आपला आधार क्रमांक सार्वजनिक करू नका : युआयडीएआय
महा एमटीबी   01-Aug-2018नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे अध्यक्ष आरएस शर्मा यांनी आधार क्रमांकावरून हॅकर्सना दिलेल्या आव्हाननंतर आता युआयडीएआयने नागरिकांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. युआयडीएआयने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा इशारा दिला असून आपला आधार क्रमांक कोणीही सार्वजनिक करू नये, असा सल्ला युआयडीएआयने दिला आहे. त्यामुळे आधारच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्ननिर्माण निर्माण होऊ लागला आहे.


युआयडीएआयने याविषयी ट्विट करून नागरिकांना सूचना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या समोर येत आहेत कि, काही लोक आपला आधार क्रमांक सार्वजनिक करून काही लोकांना आव्हाने देत आहेत. परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे असून नागरिकांनी आपला आधार क्रमांक सार्वजनिक करू नये, असे युआयडीएआयने म्हटले आहे. याचबरोबर आधार क्रमांक हा देशातील नागरिकांची ओळख पटावी, यासाठी म्हणून तयार करण्यात आलेला आहे. या आधार क्रमांकाशी नागरिकांची अनेक गोपनीय माहिती जोडली गेलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून फक्त गरज असेल त्याच ठिकाणीच आधार क्रमांक द्यावा, अशी सूचना देखील युआयडीएआयने दिली आहे.
ट्रायचे अध्यक्ष आरएस शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आधार क्रमांक आपल्या सोशल मिडीयावर शेअर करून आपली गोपनीय माहिती उघड करण्याचे आव्हान हॅकर्सना दिले होते. यानंतर काही हॅकर्सनी शर्मा यांच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने त्यांची बरीचशी माहिती मिळवल्याचा दावा केला होता. तसेच काही पुरावे देखील त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले होते. परंतु शर्मा यांनी हे दावे फेटाळून लावले होते. पण यामुळे सोशल मिडीयावर मात्र आधारच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तसेच आधार क्रमांक सार्वजनिक करणे खरंच सुरक्षित आहे का ? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.