उच्च शिक्षण आणि समाजविकास...
महा एमटीबी   15-Aug-2018

 
 
आज देशभरात हजाराचे वर असलेल्या विविध विद्यापीठांमधून अर्ध्या लाखाच्या आसपास असलेल्या नानाविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविणार्या महाविद्यालयांमधून कोट्यवधी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. वयाने तरुण असलेल्या या वर्गाचा समाजविकासामध्ये कितपत हातभार लागतो, यावर चितन होणे गरजेचे आहे. सामाजिक बदल अर्थात सुधारणा किंवा प्रगती/विकास या अर्थाने बदल घडवून आणण्यात या मोठ्या संस्थेतील उच्च शिक्षित समाजघटकाचा सिंहाचा वाटा असणे अपेक्षित आहे. होणार्या सुधारणांमध्ये समाजघटकांचे परस्परसंबंध, परस्परवर्तन, परस्परव्यवहार सुधारणे, समाजसंस्था उत्क्रांत होणे अपेक्षित आहे.
 
 
तेव्हा उपरोक्त अपेक्षित बदल वा सुधारणा आजची उच्च शिक्षणव्यवस्था पूर्ण करते काय? असा प्रश्न विचारल्यास दुर्दैवाने त्याचे उत्तर नकारार्थीच येणार, हे निश्चित आहे. आज आपली उच्च शिक्षण शक्ती ही केवळ कागदावर ताकदवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी स्वातंत्र्यानंतर झालेल्या उच्च शिक्षणाचा फैलाव उपरोक्त आकडेवारीमध्ये आलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडलेल्या काही मोजक्या व्यक्तींनी जो समाजाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये हातभार लावला होता तो लाखमोलाचा होता. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, गुरूमूर्ती, रानडे, आगरकर, रोमेशचंद्र बॅनर्जी, म. जोेतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी, गोखले... अशी अनेक नावे घेता येतील. तुलनात्मकदृष्ट्या त्या काळापेक्षा- त्यांना उपलब्ध शैक्षणिक साधनांपेक्षा आज हजार पटीने जास्त उपलब्धता असूनही तेवढा सामाजिक बदल व सुधारणा आजच्या उच्च शिक्षण व्यवस्थेने साधलेल्या नाहीत. मात्र, त्या समाजधुरिणांना तत्कालीन समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्ती यांच्या विविध धारणा, कल्पना, मनोभूमिका, त्यांचे दृष्टिकोन सामाजिक बदलांना अनुकूल करून घेण्यास यश मिळाले. तसे आज ताकदवर शक्ती समजल्या जाणार्या उच्च शिक्षण व्यवस्थेकडून होताना दिसत नाही, हे कटु असले तरी सत्य आहे.
 
 
 
त्यांनी जी स्त्रियांच्या दयनीय स्थितीत बदल घडवून आणण्याची किमया साधली, अस्पृश्यता निवारणासाठी त्या काळात झालेले प्रयत्न, सतीच्या चालीसारख्या अमानवी प्रथांवर केलेला निर्णायक प्रहार, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले लिखाण वा झालेले प्रयत्न, हे आजच्या तुलनेत सरस होते, हे सत्य नमूद करावेसे वाटते. आज जेवढ्या वेगात शिक्षणप्रसार होतो आहे, तेवढ्याच िंकबहुना त्यापेक्षा अधिक जोमाने प्राचीन रूढी-परंपरा, जातीय पंचनिवाडे डोके वर काढताना दिसत आहेत. निवडणुकीत होणारे मतदान अधिकाधिक जातीय आधारावर होत आहे, स्त्रियांवर होणार्या अत्याचारांमध्ये मानवतेला लाजविणारी क्रूरता वाढत आहे, हुंडाप्रथा वा लग्नात केला जाणारा खर्च चंद्राच्या कलेकलेने वाढत आहे. स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा कल वाढताना दिसतो आहे. मुलीचा गर्भ नको यासाठी पालक व उच्चविद्याविभूषित डॉक्टर हे आजच्या विकसित उच्च शिक्षणव्यवस्थेने निर्माण केलेली अपत्ये आहेत. तेव्हा असा विचार पडणे स्वाभाविक आहे की, मग आपल्या शिक्षणव्यवस्थेला समाजघटकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक का बनविता आला नाही? कायदे करूनही आम्ही हुंडापद्धती का नाही बंद करू शकलो?
 
 
 
