वास्तुविशारद घडविणारा ‘शिल्पकार’
महा एमटीबी   02-Aug-2018


 

 

‘विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ (आयडिया)चे संचालक असलेल्या प्रा. विजय सोहनी यांनी वास्तुविज्ञान आणि पर्यावरण तसेच ‘परवडणारी घरे’ या उपक्रमाबाबत गांभीर्याने विचार केला आहे.

 

भारतात आज अभियंते, डॉक्टर्स आणि वकील यांची जेवढी संख्या आहे तेवढीच वास्तुविशारदांची असली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ही संख्या खूपच कमी आहे. भारतात ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत,” हे मत आहे, वर्षांनुवर्षे आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक म्हणून काम करीत असलेल्या प्रा. विजय श्रीकृष्ण सोहनी यांचे. सध्या ‘विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ (आयडिया)चे संचालक असलेल्या सोहनी यांनी वास्तुविज्ञान आणि पर्यावरण तसेच सरकारने सुरू केलेला ‘परवडणारी घरे’ या उपक्रमाबाबत गांभीर्याने विचार केलेला आहे. त्यामुळे आपले क्षेत्र हे केवळ श्रीमंत व्यक्तींचे क्षेत्र नाही, याची खुणगाठ त्यांनी बांधलेली आहे. वास्तुरचनाकाराने केवळ ऐषोरामी माड्या बांधू नयेत, तर उपलब्ध बांधकाम सामुग्री, पर्यावरण, लोकांची गरज लक्षात घेऊन वास्तुनिर्मिती करावी, असे त्यांचे मत आहे. शासकीय इमारती बांधताना त्यात एअरकंडिशनिंग हा विषय येतो, तेव्हा पर्यावरण आणि आपली जीवनपद्धती यांना कुठेतरी ते विसंगत ठरते आहे, असे त्यांना वाटते.

 

सोहनी सरांचा हा दृष्टिकोन तयार होण्यासाठी त्यांची प्रचंड मेहनत, दीर्घ अनुभव आणि सतत वास्तुअध्यापनामुळे असलेला तरुण विद्यार्थी वर्गाचा संपर्क ही कारण आहेत. प्रा. सोहोनी यांचे कुटुंब उच्चशिक्षित. त्यांचे वडील नाशिकच्या प्रसिद्ध हं.प्रा.ठा. महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राचार्य होते. प्राचार्य काकासाहेब सोहनी यांचा व्यासंग मोठा होता. समाजाच्या शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्याला ज्ञानाचा स्पर्श व्हावा, ही त्यांची तळमळ विजय सोहनी यांच्यातदेखील उतरलेली आहे. आज ६६ वर्षे वय असलेल्या सोहनी यांनी मुंबईच्या जे. जे.स्कूलमध्ये १९६८-७२ दरम्यान शिक्षण घेऊन आर्किटेक्चर विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९८४ मध्ये पुन्हा जे.जे.मध्ये प्रवेश घेऊन मास्टर्स डिग्री संपादन केली. त्याकाळी नाशिकचे या विषयातील पहिले ‘मास्टर’ म्हणून ते नावाजले गेले. नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने सुरू केलेल्या आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी १९८९ मध्ये जबाबदारी स्वीकारली. २००० मध्ये आर्किटेक्ट कौन्सिलचे ते सभासद झाले. २००१ मध्ये सुमारे १२०० सदस्य संख्या असलेल्या या देशव्यापी संस्थेचे उपाध्यक्ष बनले. त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला आणि २००४ मध्ये या कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नाशिकच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्यादृष्टीने ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

 

आपल्या आठ वर्षांच्या अध्यक्षीय काळात त्यांनी अनेक कामे केली. त्यात या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्यात ‘नियासा’ हे या क्षेत्रातील संशोधनासाठीचे केंद्र त्यांच्या काळात उभे राहिले. कौन्सिलच्या कामाचे डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा त्यांनी सुरू केली. संघटनात्मक पातळीवर भरीव काम करीत असतानाच त्यांनी २००६ मध्ये गोव्यात विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर (आयडिया) कॉलेजची स्थापना केली. २०११ मध्ये हे महाविद्यालय नाशिकला स्थलांतरीत केले. २०१६ साली महाविद्यालयाने स्वत:च्या प्रशस्त आणि आधुनिक वास्तूमध्ये स्थलांतर केले. नवीन वास्तूमध्ये सर्व पायाभूत सुविधा, पेपरलेस कामकाज, संगणकीकृत वर्ग, तज्ज्ञ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद अशा महत्त्वपूर्ण गोष्टींच्या आधारावर कॉलेजची पुढची वाटचाल सुरू झाली.

 

गेल्या वर्षीपर्यंत ‘आयडिया’मध्ये प्रथम वर्षात ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. या शैक्षणिक वर्षात मात्र ही संख्या वाढून ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात देण्यात येईल. विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र अभ्यासासाठी चांगला पर्याय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे. “आम्हाला आनंद आहे की, कॉलेजमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा फायदा आता अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आर्थिक बंधनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईला जाऊन शिकता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये आधुनिक आणि जागतिक स्तरावरचे शिक्षण मिळणार आहे,” असे ते म्हणाले. “नाशिकला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे या विषयातील शिक्षण केंद्र आहेच. आपली त्यांच्याशी स्पर्धा नाही. उलट सहकार्याची भावना आहे. अन्य संस्थांशीदेखील सहकार्य असून भावी काळात भारताला अधिक आर्किटेक्चर्सची गरज असल्याने ही संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,” असे प्रा.विजय सोहनी सांगतात.