परिस्थितीने घडलेला उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |



‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज’ अर्थात ‘डिक्की’चे मुंबई अध्यक्ष संतोष कांबळेंसारखे युवा उद्योजक उद्योगक्षेत्रात येणाऱ्या नवतरुण उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.

 

संतोष कांबळे हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष. धारावीला त्यांचा बॅग्स, भेटवस्तू बनवण्याचा कारखाना आहे. 600 मशीन्स आहेत आणि 150 कॉर्पोरेट कार्यालयांशी त्यांचा व्यवसाय सुरू आहे. कोट्यवधींची उलाढाल करणारे संतोष कांबळे. संतोष यांनी उद्योगाचा हा वृक्ष रूजवला तरी कसा? संतोष कांबळे या तरुण आणि यशस्वी उद्योजकाचा जीवनक्रम पाहिल्यानंतर वाटते की यशस्वी उद्योगपती बनू इच्छिणार्‍यांच्या मनात यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हवी. संतोष हे काही ठरवून उद्योगपती किंवा व्यावसायिक झाले नाहीत. चिराबाजार मरीन लाईन्सच्या चाळीत त्यांचे कांबळे कुटुंब राहायचे. जगन्नाथ हे वडील आणि शोभा ही आई. यांना एकूण चार अपत्ये. त्यातले सर्वात लहान चिरंजीव संतोष. लहानपणापासून हरहुन्नरी, मेहनती आणि सातत्यपूर्ण कष्टावर विश्वास ठेवणारे. जगन्नाथ हे कापडी पिशव्या शिवण्याची ऑर्डर घेत. कापडी पाऊचही बनवत. घरात दोन शिलाई मशीन्स आणि दोन कामगार. जगन्नाथ व त्यांची चार मुले ही काम करीत असत. चौथीला असल्यापासून संतोषही घरच्या व्यवसायात वरवरचे काही काम करायचे. एकदिवशी जगन्नाथ यांना मोठी ऑर्डर मिळाली. पाच हजार कापडी पाऊचची. काही दशकांपूर्वी चाळीस हजार रुपयांचे काम एकहाती मिळणे सोपे नव्हते. पण, ती ऑर्डर मिळाली होती. कांबळे कुटुंबीयांनी ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक केले. ऑर्डर पूर्ण झाली, पण ऑर्डर देणारा माणूस पाच हजार कापडी पिशव्या घ्यायला आलाच नाही. त्या पिशव्या बनवण्यासाठीची मेहनत, ऊर्जा, कच्चा माल भांडवल वाया जाणार होते, हे निश्चित. घरगुती व्यवसाय करणाऱ्या अत्यंत छोट्या व्यावसायिकासाठी तर हा मोठा आघात होता. सातवीत शिकत असलेल्या संतोष हे सारे पाहत होता. त्याने निर्णय घेतला. नुकसान का सोसायचे? शाळेतून आल्यावर संतोष ते पाऊच रस्त्यावर विकू लागले. स्टेशनवरही विकू लागले. त्यावेळी संतोषला जगाचे नियम कळले. पाऊच विकताना या छोट्या मुलाला स्टेशनवरच्या सराईत गुन्हेगारांनी, नशाखोरांनी आणि पोलिसांनीही अनेकवेळा हटकले असेल. या दिवसांमध्ये संतोष शिकले की सर्व संकटांना, व्यत्ययांना, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपला उद्योग कसा करायचा; त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेशी, प्रशासनाशीही कसे वागायचे? हे शिकले.

 

काम करता करता संतोष शिकत होते. चिराबाजारमध्ये 27 सराफांची दुकाने होती. सणासुदीला हे सराफ आपल्या गिर्‍हाईकांना पाऊच, बॅग भेट देत असत. संतोषच्या मनात विचार आला. या सराफांकडून ऑर्डर घेतली तर... किशोरवयीन संतोष घरातील पाऊच व बॅग्सचे नमुने घेऊन एका दुकानात गेले. काचेचा दरवाजा असलेले भव्य दुकान. दुकानाची भव्यता पाहून संतोष दारात घुटमळले जाऊ की नको जाऊ? मनाचा हिय्या करून ते आत गेले. समोरच्या शेठजींना आपल्याकडील पाऊचचे नमुने दाखवू लागले. भव्य दुकानातील तो शेठ संतोषकडे पाहत होता. संतोष यांना वाटले की, तो ऐकतो आहे. ते आणखी काही बोलणार इतक्यात शेठ ओरडला, “गुरखा, इसको बाहर निकाल। ये अंदर कैसे आगया।” दु:ख व संताप यांनी डोळ्यात आणि मनातही दाटी केली होती. संतोष तिथून बाहेर आले. पाच-सहा दिवस विमनस्क अवस्थेत गेले. त्यांनी ठरवले, आपण व्यवसाय करूच शकत नाही. यावेळी त्यांना आई-बाबा आणि मित्रांनी समजावले. आई तर म्हणायची, “तुला तर टाटा-बिर्ला व्हायचे आहे.” संतोष पुन्हा कामाला लागले. 27 दुकानांपैकी सहा दुकांनाची ऑर्डर मिळाली. उत्तम दर्जा, गुणवत्ता आणि उच्च दर्जाचे व्यावसायिक संबंध यामुळे पुढच्या वर्षी 18 दुकानांच्या ऑर्डर मिळाल्या. चिराबाजारमध्ये संतोष यांचे नाव झाले आणि तो दिवस उजाडला; ज्या दुकानदाराने संतोष यांना दुकानाबाहेर काढले होते, त्याने संतोष यांना अगत्याने बोलावले. परिसरात सगळ्यांना पाऊच बनवून ते आमच्याकडे का देत नाही? म्हणून विचारले. पाऊच बनवूनच दे, असे आग्रहाने सांगितले. संतोषच्या मनात वादळ सुरू होते. दुकानदाराने त्यांना ओळखले नव्हते पण, संतोष दुकानदाराला कसे विसरणार? संतोष म्हणतात,”मी त्याला काहीही म्हणालो नाही. पण, त्याने केलेल्या अपमानाची परतफेड म्हणून मी एका पाऊचची किंमत बारा रूपयांनी वाढवून घेतली. त्याने केलेल्या अपमानाचा बदला व्यवसायातला नफा वाढवून फेडला.”

 

संतोष पुढे इंजिनिअर झाले. खाजगी कंपनीत कामाला लागले. एके दिवशी वडिलांनी संतोष यांना सांगितले की, “घरच्या व्यवसायात मदत कर.” संतोष यांनी नोकरी सोडून व्यवसायात लक्ष देणे सुरू केले. हजारोंचा व्यवसाय लाखोंचा झाला. लाखोंचा व्यवसाय करोडोंचा झाला. पुढे ‘डिक्की’चे सदस्य झालो. तिथेही अथक प्रयत्न संपर्क यांच्या माध्यमांतून ‘डिक्की’चे मुंबईचे अध्यक्ष झाले. संतोष म्हणतात, डिक्की हे व्यावसायिकांसाठी चांगले व्यासपीठ आहे. सातत्यपूर्ण मेहनत, कामाच्या प्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे यश मिळतेच मिळते.” संतोष यांच्यासारखे उद्योजक हे नवउद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.

9594969638

@@AUTHORINFO_V1@@