राहून गेलेली नागाची कहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2018
Total Views |

 
 
 
गेल्या आठवड्यात नागपंचमी येऊन गेली. व्यासपीठावर आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असली की आपण जसे झाकोळून जातो, तसेच दिवसांचेही असते. आता नेमकी नागपंचमी आणि स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी आल्याने स्वातंत्र्य दिनाच्या प्रभावळीत नागपंचमी झाकोळली. नाहीतर आपण कितीही आधुनिक झालो असलो तरीही नागपंचमी आपण साजरी करतोच. पद्धती बदलल्या असतील; पण सण मात्र साजरे होत असतात. आता नाग पकडता येत नाहीत. त्यामुळे गारुड्यांचा छोटासाच अन् परंपरागत धंदा बसला. साप-मुंगसाची लढाई दाखवितो म्हणत गारुडी प्रेक्षकांना चांगला तास-दीडतास खेळवायचा अन् लोकही उभे राहायचे. त्याचे त्या काळात अप्रूप वाटायचे की हा अडाणी, निरक्षर अन् भटक्या जमातीचा गारुडी शिकलेल्या लोकांना असा मूर्ख बनवितो अन् लोक तास-दीड तास साप-मुंगसाची लढाई पाहण्यासाठी थांबतात कसे? अन् तरीही तो ती दाखवित नाही अन् लोक त्याच्या पारड्यांत पैसे टाकून निमूटपणे निघून कसे जातांत? असे अनेक प्रश्न मनात त्यावेळी यायचे. मग लक्षात आले की पेशन्स हा भारतीयांचा गुणच आहे.
 
राजकारणी नाहीत का, काय वाट्टेल ते देण्याची वचने देतात. पाणी देऊ, वीज देऊ, पोळी देऊ, नुसतीच पोळी नाही तर त्यावर तुप देऊ, पूल देऊ, त्यासाठी मग नदी नसेल तरीही नदीही देऊ... यातले होत काहीच नाही, तरीही लोक पाच पाच वर्षे वाट बघतात अन् पाच वर्षे पूर्ण झालीत की न चिडता त्यांच्याच पारड्यात आपले अमूल्य असे मत टाकतात. असे साठ वर्षे सुरू होतेच ना आपल्या देशांत? तर नागपंचमी हा शेती-मातीचा सण आहे. आता लोक ऑनलाईनच जास्त असतात. त्यामुळे सण समाजमाध्यमांवरच साजरे होतात. फोटो काढून लगेच व्हॉटस्अॅप-फेसबुकवर पोस्ट करण्यासाठीच करत असावेत. ‘आमच्या घरी केलेली पुरणाची पोळी...’ असा टॅग लावून फोटोच आधी पोस्ट केला जातो. खाण्यापेक्षा दाखविण्याचीच भूक जास्त असते. आता व्हॉटस्अॅप अन् समाज माध्यमांमुळे लोक कशाच्याही शुभेच्छा देतात. काहीतरी कारणच हवे असते. आता सगळेच सण काही शुभेच्छा देण्यासारखेच नसतात. अक्षयतृतियेला कशाच्या शुभेच्छा द्यायच्या? आता त्या दिवशी पितरांना जेवू घालायचे असते. मृतांची आठवण करायची असते. त्यात कृतज्ञता असली तरीही तो क्षण काही आनंदाचा नसतो. तरीही लोक शुभेच्छा देतातच. नाग पंचमीच्या काय शुभेच्छा देणार? अन् कुणाला? नाग दिसला तरीही पाचावर धारण बसणे या वाक्याचा प्रत्यक्षात प्रत्यय येतो. तरीही लोक नाग पंचमीच्या शुभेच्छा देतात... आताच्या पिढीत प्रत्यक्ष नाग पाहिला; म्हणजे खुला नाग पाहिला अशी मुले किमान शहरांत तरी नाहीत. शहरांची संख्या वाढते आहे अन् मग आपण प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर, वसतिस्थानांवर अतिक्रमण केले आहे. त्यात नाग, सापांचा क्रमांक पहिला लागत असतो. निसर्ग कुठलाच अनावश्यक जीव जन्माला घालत नाही अन् अनावश्यक ठरला तो जीव तर तो संपतो. आता डायनोसॉर संपले नाहीत का? आता सगळेच साप विषारी नसतात; पण ते सापांना अन् आपल्यालाही माहिती नसते. त्यावेळी पाचलेगावकर महाराज होते. त्यांच्या आश्रमात तर सर्प असे लोळत असायचे.
 
