कोहलीने इंग्लंडकडून वसूल केला लगान, धुवाधार शतक
महा एमटीबी   02-Aug-2018
 
 
 
 
इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे कालपासून सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामना आपल्या हातातून गमावला असला तरी देखील या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने धुवाधार शतक करत इंग्लंडकडून लगान वसूल केला. विराटने कालच्या सामन्यात १४९ धावा करत कसोटी सामन्यातील त्याच्या करिअरमधील २२ वें शतक पूर्ण केले. 
 
 
 
 
काल भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात काहीशी अडखळतच झाली. सलामीला आलेल्या मुरली विजय व शिखऱ धवन यांनी सुरुवातील चांगला जम बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र चौदाव्या षटकात आधी मुरली विजय २० धावांवर व त्यानंतर लगेचच लोकेश राहूलचा ४ धावांवर बळी गेल्यामुळे फलंदाजीची भक्कम सुरुवात होऊ शकली नाही. 
 
 
 
 
 
मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळीपेक्षा टिकून राहण्याला पसंती दिल्यामुळे खेळी सावरली. मात्र त्यानंतर लगेचच सोळाव्या षटकात शिखर धवनही २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य राहणेलाही केवळ १५ धावा करुन २८ षटकातच यजमान संघाने तंबूत परत पाठवले. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक तर धावांचे खातेही न उघडता बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने विराट कोहलीला चांगली साथ दिली. 
 
 
 
 
 
मात्र तोही दीर्घकाळ मैदानात टिकला नाही. २२ धावा करून सेहेचाळिसाव्या षटकात हार्दिक पंड्या बाद झाला. त्यानंतर आलेला रविचंद्रन अश्विनही फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही व एक्कावन्नाव्या षटकात १० धावांवर खेळत असताना तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीला केवळ २ धावा करता आल्या व पंचावन्नाव्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर इशांत शर्माने कोहलीला साथ द्यायचा प्रयत्न केला आहे.
 
 
तत्पूर्वी काल यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडचा संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी गारद झाला. इंग्लंडने ८९ षटके व ४ चेंडूंत सर्वबाद २८७ धावा केल्या. कर्णधार जो रूट याने सर्वाधिक ८० धावा केल्या तर जॉनी बेअरस्टोव याने ७० धावा केल्या. भारताच्या फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक ४ बळी घेतले तर मोहम्मद शमीने ३ गडी बाद केले.