नालासोपाऱ्यातून आठ देशी बॉम्ब हस्तगत
महा एमटीबी   10-Aug-2018


 आरोपी सनातनचा साधक असल्याचा आरोप; सनातनने दावा फेटाळला

 

मुंबई : नालासोपारा भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते वैभव राऊत यांच्या घरी गुरवारी रात्री एटीएसच्या पथकाने धाड टाकून आठ देशी बॉम्ब हस्तगत केले आहेत. तसेच राऊत यांच्या घराजवळील एका दुकानातून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी राऊत यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

 

वैभव सनातनचा साधक नाही, पण तो एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याने त्याच्याकडे स्फोटकं सापडणं शक्य नसल्याचा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सनातनला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा त्यांनी आरोप केला असून राऊत यांना शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही

 

"वैभव राऊत हे हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी असतात मात्र ते सनातनचे साधक नाहीत. जरी ते सनातनचे साधक नसले, तरी हिंदुत्वासाठी कार्य करणारा, धर्मासाठी कार्य करणारा कोणताही हिंदू कार्यकर्ता हा सनातनचाच आहे, असे आम्ही मानतो." अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सनातनवरील बंदीची मागणी खोडसाळपणाची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.