‘आरबीआय’ वर सतीश मराठे यांच्या नियुक्तीने सहकार चळवळीला गती
महा एमटीबी   10-Aug-2018

सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सूर

 
 
जळगाव :
प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि ‘सहकार भारती’चे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर झालेल्या नियुक्तीने सहकार क्षेत्राला अधिक चालना मिळणार असून या क्षेत्राच्या भरभराटीसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल अशी भावना सहकार क्षेत्रामध्ये व्यक्त केली जात आहे.
 
 
बँक ऑफ इंडियामध्ये बँकिंग करिअरचा प्रारंभ केलेल्या सतीश मराठे यांनी युनायटेड वेस्टर्न बँक लि.च्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. देशातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठी एनजीओ आणि सुमारे २० हजाराहून अधिक सहकारी संस्थांशी निगडीत असलेल्या ‘सहकार भारती’चे ते ६ वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अनेक बँकांची ढासळती आर्थिक स्थिती सावरण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना अत्यंत प्रभावी सिध्द झाल्या आहेत. बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल ‘इफको’ने ‘सहकारिता रत्न अवॉर्ड’ देवून त्यांना सन्मानित केले आहे.
 
 
विशेष म्हणजे, बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांसोबत होणार्‍या बैठकीतही त्यांचा सहभाग राहिला असून या बैठकीत त्यांनी सहकार क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या या सर्व अनुभवाचा लाभ या क्षेत्राला नक्कीच होईल असा विश्‍वासही व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
योग्य व्यक्तीला योग्य प्रतिनिधीत्व
बँकिंग क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या एका चांगल्या व्यक्तीची आरबीआयच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य प्रतिनिधीत्त्व आहे. वयाच्या २९ व्या वर्षांपासून काम सुरू केलेल्या सतीश मराठे यांनी ‘सहकार भारती’मध्ये विविध जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले हे ‘डाऊन टू अर्थ’ व्यक्तिमत्त्व आहे. इंग्रजी, मराठी, हिंदीसह अनेक भाषांवर प्रभुत्त्व असलेल्या सतीश मराठे यांचे वाचन जितके अफाट तेवढाच बँकिंग क्षेत्रातील अनुभवही अफाट आहे. त्यांच्या निवडीने सहकार क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून या क्षेत्राला अधिक गती मिळेल असा विश्वास आहे.
- संजय बिर्ला, राष्ट्रीय प्रमुख, बँक प्रकोष्ठ, सहकार भारती
 
 
डॉ.आचार्य यांची स्वप्नपूर्ती
‘सहकार भारतीचा एक चांगला कार्यकर्ता जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर जाईल तेव्हा आपल्या कामाचे खर्‍या अर्थाने चीज झाले असे म्हणता येईल’ या डॉ.अविनाश आचार्य (दादा) यांनी पाहिलेल्या स्वप्नाची आज स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद आहे. सतीश मराठे यांची जडणघडणच संघ परिवाराच्या संस्कारातून झाली असल्याने त्यांच्या व्यवसाय आणि विशेषत: बँकिंग क्षेत्रातील कार्यावर या संस्कारांचा ठसा स्पष्टपणे उमटलेला जाणवतो. आजवर सहकारी बँकांच्या विकासाबाबत दुर्लक्ष केले जायचे. आता त्यांच्या रूपाने हक्काचा माणूस संचालक मंडळात असल्याने सहकार चळवळीला अधिक गती मिळेल. जळगाव जनता सहकारी बँकेशी त्यांचे प्रदीर्घ काळापासून जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे बँक परिवारात दसरा-दिवाळीचा आनंद आहे.
- अनिल राव, अध्यक्ष, जळगाव जनता सह. बँक, जळगाव