उच्च शिक्षणाद्वारे होणारे प्रबोधन का कुचकामी ठरावे? हे न सुटणारे कोडे आहे. समाज म्हणून आजही आम्ही दुभंगलेले आहोत. एका बाजूने उच्च शिक्षित तरुण घटकांचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडत असताना आम्ही अतिशय अतार्किक, अवैज्ञानिक, अंद्धश्रद्धायुक्त अशा अविचारी प्रथा व परंपरांचे समर्थन करताना दिसतो आहोत. हे महासत्तेकडे जाण्याचे लक्षण निश्चितच नाही. ही रोगट मानसिकता, हा भयंगड, लोक काय म्हणतील ही भीती जाणार नाही, तोपर्यंत असेच घडत राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बर्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले पी. सी. अलेक्झांडर यांचा एक लेख या निमित्ताने आठवतो. त्याचे शीर्षकच याच अर्थाने उल्लेखनीय आहे. ते असे- ‘शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होतो काय?’ प्रस्तुत लेखात उच्च शिक्षितांच्या मानसिकतेवर चांगला प्रकाश टाकला होता. अनेक उदाहरणांनी शिक्षितांपेक्षाही अशिक्षित वा अडाणी कसा माणुसकी, नैतिकता, चांगुलपणा, मानवतावाद, भूतदया, बंधुता, समानता, प्रेम, राष्ट्रभक्ती इत्यादी समाजसुधारणेची पायाभरणी करणार्या कसोट्यांवर उतरतो, हे स्पष्ट करता येईल. एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास शहरांमध्ये ज्याला सुशिक्षित- उच्च शिक्षित यांची वस्ती म्हणतात अशा ठिकाणी एखाद्या अपरिचित व्यक्तीने एखादे ठिकाण विचारल्यास शहरी मनुष्य (उच्च शिक्षित) संबंधितास हवे ते ठिकाणही सांगण्यास वेळ देत नाही. तेच ही घटना खेड्याशी (अशिक्षित) संबंधित असल्यास त्या अपरिचितास हवे त्या ठिकाणी पोहचविण्याची माणुसकी दाखविली जाते.
 
 
आज महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर भरणारे जातवार मेळावे, संमेलने पाहिले की, आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहोत, याबद्दल चिं+ता वाटल्याशिवाय राहात नाही आणि याला खतपाणी घालून स्वत:ची आणि स्वपक्षाची पोळी भाजून घेणारी राजकारणी मंडळी अशा समाजाचे नेतृत्व करतात म्हटल्यानंतर भारत महासत्ता बनण्याचे केवळ स्वप्नच तर राहणार नाही? अशी भीती वाटते. ज्या महानुभावांनी या समाजाला योग्य दिशा दाखवून समता, बंधुता, मानवता ही नैतिकता शिकविली, त्यांच्या नावाचा उपयोग करून, त्यांचे आपल्या प्रशस्त हॉलमध्ये फोटो लावायचे, त्यांच्या पुतळ्यांना सभासमारंभ, संमेलने यानिमित्ताने हार घालायचा, त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजर्या करायच्या आणि वागणूक मात्र ‘मुख मे राम, बगल मे छुरी’ अशी ठेवायची, असे बेगडीपणाचे आचरण करणारे समाजाचे नेतृत्व करणारे उच्च शिक्षित नेतृत्व देशाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हे कटु असले तरी सत्य आहे. वेगवेगळ्या बाबींच्या आधारावर समाज जेवढा दुभंगलेला राहील, तेवढी या नेत्यांची पोळी चांगली भाजून घेतली जाईल, हेच खरे सत्य आहे. म्हणूनच ही मंडळी सामाजिक सुधारणा, संकल्पना व त्याची व्याप्ती आपल्या सोईसोईने अर्थ लावून अंमलबजावणीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करत असतात. हे खरे देशाच्या प्रगतीचे मारेकरी आहेत. हे आपण ओळखले पाहिजे.
 
 
 
 
अजूनही स्त्रीला सर्व स्तरावर 50% तर सोडाच, 33% देखील राजकीय व प्रशासकीय आरक्षण बहाल झालेले नाही. दुसरीकडे गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढताना दिसते आहे. आजही अर्धपोटी राहणार्यांची संख्या अर्धी आहे. मुळातच प्रचंड संपत्तीचे धनी असलेल्या-निवडून येणार्या खासदार-आमदारांना 5 वर्षांनंतर आयुष्यभर भरघोस पेन्शन, तर दुसर्या बाजूने 1000 रुपये पेन्शनवर जगणार्यांना तेही वेळेवर मिळण्याची मारामार, अशी विदारक स्थिती आहे. तिसर्या बाजूने कमी होण्याऐवजी वेगाने वाढणारा व देशाला पोखरणारा, अलिखित नियम बनलेला भ्रष्टाचार आम्हाला निमूटपणे शरण आणतो आहे. धनदांडग्यांना, बुडव्या उद्योगपतींना, देशाबाहेर पळणार्यांना क्षणाचाही विलंब न करता सढळ हाताने कर्ज देणारे बँक प्रशासन, गरीब बिचार्या शेतकर्यांना दारात उभे करायलाही तयार नसते. हे विदारक चित्र आमच्या समाजाचे आहे. हा प्रपंच करणारे अधिकारी सर्व उच्च शिक्षित आहेत. प्रश्न असा पडतो की, त्यांनी पिलेल्या ज्ञानरूपी वाघिणीच्या दुधाने निर्माण होणारी खरेखोटे, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर हे समजण्याची पात्रता कुठे नष्ट झाली? या उच्च शिक्षितवर्गाला गरिबाचे फाटकेपण दिसत नाही काय? याची जाणीव एवढी बोथट झाली काय? आमच्या शिक्षणाची ताकद कशी क्षीण झाली? याचे एक मुख्य कारण उच्च शिक्षितांच्या स्वमग्नतेत सापडते. ‘‘मला काय त्याचे? मी भला व माझे काम भले, कामाशी काम व रामाशी राम.’’ ही या वर्गाची प्रवृत्ती एका अर्थाने निवृत्ती घेतल्याचे लक्षण आहे. अशाने अपेक्षित असणारा, समाजाला पुढे नेणारा समाजबदल वा सुधारणा कशी होणार?
डॉ. अण्णासाहेब म्हळसने
9421774433