पवारांच्या टोपीखाली???
महा एमटीबी   10-Aug-2018 

शरद पवार म्हणजे सत्तेच्या परिघातले सन्माननीय, संपन्न, सत्तापूर्ण जीवन जगलेले मराठा समाजाचे प्रतिनिधी.
 
 

मराठा आंदोलकांनी मराठा नेत्यांच्या घरासमोर, तसेच सत्ताधारी आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलने केली. या पाश्वभूमीवर मराठा समाजाचे स्वयंघोषित तारणहार, सर्वज्ञ वगैरे वगैरे असलेले बारामतीचे शरद पवार यांच्या घरासमोर जेव्हा मराठा मोर्चा आंदोलन करेल तेव्हा काय होईल? असा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला होता. कारण, शरद पवार म्हणजे सत्तेच्या परिघातले सन्माननीय, संपन्न, सत्तापूर्ण जीवन जगलेले मराठा समाजाचे प्रतिनिधी. त्यामुळे साहेबांच्या घरासमोर जेव्हा आंदोलक येतील तेव्हा खा. हीना गावित किंवा आ. मेधा कुलकर्णींसारखे आंदोलकांच्या रोषाला साहेबांना बळीबिळी पडावे लागेल की काय, अशी धाकधूक होती.

 

त्या अनुषंगाने बारामती निरा रस्त्यावरील गोविंदबागेत जिथे थोरल्या साहेबांचा, निवास असतो तिथे पुतणे अजित पवार यांनी नेतृत्व करत आंदोलन केले. प्रसारमाध्यमांनीही शरद पवारांच्या घरासमोरचे आंदोलन चवीने दाखवले, पण छे, साऱ्या महाराष्ट्रात आक्रमक आणि ‘जिंकू किंवा मरू’च्या आवेशातले आंदोलन शरद पवारांच्या घरासमोर ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा’च्या लाडात आलेले दिसले. अर्थात, काका शरद पवारांच्या घरासमोर पुतणे अजित पवार आंदोलन करीत आहेत, यातच सर्व आले. थोरल्या साहेबांना इथे कुणीही प्रश्‍न विचारायचे धाडस केले नाही की, “साहेब इतके वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा का नाही आरक्षणाची तळी उचलली?” कुणी म्हणेल की, शरद पवारांच्या घरासमोरचे आंदोलन म्हणजे, ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असे होते. आता असेलही तसे. पण, या आंदोलनाला पाहून लहानपणीचा एक खेळ आठवला. लहान मुलांना रिझवण्यासाठी त्या मुलाला दिसेल अशाप्रकारे टोपीखाली एखादी वस्तू दडवायची आणि लहान मुलाला विचारायचे, “या टोपीखाली दडले काय?” मुलाला उत्तर माहिती आहे, हे टोपीखाली वस्तू दडविणाऱ्यालाही माहिती असते. शरदचंद्र पवारांच्या घरासमोरचे आंदोलन नेमके याच प्रकारचे होते का? यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. पण, त्यांनी भूमिका स्पष्ट करून तरी काय फायदा? कारण, काल-परवापर्यंत ‘संविधान बचाव’ म्हणणारे पवार काल ‘संविधान बदल’ म्हणाले आणि आज तर घरासमोरच्या आंदोलनासमोर शांत झाले. ते ही आणि आंदोलकही.. नेमके टोपीखाली दडले काय?

 

आंदोलनातला लिंगभेद

 
 
 

आजकाल महाराष्ट्रात आंदोलनेच आंदोलन सुरू आहेत. पण, या सगळ्या आंदोलनांमध्ये एखादे स्त्री नेतृत्व उभे राहिलेले दिसत नाही. खरे पाहता आंदोलनात रस्त्यावर दगड घेऊन आपल्या घरातल्या कुणाही पुरुषाने उतरावे, असे कोणत्याही स्त्रीला वाटत नाही. कारण आंदोलनाच्या नावाने फेकलेला तो दगड, त्यानंतर झालेल्या विध्वंसाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या स्त्रीलाच भोगावे लागतात. भावनिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही...अर्थात, काही स्तरावर महिलांचाही आंदोलनामध्ये सहभाग झालेला दिसला. जसे तिने तलाकवर कायदा नको म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या महिला, भीमा-कोरेगावच्या पार्श्‍वभूमीवर भीमा -कोरेगाव बाजूला सारून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला, असे म्हणत ३ जानेवारी २०१८ ला बंद करणाऱ्या महिला किंवा कोपर्डीच्या निष्पाप ताईच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या महिला. या सर्व महिला त्या-त्या वेळी ते ते विषय घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. आज चित्र असे आहे की, तिहेरी तलाकच्या कायद्यात बदल करणारा निर्णय मंजूर झाला. तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळू शकतो. भीमा-कोरेगावच्या आंदोलनामध्ये तर नक्षलींनी आपली पोळी भाजून घेतली, हे सिद्ध झाले तर कोपर्डीच्या ताईच्या नावाने सुरू झालेले मराठा आंदोलन सध्या कोपर्डीच्या ताईचे जाऊ दे, महिलांविषयक सुरक्षा कल्याणाची कोणतीच मागणी न करता सुरू असलेले दिसते. तिहेरी तलाक, भीमा-कोरेगाव आणि मराठा मोर्चा ही तिन्ही आंदोलने ताजी आहेत. या सर्वांमध्ये सुरुवातीला महिलांना सहभागी करून घेतले गेले होते. पण, जसजसे आंदोलन रंगत गेले, जोर पकडत गेले तसतसा महिलांचा सहभाग कमी होत गेला. असे का झाले? किंवा असे का होत असेल? यावर चर्चा केल्यावर बहुतेक महिलांचे उत्तर होते, घराघरातल्या आईताईला श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंब सांभाळायचे असते. त्यामुळे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला त्यांना वेळ नाही आणि समजा एखाद्या स्त्रीने जंगजंग पछाडून नेतृत्व करायचे ठरवलेच तर आंदोलकांमधल्या पुरुषी वर्चस्वाचा घेटो तिला स्वीकारतच नाही. असो. आंदोलनकर्त्यांचा हा लिंगभेदवाद स्त्रीला कळत नाही, असे नाही, पण तरीही या शोकांतिकेला अंत नाही.