बदलत चाललेली नारळी पौर्णिमा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |




 

 

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाला नारळ अर्पण करूनच मग मासेमारीसाठी समुद्रात होड्या सोडल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात खवळेलेला समुद्र शांत होतो. तसेच कोळीबांधवांच्या मासेमारीसाठी गेलेल्या होड्या समुद्रात भरकटत नाहीत. या होड्यांना वादळवाऱ्यापासून एकप्रकारचे संरक्षण मिळते. असे मानले जाते. त्यासाठी नारळ अर्पण करताना समुद्राला तसे साकडेच घातले जाते. नारळ अर्पण करताना तो भिरकावून समुद्रात फेकू नये. अशी सूचना कोळी समाजातील ज्येष्ठांकडून दिली जाते. नारळ हा अलगद समुद्रात सोडावा असेही ते सांगतात.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
नारळीपौर्णिमेला घराघरात नारळीभात हा गोड पदार्थ बनवला जातो. या दिवशी या नारळीभाताला विशेष महत्व असते. पूर्वी अनेक रस्त्यांवर नारळीपौर्णिमेनिमित्त नारळ फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एका हातात नारळ घेऊन तो दुसऱ्या हाताने फोडला जायचा. जो स्पर्धक जास्त नारळ फोडेल त्याला बक्षिस म्हणूनही नारळच दिले जायचे. हे जिंकलेले नारळ मग घरातील स्त्रिया स्वयंपाकात वापरायच्या. नारळ फोडण्याच्या या स्पर्धेत अबाल वृद्धांपासून सर्व वयोगटातील पुरुष मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायची. पण नारळ फोडण्याच्या स्पर्धेतील ही मजा अनुभवणे आजकाल दुर्मिळ झाले आहे. बदलत्या काळानुसार माणूस स्वत: ला बदलत चालला आहे. पण वेगाने होणाऱ्या या बदलात आपल्या जुन्या परंपरा, रितीभाती मात्र लोप पावत चालल्या आहेत. नारळ फोडण्याच्या स्पर्धेप्रमाणेच नारळीभाताचीही तिच अवस्था झाली आहे. नारळीभात हा पदार्थही या दिवशी क्वचितच काही घरात बनवला जातो. नारळीभात खाल्ल्यानंतर पुढील बराच वेळ त्याची जिभेवर रेंगाळणारी ती चवही आता अनेकजण विसरू लागले आहेत. आजकालच्या लहान मुलांना तर नारळीभात हा काय प्रकार आहे, हेच माहिती नसते.

 

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजातील स्त्रिया नखशिखांत सजलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. आजही नारळीपौर्णिमेतील कोळी बांधवांचा उत्साह कायम आहे. परंतु यात फरक फक्त एवढाच आहे की आज समुद्राला नारळ अर्पण करताना दर्याला नमस्कार करण्याऐवजी त्या नारळसह आधी सेल्फी काढला जातो. मग तो तेथूनच ताबडतोब सोशल मीडियावर अपलोडकरून ‘सेलिब्रिटिंग नारळीपौर्णिमा अँट सो अँड सो समुद्रकिनारा’, ‘फिलिंग ब्लेस्ड’ असे स्टेटस ठेवले जाते. या सगळ्या गडबडीत नारळ समुद्राला पोहोचलेलाही असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर सण-उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात, किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त उत्साह आजच्या तरुणांमधे ओसंडून वाहताना दिसतो. सण कोणताही असो पण त्या सणाला डीजे, लाऊस्पीकर, किंवा किमान ढोलपथक तरी असलेच पाहिजे. त्याशिवाय मजा येतच नाही म्हणे. या दरम्यान फिल्मी गाण्यांवर नाचले नाही तर तो सण नीट साजरा झालाच नाही असा आजकाल समजच झाला आहे. असो ही मजामस्ती करता यावी म्हणून आज निदान सण तरी साजरे होत आहेत यावरच समाधान मानावे. काही वर्षांनी आणखी वेगळ्या पद्धतीने हे सण साजरे केले जातील. यात शंका नाही! नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 - साईली भाटकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@