शिल्पकलेच्या समृद्ध परंपरेचे संवर्धन
महा एमटीबी   23-Aug-2018


 

संदीप कृष्णाजी लोंढे यांनी केवळ व्यक्तींचीच नव्हे, तर प्राणी, विविध स्मृतिचिन्हे आणि म्युरल अशी एकापेक्षा एक शिल्पे बनवून ही समृद्ध परंपरा केवळ जिवंत ठेवली, असे नसून ती कमालीची समृद्ध केली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


नाशिकमध्ये शिल्पकारांची एक मोठी परंपरा आहे. त्यात मोरे, नेताजी भोईर, मदन गर्गे, लोंढे, राम अनंत थत्ते, सुधीर देशपांडे अशी अनेक नावे तशी सर्वांच्या परिचयाची. गणेशोत्सवात सुंदर गणेशमूर्तींचे दर्शन नेहमीच घडते. यातील जुन्या काळापासून अत्यंत रेखीव आणि प्रेक्षणीय मूर्ती बनविणारे शिल्पकार म्हणून लोंढे बंधूंकडे पाहिले जात असे. मूर्ती पाहिली की, ही मूर्ती शिल्पकार लोंढे यांनीच बनविली, हे हमखास ओळखता येत असे, इतकी त्यांची हातोटी. मूर्ती, रेखीवता, तिचे रंगकाम या सर्व बाबतीत त्यांचा हात धरणारा कोणीच नव्हता. गणेशमंडळांनी केलेली अन्य सजावट पाहण्याऐवजी केवळ मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत असे, हे लोंढे यांचे मोठे बलस्थान होते. या लोंढे घराण्यातील तिसरी पिढीदेखील शिल्पकलेच्या क्षेत्रात नावलौकीक कमवित असून संदीप कृष्णाजी लोंढे यांनी केवळ व्यक्तींचीच नव्हे, तर प्राणी, विविध स्मृतिचिन्हे आणि म्युरल अशी एकापेक्षा एक शिल्पे बनवून ही समृद्ध परंपरा केवळ जिवंत ठेवली, असे नसून ती कमालीची समृद्ध केली आहे.

४८ वर्षे वय असलेल्या संदीपजी यांचे आजोबा सीताराम विठ्ठल लोंढे यांनी शिल्पकलेची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे, ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्टुडियोमध्ये कामाला होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव कृष्णाजी आणि सुधाकर यांनी ही परंपरा पुढे नेली. संदीप यांनी मुंबईच्या जे जे आर्टमध्ये जाहिरात क्षेत्रात पदवी घेतली आणि मुंबईत नोकरी स्वीकारली होती. मात्र, वडिलांच्या आजारपणामुळे त्यांनी नाशिकला येऊन आपला पारंपरिक शिल्पकलेचा आश्रय घेतला आणि गेल्या २० वर्षांत त्यात लक्षणीय प्रगती साधली आहे.

आडगाव नाका परिसरात त्यांचा स्टुडिओ आहे. तेथे त्यांच्या कामगिरीचे दर्शन घडते. दगडात शिल्प कोरणे किंवा लाकडात शिल्प कोरणे सोडले तर फायबर, माती, शाडू, ब्राँझ अशा विविध माध्यमांतून ते शिल्पे साकारतात.

सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांचे २२ बाय १२ आकाराचे भव्य म्युरल, पूजनीय गोळवलकर गुरुजींचे शिल्प, अशोका उद्योग समूहासाठी साकारलेले ’स्काय इज लिमिट हे शिल्प, कॅट शो साठी साकारलेली ट्रॉफी, गोरखा रेजिमेंटमधील व्हिटोरिय क्रोस विजेते सन्मानित थमन गुरुंग यांचे ब्राँझ शिल्प, आ. गणपतराव काठे यांचे शिल्प अशी अनेक शिल्पे त्यांनी बनविली आहेत. स्वामी समर्थ, गजानन महाराज, बाळासाहेब ठाकरे, स्वा. सावरकर अशी अनेक शिल्पे मन वेधून घेतात.

या कलेमुळे त्यांना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा सहवास प्राप्त झाला, त्याची हकीकत मनोरंजक आहे. गुरगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकारी संस्था आहे. या संस्थेत स्व. इनामदार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे काम लोंढे यांनी केले आहे. या शिल्पाच्या उद्घाटनासाठी स्वतः सरसंघचालक जातीने हजर होते. या निमित्ताने त्यांचा जवळून परिचय झाला आणि सहवास मिळाला. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या, अशी आठवण लोंढे सांगतात. वनखात्याच्या थीम पार्कसाठी त्यांनी अत्यंत जिवंत अशी हरणे, माकड, विविध पक्षी, प्राण्यांची शिल्पे साकारली आहेत. या निमित्ताने प्राणी, पक्षी यांचा अभ्यासदेखील होतो आणि अनेक बारकावे समजतात. त्यांचा शिल्पकलेत वापर करून शिल्पे जिवंत केली जातात.

गणेशमूर्ती बनविणे, ही त्यांची परंपरा ते जपत असून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी तीन दिवसांची कार्यशाळादेखील घेतात. अशा शेकडो मूर्ती बनविणारे पर्यावरणप्रेमी त्यांनी घडविले आहेत. लोंढे यांची कार्यशाळा दोन तासांची आणि जुजबी माहिती देणारी नसते. त्यात निवडक १५ -२० जणांनाच प्रवेश दिला जातो. श्रीगणेश मूर्ती बनविण्यापूर्वी शिल्पकलेची माहिती दिली जाते. शिल्पकला म्हणजे अनेक कलांचे मिश्रण आहे. त्यासाठी चित्रकला, स्थापत्य यांचीदेखील माहिती असावी लागते. तसेच मूर्ती बनविताना माती तयार करणे, विविध माहिती ते सविस्तर आपल्या कार्यशाळेत देतात. त्यामुळे या कार्यशाळेत येणारे विद्यार्थी दरवर्षी स्वतः पर्यावरणपूरक मूर्ती बनवितात, असे संदीप लोंढे यांनी अभिमानाने सांगितले. शिल्पकलेची समृद्ध परंपरा जोपासत असलेल्या संदीप लोंढे यांचे चिरंजीव रोहन सध्या वास्तूशास्त्राची पदवी मिळवत असून अकाऊंटंट म्हणून काम करणार्‍या त्यांच्या पत्नीचीदेखील त्यांना उत्तम साथ मिळते. आपल्या व्यवसायात अनेक चढउतार असतात. अशावेळी पत्नीची साथ महत्त्वाची असल्याचे ते सांगतात.

प्रसिद्ध व्यक्तींची शिल्पे तर नेहमी होतातच. मात्र, ज्यांचे कार्य मोठे आहे आणि लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नाही, अशा व्यक्तींची शिल्पे तयार करण्यात आपल्याला वेगळेच समाधान मिळते,” असे ते विशेषत्वाने नमूद करतात. लोकांना माहिती नसलेले, स्वातंत्र्य चळवळीत योगदान असलेले क्रांतिकारक नाग्या कातकरी यांचे एक शिल्प ते बनवित आहेत. हे शिल्प रायगड जिल्ह्यात बसविले जाणार आहे. अशी उपेक्षित कर्मवीरांची शिल्पे समाजमनाला प्रेरणा देतील,असा विश्वास त्यांना वाटतो.

 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/