‘अगली बारी’ नाही, आता ‘निरंतर बारी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018   
Total Views |




 


अगली बारी अटल बिहारीही घोषणा १९६० च्या दशकात जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कालक्रमानुसार होत गेल्या. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जनसंघाच्या तिकीटावर जे उभे होते, त्यापैकी कितीजणांची डिपॉझिट वाचली,याची झाडाझडती होत असे. फारसे लोक निवडून येणे शक्य नव्हते. परंतु, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जिद्द एवढी तगडी ही पुढची निवडणूक आली की, मागच्या निवडणुकीत आपटी खाल्लेले, सणसणीत मार खाल्लेले, कार्यकर्ते घोषणादेत, ‘अगली बारी अटल बिहारी’

 

 
तेव्हा जनसंघाच्या विरोधकांना याचे फार हसू येई. आज परिस्थिती बदलली आहे. काल हसणारे आज रडत आहेत. निवडणुकांत सतत आपटी खाणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये एवढा अगम्य विश्वास कशामुळे निर्माण होत असे? त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण, ‘आज जरी ठरलो वेडे, गातील सगळे उद्या पोवाडे, देतील आमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण’ हा स्वत:विषयीचा ठाम आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास विचारधारेतूननिर्माण झालेला होता. विचारधारा सत्यावर अधिष्ठीत आहे. ‘सत्य’ हे धर्माचे दुसरे नाव. ‘जिथे धर्म तिथे विजय’ हे ठरलेले समीकरण आहे. आज आपण हरलो तरी ‘उद्या’ विजयी होणारच, हा विश्वास. हा ‘उद्या’ पाच वर्षांनंतर येईल, नाही तर वीस वर्षांनंतर येईल, त्याची चिंता करायची नाही.

 

 
या दुर्दम्य आशावादाचे प्रतीक झाले होते, ‘अटल बिहारी वाजपेयी.’ वक्ता दशसहस्रेषु... अन्यथा आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचे तर, “गेल्या दहा हजार वर्षांमध्ये असा वक्ता झाला नाही.” अटलजींच्या भाषणाची नक्कल करता येते, परंतु उत्स्फूर्तपणे अटलजींचे भाषण कुणाला करता येत नाही. अटलजींच्या जीभेवर वाक्देवतेचा निवास होता. त्यांचे भाषण विचारांच्या अधिष्ठानावर, परिस्थितीच्या यथायोग्य आकलनावर, विरोधकांच्या मर्मस्थानावर आणि कार्यकर्त्यांना व पक्षाला दिशादर्शन करण्यावर उभे असे. दुसऱ्याची वैगुण्य दाखविण्यात अनेकांना आसुरी आनंद होतो. काहीजणांना जातीच्या खपल्या काढण्यात समाधान वाटते, तर इतर काहीजणांना कंबरेखाली वार करण्यात धन्यता वाटते. काहीजण वरच्या पट्टीत बोलून शाब्दिक कसोट्या करून, खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सभा गाजवितात. आपल्या सभोवताली अशा सभावीरांची गर्दी झालेलीआपण पाहू शकतो. अटलजी त्यातले नव्हते. ते सभावीर होते, परंतु सभारंजक नव्हते. ते पोकळ विरोधकभंजक होते, परंतु वेळप्रसंगी विरोधकांचे रक्षकही होते. म्हणून त्यांच्यासारखे भाषण त्यांनीच करावे.

 

 
अटलजींकडे कधीही गंजला न जाणारासोन्यासारखा बावनकशी विचार होता. शालेय जीवनात ते संघाचे स्वयंसेवक झाले. संघशाखेत खेळता खेळता संघसंस्कार त्यांच्या शरीरात मुरत गेला. विचाराने त्यांच्या बुद्धीत प्रवेश केला आणि ते तन-मन आणि बुद्धीने संघमय झाले. कधी आणि कसे हे सगळे घडले असेल, हे सांगता येणे अवघड आहे. संघ प्रचारक झाले आणि नंतर जनसंघाची स्थापना झाल्यावर त्यांना जनसंघात पाठविण्यात आले. राजघराण्याची कोणतीही परंपरा नसलेला हा युवक राजकारणातील एक खिलाडू बनला. जनसंघाच्या स्थापनेनंतर अल्पकाळातच जनसंघ संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाला आणि पक्ष पोरका झाला, पण अनाथ झाला नाही. एखाद्या व्यक्तीविषयी निष्ठा वाहून काम करण्याची सवय संघस्वयंसेवकांना नसते, अटलजींनादेखील ती नव्हती.श्यामाप्रसादजी गेले, आता जनसंघ आपल्यालाच वाढवायचा आहे. अटलजींचे निरंतर दौरे सुरू झाले. सगळा देश त्यांनी पिंजून काढलाअटलजी म्हणजे चैतन्याचा वाहता झरा होता. देशाच्या ज्या ज्या भागात ते गेले, तेथे चैतन्य सळसळले आणि कार्यकर्ते अटलजींच्या प्रेमात पडले. ‘देश का नेता कैसा हो? अटल बिहारी वाजपेयी जैसा हो।’ या घोषणेचा आपोआप जन्म झाला. म्हटलं तर ही व्यक्तिनिष्ठ घोषणाआहे. राजकारणात विचारांचे आणि आकांक्षाचे प्रतीक बनून व्यक्तीच पुढे यावी लागते. ईश्वर जरी निर्गुण निराकार असला तरी, त्या निर्गुण निराकाराची कुणी पूजा करीत नाही, त्याला आपण मूर्ती रूपात आणतो आणि निर्गुणाला सगुण करून टाकतो. अटलजींच्या विषयीचा भक्तिभाव या प्रकारात मोडणारा होता. अटलजी म्हणजे विचार, पण विचार दिसत नाहीत, अटलजी दिसतात आणि म्हणून म्हणत राहायचे, ‘अगली बारी अटल बिहारी’

