धक्कादायक; प्रोटीनयुक्त गोळ्यातून १५१ विद्यार्थ्यांना विषबाधा
महा एमटीबी   10-Aug-2018



गोवंडी : येथील शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजयनगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या प्रोटीनयुक्त गोळ्यातून १५१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चांदणी साहिल शेख असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. विषबाधा झालेल्या मुलांना पालिकेच्या राजावाडी व शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्‍यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी या मुलांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. यामुळे पालकांनी त्यांना जवळील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील चांदणी शेख हिचा रुग्णालायात येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. चौकशी दरम्यान ही सर्व मुलं एकाच शाळेतील असल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रोटीनयुक्त गोळ्या देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ही विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आमच्या प्रतिनिधींनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेचा गोळ्यांशी सबंध आहे का? हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सिद्ध होईल. यानंतरच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.