अटलजी, एक अढळ, ‘अटल’ व्यक्तिमत्त्व ! : डॉ. सुरेश हावरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2018
Total Views |





 

मुंबई : माजी पंतप्रधान, 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पक्ष किंवा अटलबिहारी वाजपेयी आणि देश हे एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. कारण अटलजी हे पक्ष, देशाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अटलजी हे एक अढळ, अटल व्यक्तिमत्त्व होते, अशी भावूक प्रतिक्रिया श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष तथा भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केली.

 

 
राजहंस प्रकाशन व महाराष्ट्र एकता अभियानद्वारा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना 'शब्दसुमनांजली' हा कार्यक्रम दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार, महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, भाजप प्रवक्ते मधू चव्हाण, राजहंस प्रकाशनचे संपादक आनंद हर्डीकर, उद्योजक विठ्ठल कामत, वरिष्ठ पत्रकार व लेखक सारंग दर्शने, महाराष्ट्र एकता अभियानचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेश हावरे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. परंतु, अणुचाचणीसारखा अत्यंत कठीण असा निर्णय घेणारा एक कणखर नेता दुसरीकडे एक कवीमनाची, संवेदनशील, हळवी व्यक्ती कशी असू शकते, असा प्रश्न मला पडतो. यावेळी डॉ. हावरे यांनी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. यामध्ये पोखरण अणुचाचणीसह टेलिकॉम धोरण, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग, सर्व शिक्षा अभियान, कारगिल युद्धादरम्यान 'ऑपरेशन विजय' आदींचा त्यांनी उल्लेख केला. यामध्येही पोखरण अणुचाचणी निर्णय सर्वांत कठीण आणि परिणामकारक होता, असे त्यांनी नमूद केले.

 

 
डॉ. सुरेश हावरे यांनी यावेळी पोखरण-२ अणुचाचणीच्या वेळी घडलेल्या घटना, अण्वस्त्र चाचणीच्या वैज्ञानिक प्रक्रिया व अणुचाचणीनंतर जागतिक पटलावर उमटलेल्या प्रतिक्रिया यांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, याबाबत १९९४-९५ पासूनच विचारमंथन सुरू होते परंतु तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. अटलजींनी तो निर्णय घेतला. कारण, अटलजी हे 'मॅन ऑफ डिसिजन्स' होते, असे ते म्हणाले. अटलजींवर वरिष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेल्या पुस्तकाप्रमाणेच आणखी असंख्य पुस्तके लिहिली जावीत, असेही आग्रही मत सुरेश हावरे यांनी यावेळी मांडले. या कार्यक्रमात पत्रकार सारंग दर्शने, उद्योजक विठ्ठल कामत, राजहंसचे संपादक आनंद हर्डीकर, भाजप प्रवक्ते मधू चव्हाण, महाराष्ट्र एकता समितीचे मिलिंद तुळसकर यांनीही अटलजींविषयी आपापल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
 

मुंबई-महाराष्ट्राशी घट्ट नाते असलेले नेतृत्व

 

अटलबिहारी वाजपेयी हे मुंबई आणि महाराष्ट्राशी घट्ट नाते असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी नमूद केले. ते म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राशी अटलजींचे घट्ट नाते होते. त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक चढ-उतारांत मुंबई-महाराष्ट्र साक्षीदार राहिला. १९८० मध्ये भाजपची मुहूर्तमेढ मुंबईतच रोवली गेली. त्यावेळी वाजपेयी यांनी 'अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' ही गाजलेली घोषणा केली. ही घोषणा त्या काळी काही वर्तमानपत्रांना छापावीशीही वाटली नव्हती. परंतु, ही घोषणा पुढे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. पुढे १९९५ मध्ये मुंबईत शिवाजी पार्क येथे झालेले भाजपचे महाअधिवेशनदेखील अटलजींच्या आयुष्यात महत्वाचे ठरले. त्यानंतरचा इतिहास आपणा सर्वांनाच माहिती आहे, असे आशिष शेलार यांनी नमूद केले. हजरजबाबी असणे, हा अटलजींचा मला सर्वांत भावणारा गुण असल्याचे सांगत आशिष शेलार यांनी अटलजींच्या हजरजबाबीपणाचे असंख्य गंमतीदार प्रसंग उपस्थितांना सांगितले. अटलजी हे ज्ञानेश्वरीचे पठण-वाचन केलेले पंतप्रधान होते, अशीही आठवण शेलार यांनी यावेळी सांगितली. अटलबिहारी वाजपेयी हे एका दीपस्तंभासारखे नेतृत्व होते, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.
 
 

अटलजींचे एकेक पैलू विलक्षण

  

अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एकेक पैलू विलक्षण होते, असे मत महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, अटलजींना आदरांजली वाहण्याची वेळ आपणा सर्वांवर कधी ना कधी येणार, हे आपणा सर्वांना दिसत होतेच. यावेळी 'मै जी भर जिया' या वाजपेयी यांच्या कवितेचा उल्लेख भांडारी यांनी केला. गेली १० वर्षे सार्वजनिक जीवनातून अटलजी दूर होते. अशी व्यक्ती विस्मरणात जायला वेळ लागत नाही. भारतीय राजकारणात अशी अनेक नावे आहेत. या पार्श्वभूमीवर गेली १० वर्षे दूर असलेल्या अटलजींच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत जेव्हा बातम्या येऊ लागल्या, तेव्हा देशभरात उडालेला कल्लोळ अटलजींचे मोठेपण सांगतो. देशात हे भाग्य खूप कमी जणांना लाभल्याचे भांडारी म्हणाले.

 

 
अटलजींचा सहवास ज्यांना लाभला, ते खूपच भाग्यवान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी वाजपेयी यांच्या १९८३ मध्ये कोकणातील देवगड येथे झालेल्या सभेची आठवण सांगितली. अशा देशातील छोट्यामोठ्या गावांत केवळ कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी अटलजी गेले होते, असेही भांडारी यांनी सांगितले. अटलजी हे एक अत्यंत निर्मळ, निर्व्याज मनाचे नेते होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या भवितव्याला आकार देण्याचे काम जर कोणी केले असेल, तर ते केवळ अटलबिहारी वाजपेयी यांनीच, अशा शब्दांत वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव करत माधव भांडारी यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@