 

 
आणि खरोखरच १९९८ साली ‘अगली बारी अटल बिहारी’ ही घोषणा खरी झाली. कार्यकर्त्यांनी खरी करून दाखविली. प्रथम तेरा दिवस, मग तेरा महिने, आणि मग जवळजवळ पाच वर्षे अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. ‘पंतप्रधान बनणे’ ही त्यांच्या जीवनाचीव्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यांना ‘पंतप्रधान बनविणे,’ ही विचारधारेची महत्त्वकांक्षा होती. ती सफल करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट आणि वाट्टेल तो त्याग करण्यास अगणित कार्यकर्ते कंबर कसून तयार होते, असे भाग्य सगळ्यांना प्राप्त होत नाही. अटल बिहारी पंतप्रधान झाले, पंतप्रधान म्हणून त्यांचा शपथविधी झाला. त्यावेळचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस भावूक झाले आणि त्यांचे डोळेदेखील पाणावले. सरसंघचालकांची ही अवस्था तर सर्वसामान्यांच्या घरी दिवाळीच साजरी झाली. अशक्य ते शक्य झाले, हे आपण करून दाखविले, याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. या आनंदाची पत वेगळी, त्याची उंची वेगळी, त्याची खोलीदेखील गहन. ‘लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग-तपस्येतून, त्यांच्या इच्छा-आकांक्षेचे प्रतीक म्हणून मी या पदावर पोहोचलो आहे,’ याची जाणीव अटलजींना सातत्याने होती.

 

 
यामुळेच अटलजी सत्तेत असूनही सत्ता-अहंकारापासून दूर होते. सत्तेची मस्ती त्यांना कधी चढली नाही. तसे ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. पद मिळत नव्हते म्हणून खेद नव्हता आणि पद मिळाले म्हणून आनंददेखील नव्हता. कवीमन तसेच जागृत होते. पदावरगेल्यानंतर त्यांच्यातील कवीमनाला, “देवा, मला एवढी उंची देऊ नकोस की ज्यामुळे मी आपल्या लोकांपासून दूर जाईन, कुणाची गळाभेट घेणेदेखील मला शक्य होणार नाही, मला सामान्यच ठेव,” अशी याचना करावी लागली. आपले स्वयंसेवकत्व ते कधी विसरले नाहीत. ‘मी कोण?’ याचे त्यांच्यापुरते उत्तर होते, ‘‘मी एक संघस्वयंसेवक.’’ हे सतत सांगावे लागत नाही, गणवेश घालून त्याचे प्रदर्शन करावे लागत नाही, जीवनाच्या रोजच्या व्यवहारातून ते प्रकट व्हावे लागते. अटलजी म्हणजे स्वयंसेवकत्वाचे जीतेजागतेप्रकटीकरण होय. राजकीय क्षेत्रात हे त्यांनी प्रकट केले. संघस्वयंसेवकाचे पहिले काम सर्वांशी स्नेहमय संबंध ठेवण्याचे असते. जे संघात आले ते आपले आणि जे संघाच्या बाहेर आहेत तेही आपलेच, अशी आपलेपणाची भावना, त्याला सदैव जागृत ठेवावी लागते, त्याला कुणीही परका नसतो. मानसिक स्तरावर तो विश्व नागरिक असतो. हे विश्वची माझे घर, अशी त्याची मनोवृत्ती असते. राजकीय क्षेत्रात हा या विचाराचा, तो त्या विचाराचा, आणि याने आपल्याला विरोध केला, याने आपले पाय खेचले, यांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयोग केला, असा कोणताही भाव मनात न ठेवता स्वयंसेवकाने राजकीय क्षेत्रात काम करायचे असते. आज त्यांना आपलाविचार समजत नाही, त्याची चिंता करायची नाही. चिंतन करून आपला विचार त्यांना कसा पटवून द्यायचा याचा मार्ग शोधायचा. अटलजी हे जीवनभर करीत राहिले.

