एका सुवर्णयोगाची कहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

उत्तर प्रदेशातील मेरठमधल्या ‘कलिना’ या छोट्याशा गावात जन्मलेला सौरभ चौधरी. पण, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा हा लक्ष्यभेदी नेमबाज...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

मोठ्या शहरातील मुलं आणि लहान गावातील मुलं यांच्यात नाही म्हटलं तरी आयुष्याकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोन फरक पडतोच. गावाकडच्या तरुणांची आपल्या ध्येयाकडे पाहण्याची नजर आणि मेहनत करण्याची तयारीही शहरी मुलांपेक्षा कैकपटीने जास्त असते. उत्तर प्रदेशातील मेरठमधल्या अशाच एका ‘कलिना’ या छोट्याशा गावात जन्मलेला सौरभ चौधरी. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने आपल्या देशाचा झेंडा अटकेपार रोवला. आपण फक्त स्वप्न बघतो, पण काही मुलं ती स्वप्नं जगतात आणि त्याचं जीवंत उदाहरण म्हणजे सौरभ चौधरी. संधीचं सोनं करणं, ही म्हण जणू त्याने शब्दश: अंगीकारली. वयाच्या 16व्या वर्षी सौरभने भारताला ‘आशियाई (एशियाड) स्पर्धे’तनेमबाजीत ‘पहिलं सुवर्णपदक’ मिळवून दिलं आणि जगातील दिग्गजांचं लक्ष त्याने वेधलं.

 

ज्या वयात मुलांना आपल्या स्वप्नांची दिशाही उमगत नाही, त्या वयात सौरभने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे पदक मिळवलं. आपल्याला वाटतो तेवढा सौरभचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. आशियाई स्पर्धेत पात्र होण्यासाठीसुद्धा खूप मेहनत असते. पण, त्याचं ध्येय निश्चित होतं. आपल्या प्रशिक्षकांना तो सतत सांगायचा, “सर, मी सुवर्ण पदक नक्की मिळवेन.” सौरभचा हाच आत्मविश्वास त्याच्या अंगी आला तो त्याच्या वडिलांमुळे. मेरठमधील कलिना गावात शेती करणारे त्याचे वडील त्याचे आदर्श आहेत. लहान असताना सौरभला नेहमी वाटायचं, आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या देशाचा झेंडा अटकेपार रोवला गेला पाहिजे. पण नेमकं काय केलं पाहिजे? हे त्याला एके दिवशी त्याच्या वडिलांनीच सांगितलं. “शेती करून कितीतरी लोकांचं पोट भरणं, ही पण एक प्रकारची देशसेवाच आहे,” या त्याच्या वडिलांच्या विचारांमुळे सौरभ मेहनत करायला कधीच घाबरला नाही. त्याने तीन वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 13व्या वर्षी छंद म्हणून नेमबाजीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. सुवर्णपदक जिंकण्याची मात्र सौरभची ही पहिलीच वेळ नाही. याच वर्षी जुलैमध्ये जर्मनीत झालेल्या ‘आईएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी करत त्याने सुर्वणपदकाची कमाई केली होती. अंतिम फेरीमध्ये सौरभने 243.7 गुणांची आघाडी घेत चीनच्या वांग झेहीओचा 242.5 गुणांचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. पण, तेवढ्यावर सौरभ थांबला नाही.

 

यावर्षी जर्कातामध्ये सुरू असलेल्या आशियाई (एशियाड) स्पर्धेततो पहिल्यांदाच सहभागी झाला आणि ‘10 मीटर एअर पिस्तुल’ प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. त्याच्या कामगिरीचे कौतुक सगळ्यांकडून होत असताना त्याला मात्र आपल्या वडिलांची आणि शेतातल्या गाईंची आठवण येत होती. मागील वर्षभरात सौरभने मेहनतीच्या जोरावर आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा केली. त्या मेहनीतचं फळ म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच सौरभने ‘आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धां’मध्ये आपला उमटवलेला ठसा. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या 10व्या आशियाई ‘युथ ऑलिम्पिक पात्रता क्रीडा स्पर्धां’मध्ये सौरभने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत विश्वविक्रम करत सौरभने सुवर्णपदक जिंकले. ‘2018 युवा क्रीडास्पर्धे’साठी स्थान मिळवणारा सौरभ हा तिसरा भारतीय ठरला. 2017 साली झालेल्या ‘केएसएस शुटिंग चॅम्पियनशीप’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वयाच्या 15व्या वर्षी सौरभने 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात जितू रॉयला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. त्याच दिवशी त्याने ज्युनिअर स्पर्धांमध्ये रौप्यपदकाचीही कमाई केली. 2017च्या वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत तो भारतीय नेमबाजी संघाचा सदस्य होता. या संघाने कांस्यपदक पटकावलं होतं. याच वर्षी जुलैमध्ये जर्मनीत झालेल्या 2018 ‘आईएसएसएफ ज्युनियर विश्वचषक’ स्पर्धेत सौरभने केलेल्या विश्वविक्रमामुळे नेमबाजीत तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला.

 

या स्पर्धेनंतर जुलैमध्येच चेक प्रजासत्ताक येथील प्लाझीन येथे पार पडलेल्या 28व्या होप्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या ज्युनिअर गटामध्ये एअर पिस्तुल प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले, तर मिश्र दुहेरीमध्ये देवांशी राणासोबत लढतीत रौप्यपदक पटकावले होते. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर “मला घरी लवकर जाऊन, शेतात वडिलांना मदत करायची आहे. मला शेतीची कामं करायला खूप आवडतात. कारण त्यामुळे मला दोन वेळच्या अन्नाची किंमत कळते. मला शहरांपेक्षा, गावातच राहायला जास्त आवडतं. कारण निसर्गाच्या सान्निध्यात मला खरा आनंद मिळतो,” असं सौरभ सहज बोलून गेला. त्याची हीच निरागसता आणि त्याची मेहनत अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही वाद नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@