भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा
महा एमटीबी   24-Aug-2018
 
 
 
 
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदक तर तीन कांस्यपदकाची कमाई 
 
जकार्ता : येथे चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळी करत दोन सुवर्णपदक तर तीन कांस्यपदकाची कमाई केली आहे. 
 
 
यामध्ये टेनिस खेळामधील पुरुष दुहेरी प्रकारात रोहन बोपण्णा-दिवीज शरण यांना सुवर्णपदक, नेमबाजी क्रीडाप्रकारात हिना सिधूने कांस्यपदक, नौकानयन स्पर्धेत सांघिक क्वाडरपल स्कल्स प्रकारात सुवर्ण, तसेच नौकानयन डबल्स स्कल्समध्ये रोहित कुमार आणि भगवान सिंह यांना कांस्य आणि दुष्यंत चौधरीने लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्य पदक तर महिला कबड्डी स्पर्धेत रौप्यपदक अशी पदके भारतीय खेळाडूंनी आज पटकावली आहेत. यांच्या विजयामुळे भारताच्या विजयी पदकांमध्ये भर पडली असून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 
 
 
 
 
 
 
भारतीय खेळाडू रोहन बोपमण्णा आणि दिवीज शरण यांच्या जोडीने टेनिस दुहेरीतील अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येवसेव यांच्या जोडीला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये मात देत सुवर्णपदक मिळवले. तर नौकानयन क्रीडा स्पर्धेमध्ये रोहित कुमार आणि भगवान सिंह यांनी डबल्स स्कल्समध्ये तर, दुष्यंतने लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्य पदक पटकावले. रोहित आणि भगवानने ७ मिनिटे ४.६१ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. तसेच यामध्ये जपानच्या मियाउरा मायायुकी आणि ताएका मासाहिरो या जोडीने सुवर्णपदक तर कोरियाच्या किम बी आणि ली मिन्ह्युक यांनी रौप्यपदक पटकावले. लाइटवेट सिंगल नौकानयनात शर्यतीतील शेवटच्या ५०० मीटरमध्ये दुष्यंतला प्रचंड थकवा आल्यामुळे शर्यत संपल्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. तर नौकानयन स्पर्धेतीलच सांघिक क्वाडरपल स्कल्स प्रकारात भारतीय संघात स्वर्ण सिंग, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखतीम सिंह यांनी ६ मिनिटे १७.१३ सेंकदात शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकावले. 
 
 
भारताची नेमबाज हिना सिधूने महिला गटात १० मीटर एअर रायफल पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. तर, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती मनू भाकर पदक जिंकण्यास अपयशी ठरली. तसेच महिला कबड्डीत सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपुरे राहिले असून अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या संघाने भारतीय संघावर २७-२४ अशा गुणांनी मात करत सुवर्ण पदक पटकावले.