महिलांनी केली बाईक रॅलीव्दारे हेल्मेटसाठी जनजागृती
महा एमटीबी   10-Aug-2018


 

नाशिक : आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो महिलांच्या भगव्या बाईक रॅलीने परिसराला दणाणून सोडले. पांढऱ्या वेशात, भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली कालिदास कलामंदिरापासून एमजीरोड, अशोकस्तंभ मार्गे गंगापूररोडकडे निघाली. अवजड बुलेटपासून महिलांची ड्रीमबाईक संबोधल्या जाणाऱ्या मोपेडपर्यंत सर्वच दुचाकींचा या रॅलीत समावेश होता. कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावि संस्था आणि सॅव्ही वुमेन्स कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सॅव्ही वुमेन्स कॉलेजच्या १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीच्या मध्यभागी धावणाऱ्या चारचाकी वाहनावर आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांच्या वेशभूषेत विद्यार्थी विराजमान झाले होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीतून नागरिकांना रस्ता सुरक्षिततेविषयी वेगवेगळे फलक दर्शवून जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक बंदविषयी जनजागृती करण्यात आली. याबाबतची माहिती सॅव्ही कॉलेजच्या संचालिका श्रुती भुतडा यांनी देशदूतशी बोलताना दिली.
 

वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा, सिग्नल तोडू नका, वनवे असेल तिथे चुकीच्या मार्गाने येऊ नका, रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची काळजी घ्या, कार चालवताना सीटबेल्ट लावा, दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवा तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक पिशवी हद्दपार करा असे अनेक संदेश महिलांच्या बाईक रॅलीतून देण्यात आले. त्यानंतर बाईक रॅलीची सांगता रावसाहेब थोरात सभागृहाजवळ झाली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू सोनाली मंडलिक अग्रवाल महीला मंडळ जिल्हा अध्यक्ष सपना अग्रवाल कल्याणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनिता मोडक, सॅव्ही वुमेन्स कॉलेजच्या चेरमन श्रुती भुतडा, कल्याणी संस्थेच्या उपाध्यक्ष संजु मित्तल, खजिनदार कल्याणी मोडक कुलकर्णी, सचिव अनु वराडे, सल्लागार दिपाली चाडंक, मार्गदर्शक पुनम आचार्य हितेश वाघ, मधु मैत्रा,वकील पुनम शिन्नकर, तन्मयी मुळे, कीर्ती कीर्तने, भाग्यश्री मोडक, ललीता क्षिरसागर आदींची उपस्थिती होती. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मोडक यांनी आभार मानले.