देणे कलावंताचे...
महा एमटीबी   10-Aug-2018

 
 

 
स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री नरकेसरी प्रकाशनाने ‘तोच चंद्रमा नभात’ हा त्यांना आदरांजली वाहणारा अंक सिद्ध केला. ‘तभा’च्या वाचकांनी त्याचे उदंड असे स्वागतही केले. भारतीय सुगम संगीताच्या क्षेत्रात बाबूजी हा अढळ ताराच आहेत! तेवढ्यानेच त्यांच्यावरचा अंक प्रकाशित करण्याचे काही कारण नाही. अनेक संगीतकार, गायक आणि इतरही विधांमधले कलावंत आहेतच, ज्यांनी त्यांच्या हयातीत ‘आसूर्यचंद्र’ नांदेल असे काम करून ठेवले आहे. मग तरीही बाबूजी वेगळे कसे ठरतात? माणसं त्यांच्या निष्ठांनी अन् त्या निष्ठांसाठी त्यांनी मोजलेल्या किमतीमुळे मोठी होत असतात. सांस्कृतिक क्षेत्रात हा वाद कायम आहे. कलेसाठी कला की समाजासाठी कला? कलावंताने केवळ त्याच्या कलेशी निष्ठा बाळगली पाहिजे, की मग त्याच्या निष्ठांचे केंद्र समाज, राष्ट्रही असावे? आणिबाणीच्या काळात यावर मोठी चर्चा झडली आहे.
 
 
कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे; पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे. कला म्हणजे अखेर काय? कलावंताच्या संवेदनशील मनाला जे बोचते, त्याला वेदना होतात अन् त्याला ते सकल समाजाचे अहित करणारे आहे, असे वाटते त्यावर त्याला प्रहार करायचा असतो किंवा सामाजिक जीवनात घडणार्या अनेक घटनांवर त्याला भाष्य करायचे असते, त्याची समीक्षा तो कलेच्या अंगाने, कलेद्वारे करत असतो. कला म्हणजे केवळ काही हृदयाची भाषा नाही, त्याचा मेंदूशीही संबंध असतो. माणसाच्या जगण्याचे प्रतिबिंब कलेत उमटत असते. माणूस केवळ काही काळजाने जगत नाही, विचारही हवे असतात अन् त्यासाठी मेंदूही हवाच असतो. भावना आणि बुद्धी यांचा मेळच असतो माणसाचे जगणे. म्हणूनच कुठलीही कला ही तेव्हाच अभिजात ठरते, जेव्हा ती काळीज आणि मेंदू दोन्ही ठिकाणी परिणामकारक ठरत असते. लेखन असो, चित्र असो, गाणे असो... कलेची कुठलीही विधा ही एकतर काळजाला भिडते किंवा मेंदूवर स्वार होते. तेव्हाच ती यशस्वी ठरते.
 
‘सखी मंद झाल्या तारका’सारखे गाणे काळजाला भिडते. ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे गाणे बुद्धीला आव्हान देते अन् मग भूमिका घ्यायला भाग पाडते. भूमिका घेऊन मैदानात उतरायचे असेल, तर त्यासाठी भावनेचीही साथ हवीच असते. ‘पॅशन’ नावाची गोष्ट असतेच. त्याचमुळे कलावंत हा समाजसेवक असतो आणि समाजसेवक हा एका अर्थाने कलावंतच असतो. दोघेही सृजनच असतात. नवनिर्मितीच करत असतात. म्हणून मग बाबा आमटे आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे मैत्र घडत असते. त्यातून समाजाला आणि राष्ट्रालाही काही मिळत असते. कलावंताने कलेशी एकनिष्ठ असण्याचा अर्थ, त्याने आपल्या सामाजिक द्येयतेचेही भान राखायला हवे. सुधीर फडके उपाख्य बाबूजी हे या दोन्ही पातळ्यांवर श्रेष्ठ ठरले आहेत. केवळ कलेसाठी कला, असे नाही. तसे असूच शकत नाही. अखेर कलादेखील समाजासाठी, रसिकांसाठीच असते अन् रसिक हे सामान्य नागरिक म्हणून त्यांना भिडणारे प्रश्न केलेतून मांडले गेले, तर ती कला त्यांना आपली वाटत असते. कला केवळ प्रबोधनासाठीच असावी का? बाबूजींच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. कला प्रबोधनासाठी नाही; मात्र प्रबोधनासाठी कला हवीच असते.
 
