचे काय भले केले? हा मुद्दा नाही तर मुद्दा हा आहे की, तरुण आणि सर्जनशील शंतनूचा मृत्यू अत्यंत विदारक मनःस्थितीत झाला म्हणे. शंतनूच्या गीतामध्ये लाल सलामचा विचार डोकावतो. त्याने आयुष्य विद्रोही चळवळीत झोकले. मात्र, शंतनू ज्या विचारधारेचा होता, त्यांनी त्याची दखल मृत्युपूर्वी घेतली होती का? एखाद्याच्या कर्तृत्वाचे, सर्जनशीलतेचे फायदे घेणारी विचारधारा, त्या कार्यकर्त्याच्या त्या व्यक्तीच्या जगण्यासमयी ठामपणे त्याच्यापाठी उभी राहिली का? खंदा कार्यकर्ता मरत असताना, विचारधारेचे कर्तेधर्ते सोईस्कररित्या डोळे झाकतात. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर त्याची स्मरणगाथा गातात. संतापजनक आणि दु:खद.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य कर्तृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही म्हणा. पण त्यांचा मृत्यूही असाच होता. त्यांना ‘कॉम्रेड’ पद चिकटविणाऱ्यांनी जिवंतपणी त्यांचे जगणे ‘जगणे’ होण्यासाठी काहीही केले नव्हते. आता शंतनू कांबळेचा स्मृतिजागर करणाऱ्यांनी सांगावे की, शंतनूच्या जगण्यासाठी त्यांनी काय केले किंवा का नाही केले? हा विचार या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनीही करावा. कारण मृत्यूनंतर कार्यकर्त्याला आपल्यापुरता शहीद बनवणे सोपे आहे, पण जिवंतपणी त्याला विचारधारेकडून माणूस म्हणून अनुभूती मिळणं गरजेचे आहे. ज्या विचारधारेकडे कार्यकर्त्यांसाठीही माणूसपणाची अनुभूती नाही, त्या विचारधारेसाठी ‘लाल सलाम’ करत आयुष्याची किंमत मोजावी का? कालजयी प्रश्न लक्षा ठेवा- मेल्यानंतर सोडा पण जगताना कोण आले?

 

फुकटेगिरीचा सल्ला

जिओच्या फुकट केबलसेवेमुळे केबलचालकांच्या पोटावर पाय येईल, असे केबलचालकांचे म्हणणे आहे तर, केबलचालकांच्या सहभागितेतूनच सर्व काही करण्यात येईल, असे जिओवाल्यांचे म्हणणे आहे. केबलचालकांचे नुकसान न करता मध्यममार्ग काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर “केबल फुकट देता तर डिझेल, पेट्रोल, रेशन, भाज्याही फुकट द्या. कारण भाकरी डाऊनलोड करता येत नाही,” असे अफलातून विधान सरकारला उद्देशून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव यांनी आपली फुकटवाटपाची मनिषा जाहीर केली. व्वा! सर्वच फुकट, मज्जाच मजा.. पण, तर्कशुद्ध आणि अर्थशास्त्रीय पद्धतीने विचार केला असता जगात कुठल्याही देशात कुठलेही सरकार खरेच सर्वच गोष्टी फुकटात देऊ शकेल? नाहीच, देऊ शकत. पण शिवसेना सत्तेतील भागीदार आहे. त्याचबरोबर राज्यातल्या राजकारणात शिवसेना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने भाजपच्या विरोधात भूमिकाही मांडत असते. असो. हा त्यांचा राजकारणाचा एक भाग झाला. पण फुकटेगिरीच्या विधानाला तर्क, सत्य यांचा काही तरी पाया असावा? असो. तळागाळातल्या स्वकष्टाने उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांचा शिवसेना हा पक्ष. असे असताना उद्धव यांचे फुकटवाटपाचे विधान अंमळ अनेक प्रश्न घेऊन उभे राहते. पुरुषार्थ आणि कर्मावर आधारलेली आपली जनसंस्कृती. मग लोकांच्या कर्तृत्वभावाला, स्वतःच्या गरजा स्वतः घडविण्याच्या बाणेदार आणि स्वाभिमानी वृत्तीला नाकारत उद्धव यांनी फुकटेगिरीचा संदर्भ का द्यावा? काही लोकांचे म्हणणे आहे की, आपल्या देशात हातावरची बोटं मोजण्याइतक्या काही व्यक्ती आहेत, ज्यांचे पूर्वज राजकीय नेता, उद्योगपती, गुन्हेगारी जगतातले डॉन किंवा सिनेसृष्टीतले तारे होते किंवा आहेत. त्यांच्या पूर्वजांनी यश, सन्मान, सत्ता किंवा संपत्ती खेचून आणली. सन्माननीय अपवाद वगळता या पूर्वजांच्या वारसदारांना वारसाहक्काने ती सत्ता, संपत्ती, सन्मान सगळं फुकटात मिळालं. अर्थात ते त्यांचं नशीब म्हणा पण म्हणून वारसाहक्काने सर्व काही फुकटात मिळालेल्या वारसदारांनी कष्टकरी आणि स्वाभिमानी जनतेलाही फुकटेगिरीचा सल्ला द्यावा, हे जरा अतिच झाले... होय ना?

९५९४९६९६३८

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/