 

 
त्यांनी जे सरकार बनविले त्यात जवळजवळ तीस राजकीय पक्ष सहभागी झाले होते. ते संमिश्र सरकार होते. ते त्यांनी उत्तम प्रकारे चालविले. जगाला त्याचे आश्चर्य वाटले, भारतीयांना त्याचे आश्चर्य वाटत नाही. कारण आपला भारतीय स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. एखादा दुसरा विचार करतो म्हणून त्याला वाळीत टाकण्याचा आपला विचार नाही. दुसऱ्याशी चर्चा करून सहमती निर्माण करणे, सहमती निर्माण करताना आपले काही विषय सोडून देणे आणि दुसऱ्याचे काही विषय स्वीकारावे लागतात. यालाच विचारांचा समन्वय म्हणतात, अटलजी असे समन्वयमूर्ती होते. आपल्या विरोधकांच्या मनातही आपल्याविषयी आदराची आणि विश्वासाची भावना कशी निर्माण करावी, याचा वस्तूपाठम्हणजे संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे जीवन आहे. सगळे स्वयंसेवक डॉ. हेडगेवारांच्या जीवनाचे कणच असतात. अटल बिहारी वाजपेयी यांनी डॉक्टरांचा हा भाव आपल्या जीवनात पूर्णपणे उतरविला होता. माजी पंतप्रधान नरसिंह राव म्हटले तर विरोधी पक्षाचे, पण त्यांचा अटलजींवर प्रगाढ विश्वास. अटलजींच्या हाती पंतप्रधानांची सूत्रे देताना पोखरण अणुस्फोटाच्या चाचणीची जी सर्व तयारी करण्यात आली होती, त्याची माहिती नरसिंहराव यांनी दिली. त्यांच्याबरोबर काम करताना जॉर्ज फर्नांडिस यांना कुठली अडचण आली नाही. आपला विचार आपल्या व्यवहारातूनच लोकांना समजेल, हे अटलजींनी सिद्ध करून दाखविले.

 

 
अगली बारी अटल बिहारी’ याचा अर्थ अटल बिहारींनी पंतप्रधान व्हावे,एवढाच नाही, त्याचा अर्थ असा होतोकी, ज्या विचारधारेचे प्रतिनिधीत्व अटल बिहारी करतात, त्या विचारधारेची अगली बारी आहे. ही विचारधारा राष्ट्रीय विचारधाराआहे. राष्ट्र प्रथम, मी नंतर आणि पक्षही त्यानंतर, हे या विचारधारेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ही विचारधारा केवळ अगली बारी म्हणून चालणार नाही, तर ही विचारधारा या देशाची निरंतर विचारधाराझाली पाहिजे. विचारधारा मानणार्‍या पक्षांची लेबले बदलतील, परंतु गाभ्याचा विचार एकच राहील. या गाभ्याच्या विचारातआम्हाला जातीच्या आधारे राजकारण करायचे नाही, उपासना पद्धतीच्या आधारे राजकारण करायचे नाही, काही घराण्यांना राजगादीवर बसविण्यासाठी राजकारण करायचे नाही, अफाट संपत्ती मिळविण्यासाठी राजकारण करायचे नाही, मतांसाठी वाटेल त्या तडजोडी करण्यासाठी राजकारण करायचे नाही, असे सर्व विषय येतात. हे विषय भाषणे देऊन मांडता येतात. त्याचे परिणाम शून्य असतात. हे विषय पक्षपातळीवर जगावेलागतात. पक्षाचा तो स्वभाव करावा लागतो. पक्षाचे तसे रूप व्हावे लागते. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या राजर्षी जीवनाने पक्षाला असे रूप प्राप्त करून दिलेले आहे. हा त्यांचा वारसा खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे, पक्षाच्या सीमा ओलांडून जाणारा आहे, देशात असणार्‍या इतर पक्षांनी त्याचे अनुकरण करावे असा आहे. या अर्थाने अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय पक्षाच्या सीमा ओलांडून गेलेले एक थोर राष्ट्ररत्न ठरतात. रत्नाची प्रभा भूलोकावर ठेवून ते अनंताच्या यात्रेसाठी निघून गेले आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम!
 
 
@@AUTHORINFO_V1@@