कलात्म प्रबोधन हे सुंदर आणि परिणामकारक ठरते. कलेचा निसर्ग हा समाजहित असायला हवा. मग आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, कलावंताने त्याच्या कलेच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्रासंदर्भात त्याला जाणवले, भिडले ते मांडून मोकळे व्हावे. त्यात कलावंताने वेळ वाया घालवू नये, असाही एक मतप्रवाह आहेच. मात्र, कलेने त्याला जी प्रभावळ दिली आहे ते समाजाचेच देणे असते अन् वेळ पडेल तेव्हा त्या प्रभावळीचा, सृजनशक्तीचा वापर त्याने समाजासाठी, राष्ट्रासाठी करायला हवा. जे करतात ते कायम स्मरणात राहतात. कलावंत आणि समाजाचे देणे फेडणारा म्हणून त्याच्याविषयीच्या आदराला ‘चार चॉंद’ लागतात! बाबूजींच्या बाबत नेमके हेच झाले. त्यांच्या घडण्याच्या काळात, पौगंडावस्थेतच त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सान्निध्य लाभले. स्वातंत्र्यवीरांसमोर गाण्याची संधी मिळाली आणि मग रामच्या गळ्यात सात सुरांसोबत जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचा आठवा सूरही कायमचा आपली जागा पक्का करून गेला. त्याचमुळे त्यांच्या गीतांचा भाव कुठलाही असो, ती सामान्यांना आपली वाटत राहिली. ते मुंबईला आले अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातच त्यांचा निवास होता. कारण बालपणापासूनच ते नियमित शाखेत जात होते. ‘इदं न मम’ हा भाव त्यांच्यात निर्माण झाला होता. जे माझे आहे, असे मला वाटते ते माझे नसते, ते समाजाचे, राष्ट्राचे असते अन् मग मी राष्ट्राला द्यायलाच हवे, हा भाव संघसंस्कार निर्माण करत असतो. बाबूजींवरील संघसंस्कारातून त्यांचा गायक पुष्ट झालाच; पण भारत मातेचा एक सुपुत्रही घडला.
 
गोवा मुक्तिसंग्राम हे त्यांच्या जीवनातलं एक लखलखीत पर्व! पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला भारतीय भूप्रदेश मुक्त करण्याचा वसा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून त्यांनी कधीच घेतलेला होता आणि ‘परं वैभवम् ने तु मे तत् स्वराष्ट्रम्’, हे तर त्यांच्या जीवनाचं कधीचंच ब्रीदवाक्य बनलेलं होतं. दादरा मुक्तिलढ्यात ते प्रत्यक्ष सहभागी नव्हते, मात्र गोवा मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचणार्या आणि तुरुंगच ज्यांचे घर झाले होते अशा मोहन रानडे यांच्या मुक्ततेसाठी बाबूजींनी एकांडी लढत दिली. दादरानंतर नगरहवेली मुक्ती आंदोलनात मात्र बाबूजींनी प्रत्यक्ष उडी घेतली. कलेच्या प्रांतात अंमळ ठहराव आला होता, आता तिथे काही काम नव्हतं म्हणून त्यांनी या आंदोलनांत भाग घेतला, असे नाही. मात्र, बाबूजी कायम प्रवाहाच्या विरोधात पोहत राहिले अन् त्याला राजकारणाचा अजीबात स्पर्श नव्हता. त्यांना जे जे समाजाच्या अहिताचे वाटले त्यावर त्यांनी कृतिशूर प्रहार केला. बाबूजी नगर हवेलीच्या आंदोलनात उतरले तो व्यावसायिक काळ गायक आणि संगीतकार म्हणून सुवर्णकाळ होता.
 
 
हा काळ होता 1954-55 चा. मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर फडके नावाचा मोठा दबदबा निर्माण झालेला होता. त्यांचे तब्बल 27 चित्रपट पडद्यावर झळकलेले होते. हाच काळ होता गीतरामायणाच्या निर्मितीचा. बाबूजींनी गोवा मुक्तिसंग्रामाचं शिवधनुष्य उचललं होतं, तेही याच काळात. गोव्यात शस्त्रास्त्रे पोहोचविण्यासाठी बाबूजींनी त्यांच्या संवादिनीचा वापर केला. मुसळधार पावसात भिजत बाबूजी तिथे पोहोचले होते. गायकाने अशा पावसात भिजणे म्हणजे त्याला गायकीतून कायम संपविणारेही ठरू शकले असते, तरीही बाबूजींनी त्याची पर्वा केली नाही. त्या वेळी भारत सरकारला गोवामुक्ती हवी होती; पण त्यासाठी काही करण्याची तयारी नव्हती. शस्त्रास्त्रं, दारूगोळा आणि कार्यकर्त्यांचा चरितार्थ यासाठी पैसा आणायचा कुठून? बाबूजींनी लतादीदींचा कार्यक्रम पुण्यात घेतला आणि मिळालेल्या पैशातून शस्त्रास्त्रं, दारूगोळा खरेदी केला. या काळात त्यांना त्यांच्या सौभाग्यवती ललिताबाईंची भक्कम साथ मिळाली. या दोघांनी गोवामुक्तीचा लढा उभा करण्यासाठी जे काय केलं, हे सांगायला ही जागा अपुरी पडेल. गोवामुक्ती आंदोलनाचे बाबूजी सरसेनापतीच होते! त्यांच्या या राष्ट्रीय कार्याचा पुण्यप्रभाव त्यांच्या कलाजीवनावर पडला आहे. या कलावंताने समाजाला, राष्ट्राला भरभरून दिले आहे. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचा हा नरकेसरी प्रकाशनाचा अल्पसा प्रयत्न आहे. ‘तभा’च्या वाचकांनी त्याला साथ दिली. आमच्या अशा अनेक उपक्रमांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणार्या वाचकांच्या, स्नेहींच्या पाठिंब्याची प्रेरणा आम्हाला नवा उत्साह आणि ऊर्जा देत असते...