समृद्ध-श्रीमंत-सांस्कृतिक रंगावळी पेंटींग्ज
महा एमटीबी   10-Aug-2018 

फार प्राचीन म्हणजे अगदी प्रागैतिहासिक काळापासून तर अगदी आत्ताच्या प्रगतावस्थेपर्यंत रांगोळीचा प्रवास आहे. रांगोळीने घराघरात अन् मनामनात स्थान मिळवलेले आहे. पवित्र आणि प्रसन्नतेचं प्रतिक म्हणजे रांगोळी, असं नातं निर्माण झालेलं आहे.

 

मुंबईच्या जहांगिर कलादालनात दि. १३ ते १९ ऑगस्ट या सप्‍ताहात ‘संस्कृती’चं प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रतिथयश चित्रकर्ती प्रिया प्रमोद पाटील यांनी ‘संस्कृती’ चितारली आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती ही भारतीय संस्कृतीचं आद्य प्रतिक म्हणून ज्या कृतीला मानलं जातं, त्या रांगोळीच्या आशयगर्भ आकारांद्वारे साकारलेली आहे. मुळात ‘रांगोळी रेखाटन’ ही एक सहजसाध्य कला आहे. प्रत्येक हिंदू घरातील स्त्रीला रांगोळी रेखाटन येतं. परंतु, काळ बदलत चालला आहे. घरासमोरील अंगण हे ग्रामीण भाग वगळता केवळ चित्रांमध्ये दिसतं. या स्थितीत दारासमोरची रांगोळी शहरात क्‍वचितच आढळते. या आणि अशा स्थितीबाबत चित्रकर्तीने फारच गांभीर्याने विचार केलेला दिसतो. अंगण नाही तरी हरकत नाही, पण घराला भिंती तर आहेतच ना! मग भिंतीवर रांगोळी आणायची, या कल्पनेतून चित्रकर्तीने ‘रांगोळी’ या पारंपरिक कलेचं उपयोजित कलेत रूपांतर केले. त्यातून भिंतींना सुशोभित करण्यासाठी कलाकृती साकारलेल्या दिसतात.

 
 
 
 

फार प्राचीन म्हणजे अगदी प्रागैतिहासिक काळापासून तर अगदी आत्ताच्या प्रगतावस्थेपर्यंत रांगोळीचा प्रवास आहे. रांगोळीने घराघरात अन् मनामनात स्थान मिळवलेले आहे. पवित्र आणि प्रसन्नतेचं प्रतिक म्हणजे रांगोळी, असं नातं निर्माण झालेलं आहे. ही रांगोळी कुठल्याही आरक्षणाच्या पलीकडची आहे. पारद, भिल्ल, मुंड, किरात, कोळी, नाग, ठाकूर, वारली, चेंचू, कातकरी या आदिवासी जमातींना रांगोळी म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडविणारे माध्यमरूपी वरदान ठरली. सर्व वर्ण आणि पंथोपंथांच्या अनुयायांनाही रांगोळीने आपलेसे केले. मग तिच्या अस्तित्त्वाला अर्थ प्राप्त झाला आणि रूपाला विविध आयाम प्राप्त झाले. या बाबींचा विचार चित्रकर्ती प्रिया यांनी केला असावा, असे त्यांची प्रत्येक कलाकृती पाहताना वाटते. लाल रंगातील पांढर्‍या रेषांनी चितारलेल्या ‘आयपन’ या नावाने ओळखली जाणारी उत्तराखंड प्रांतातील रांगोळी ही पारंपरिक लोककलांचा अविभाज्य भाग म्हणून चितारली जाते. निसर्गाच्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आणि दैवीशक्तीचा वावर या कलेतून निर्माण होतो, अशी श्रद्धा गोंड जमातीत प्रचालित आहे.

