केरळला आवश्यक ती सर्व मदत करू : पंतप्रधान मोदी
महा एमटीबी   16-Aug-2018तिरुवनंतपुरम : केरळमध्ये आलेल्या महापूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व मदत केरळ राज्याला केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केरळमध्ये पूरस्थितीचा आढाव्यासाठी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले आहे.


गेल्या पाच दिवसांपासून केरळमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी विजयन यांनी राज्यातील सद्यस्थितीची पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच आवश्यक असलेल्या मदतीची देखील माहिती दिली. यावर पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांना याठिकाणी जातीने लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केरळला आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केरळमध्ये पहिल्यांदाच महापूर आला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात लाखो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तसेच ८ हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असून राज्यातील १० हजार किमी लांबीचे रस्ते देखील या पूरामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे लष्कराला देखील याठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.