पालिकेच्या मालमत्तांवर आता मोबाईल टॉवर
महा एमटीबी   10-Aug-2018


 

कल्याण: गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक चणचणीने ग्रासलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी आता वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मालकीच्या इमारतींवर मोबाईल मनोरे उभे करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. यासाठी दूरसंचार कंपन्यांकडून प्रस्तावित टॉवरच्या ठिकाणांची माहिती मागवण्यात येत आहेत.
 

मोबाईल टॉवरच्या दुष्परिणांमाविषयी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चर्चा होत असून अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी मोबाईल टॉवर उभारणीस तीव्र विरोध दर्शवला आहे. या टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या लहरींमुळे अनेक असाध्य आजारांना निमंत्रण दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या पाश्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून यासंबंधीचा आग्रह धरण्यात आल्याने या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती गेल्या वर्षापासून हलाखीची बनली आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी येथील यंत्रणांकडून पुरेशा प्रमाणात प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत धुंडाळण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून पालिकेच्या मालमत्तांवर मोबाईल टॉवर उभारून त्यातून आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, परंतु मोबाईल टॉवरविषयीच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून ही परवानगी कायदेशीर नियमांची तपासणी करूनच दिली जाईल, असेही ठरविण्यात आले आहे.