संघ अब्रुनुकसानी खटल्याची पुढील सुनावणी १० सप्टेंबरला
महा एमटीबी   10-Aug-2018
भिवंडी : २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारकाळात भिवंडी येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा संबंध संघाशी जोडणारे विधान केले होते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी दि. १० सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट अर्जातील हिंदी इंग्रजीमधील भाषणाच्या प्रतींना एक्झिबीट देण्यास हरकत घेतली. यावर दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद शुक्रवारी झाला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या भाषणाच्या प्रतींना एक्झिबीट द्यायचे की नाही, याबाबतची सुनावणी पुढील तारखेला होणार आहे. शुक्रवारच्या सुनावणीत कुंटे यांच्या वतीने अ‍ॅ. नंदू फडके आणि अ‍ॅ. गणेश धारगळकर यांनी बाजू मांडली.

 

आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत आरोपाची राळ उडवण्याबद्दल राहुल गांधी प्रसिद्ध आहेत. देशात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा बादरायण संबंध ते नेहमी संघाशी जोडत असतात. मात्र, २०१४ साली भिवंडी येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा संबंध संघाशी जोडणारे विधान केले होते. त्याविरोधात संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश कुंटे यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.