 
खुले फिरायचे. त्यांचे नाव घेतले तरीही सर्प निघून जातात, त्रास देत नाहीत, असे मानले जायचे. आमच्या एका मित्राच्या घरी साप यायचा. त्याने त्याच्या त्या खोलीत जिथे कुठे छिद्र होती, म्हणजे कोपर्यात मोरी होती, त्याची छिद्र किंवा खिडकी सारखा एक झरोका होता त्याचे छिद्र... अशा सगळ्यांच छिद्रांच्या ठिकाणी ‘पाचलेगावकर महाराज प्रसन्न’ असे लिहून ठेवले होते. तो त्यांच्या खामगावच्या आश्रमातही जाऊन आला होता. महाराजांनी त्याला नागमंत्रही दिला होता, असे तो सांगायचा. मात्र हे जिथे भोकं आहेत अन् साप येऊ शकतो अशा ठिकाणी पाचलेगावकर महाराज प्रसन्न, असे लिहून ठेवल्यावर त्याला विचारले, हे ठीक आहे तू लिहलेस; पण तुझ्या खोलीत येणारे नाग काय साक्षर असतात का? पाचलेगावकर महाराजांनी मात्र नाग-सापांबद्दल बरीच जागृती आणली होती. त्यांच्या आश्रमात अनेक मुले शिकायला होती. गरीब मुलांना त्यांनी आश्रमात आश्रय दिला होता. आमचा हा मित्र सांगायचा की, आश्रमात कुणा मुलाला ताप आला तर महाराज त्याच्या अंगावर पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यापेक्षा सापच टाकायचे. त्याचा ताप उतरूनच जायचा... आता अंगावर थंड असतात म्हणून सापच टाकले तर माणूस तसाच थंडा पडेल की नाही? आमच्या एका मित्राने सापच घरांत पाळला होता. आता तुम्ही विचाराल की साप! अन् पाळला होता? तर त्याचे उत्तर ‘हो’ असेच आहे.
 
 
साप निघाला एक दिवस. त्याची वासलात लावल्यावर साप या विषयावर चर्चा रंगली. तर या मित्राने सापच विकत आणला एका गारुड्याकडून. गारुडी लोक नागाच्या विषाची ग्रंथी काढून टाकतात. तो त्या सापाला घेऊन वगैरे झोपायचा म्हणे... आता मित्रानेच नाग पोसला म्हटल्यावर आम्ही या विषयावर पीएच्.डीच केली. पीएचडी म्हणजे फालतूचा हव्यास... साप हा तसा गुढ अन् पौराणिक प्राचीनत्व असलेला प्राणी आहे. अगदी शंकरजींच्या गळ्यांतही तो असतो. गणेशाच्या पोटाला गुंडाळला असतो. त्याच्या बद्दल अनेक कथा आहेत. राजा परीक्षिताची कथा आहे. तो जंगलात शिकारीला गेला. त्याला तहान लागली म्हणून तो शमीक ऋषींच्या आश्रमांत पाणी मागायला गेला. ते ध्यानस्त असल्याने त्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. मी राजा असून याने मला पाणीही दिले नाही, म्हणून जवळच मरून पडलेला साप त्याने बाणाच्या टोकावर उचलून ऋषींच्या गळ्यांत टाकला... ऋषीपुत्र ऋंगीने त्याला साप चावून मरशील, असा शाप दिला अन् पुढची कथा आमच्या सुज्ञ वाचकांना माहितीच आहे. तर सापाची ही जमात इतकी जुनी आहे. त्यामुळे त्यांच्या खूप गुढ कथा आहेत. वदंताही आहेत. म्हणजे नाग हे अमर असतात, इच्छाधारी असतात, म्हणजे त्यांनी तपश्र्चर्या केली की मग ते माणसाचे रूप धारण करू शकतात.
 
 
नागमण्याबाबतही वदंता आहे. अर्थात त्या सार्या चुकीच्या आहेत. नाग अमर नसतो. तो त्याच्या विषानेच मरतो. म्हणजे रक्ताचा कर्करोग होऊन मरतो. त्याच्या विषाची ग्लँड तो म्हातारा, म्हणजे वीस वर्षांचा झाल्यावर फुटते अन् त्याचेच विष त्याच्या शरीरात पसरून तो मरतो... त्याच्या तोंडात दोन सुळे असतात अन् त्याच्या मुळाशी ही विषाची पिशवी असते. श्र्वापदाला चावताना ते सुळे तो त्याच्या शरीरांत खुपसतो अन् ते इंजेक्शनच्या सिरींज सारखे असतात. पोकळ, समोर छिद्र असलेले. त्यातून तो विष दंश करताना इंजेक्ट करतो. त्याची ही पिशवी गारुडी काढतात; पण ती पुन्हा सहा महिन्यांनी त्यांना येते. इच्छाधारी नाग नसतात, हे डॉ. सलीम यांनी खूप परिश्रमाने सिद्ध केले आहे. नागमणी हा प्रकारदेखील नसतो. माणसाचे जसे रक्त गोठते अन् त्याच्या गुठळ्या त्वचेवर दिसतात, तसेच हेही. म्हणजे त्याचे विष गोठते अन् त्याची गोळी तयार होते. ती बाहेर टाकायला त्याला वेळ लागतो. त्या काळात तो गोळीवर त्याचीच लाळ जमा होत जाते. ती चोपडी, चमकदार होते. काही काळाने तो ती गोळी ओकू शकतो. तेव्हा शरीराबाहेर टाकतो... त्याला लोक नागमणी म्हणतात. तो औषधी असू शकतो, मात्र चमत्कारी वगैरे नसतो. हे सारे नागज्ञान त्या मित्राने नाग पोसल्याने प्राप्त झाले आहे. राहून गेलेली हा नागाची कहाणी आज सुफळ संपूर्ण करून टाकली!
@@AUTHORINFO_V1@@