 

तपकिरी, हिरवा आणि पिवळा रंग अधिक उपयोगात आणून ‘पिचवाई’ चित्रशैलीतील म्हणजे त्याच नावाने परिचित असलेली रांगोळी भगवान श्रीकृष्णाच्या अर्चनेवर आधारित आहे. ‘पिचवाई’ म्हणजे पाठीमागे अडकवले जाणे. श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मागील आरास या संकल्पनेद्वारे चितारली जाते. उत्तर भारतातील बिहार राज्यातील ‘मधुबनी’ चित्रशैली ही मिथिलो प्रांतात अधिक समृद्ध पावलेली कला पौराणिक प्रसंग, लोक साहित्य आणि ग्रामीण दैनंदिनी या घटकांद्वारे प्रेम, शौर्य, त्याग आणि निर्मिती या भावना व्यक्त होणारी अशी शैली मधुबनी कलाकृतीमध्ये दिसते. ‘कलमकारी शैली’ हा मूळ इराण आणि पर्शियन चित्रप्रकार. सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या काळात हा प्रकार भारतात रूजला आणि लोकप्रियदेखील झाला. ‘कमल’ म्हणजे लेखणी. ‘कारी’ म्हणजे कारागिरी वा कलाकुसर. आपल्या देशात अंधार प्रांतात मच्छलीपणम या भागात या संस्कृतीचं मूळ आहे. प्रिया पाटील यांनी या शैलीला गवसणी घालून कलाकृती साकारली आहे. तामिळनाडूच्या दक्षिण पूर्व भागात तामीळ हिंदू महिलांच्या दैनंदिन धार्मिक विधीचा भाग म्हणजे ‘कोलम.’ ‘कोलम’ या शैली प्रकारात रेखांकन करतानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रारंभबिंदू आणि अंतबिंदू हा नाही, तर संपूर्ण रेखांकन हे सलग असून त्यात उगम वा अंत नसतो. दुष्ट प्रवृतींना दूर ठेवण्याचे सामर्थ्य या कलारचनेत असते, अशी त्यांची श्रद्धा आहे. यावर आधारित कलाकृतीही लक्षवेधक आहे. महाराष्ट्राच्या कुटुंबवत्सल घरांच्या दरवाज्यात व अंगणात ‘चैत्रांगण’ रंगावली चितारली जाते. हिंदू धर्मातील ५१ शुभप्रतीकचिन्हांच्या मांडणीतून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अलंकृत करण्याची परंपरा आहे. केरळमधील सुगीचा सण म्हणजे ‘ओणम.’ ओणम म्हणजे फुलांचा सण. केरळमध्ये ‘पुकलम’ वा ‘पुविडल’ ही फुलांच्या आकारांनी बद्ध केलेली रांगोळी ओणम सणाच्या वेळी काढली जाते. ‘पु’ म्हणजे ‘फूल’ आणि ‘कलम’ म्हणजे ‘कला’ म्हणून या रांगोळ्या फुलांनी युक्त असतात. ही आशयगर्भ कलाकृतीदेखील चित्ताकर्षक बनवलेली आहे. या प्रदर्शनात ‘सरस्वती’ नामक एक कलाकृती आहे. सरस्वती ही ज्ञान, कला आणि वाणी या त्रिगुणांची देवता आहे. तिच्याप्रती भाव व्यक्त करणार्‍या या कलाकृतीत ‘पावले’ आणि लक्ष्मी-सरस्वती यंत्रकाराने अलंकरण केलेले आहे. चित्रकर्ती प्रिया प्रमोद पाटील यांनी या रांगोळीधिष्ठीत कलाकृती साकारताना अभ्यास आणि निरीक्षणे यांची सांगड घातलेली आहे. या कलाकृती आकृतिप्रधान, प्रकृतिप्रधान, बिंदूप्रधान प्रतिकप्रधान आणि रेखाप्रधान आहेत. मोजक्याच परंतु पारंपरिक रंगयोजनांचा समयोजित आणि आशयपूर्ण उपयोग करून या कलाकृती साकारलेला आहेत. संपन्न प्रतीकांमधून भावभावनांची विचारसूत्रांची सौंदर्याभिरूची अभिव्यक्त करून भारतीय संस्कृतीचं आकर्षक आणि देखणं रूपडं जनसामान्यांपर्यंत पोहोचविणं हाच प्रधान हेतू या प्रदर्शनामागे आहे. तरीही विविध उपहारगृह, रुग्णालयांवर, कंपन्यांची कार्यालये असा ठिकाणी या कलाकृती, तेथील वातावरण अधिक प्रसन्न आणि आनंदी करायला मदतच करतील असे वाटते.

 

-प्रा. गजानन शेपाळ