कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची तुरुंगामध्ये गोळ्या झाडून हत्या
महा एमटीबी   09-Jul-2018बागपत : कुख्यात गुंड प्रेम प्रकाश सिंग उर्फ मुन्ना बजरंगी याची आज बागपत येथील तुरुंगामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बजरंगी याच्यावरील सुनावणीसाठी म्हणून त्याला झाशीवरून नुकतेच बागपत येथे आण्यात आले होते. त्यामुळे त्याची हत्या ही पूर्व नियोजित कट असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान या घटनेनंतर बागपत तुरुंगाच्या तुरुंग व्यव्स्थापकाबरोबर एकूण पाच जणांवर तत्काळ कारवाई करण्यात आली असून यासर्वांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक तपासामध्ये बजरंगीला एकूण १० गोळ्या मारल्याचे समोर आले आहे. परंतु हत्ये मागचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश यूपी पोलिसांना दिले आहेत.


बजरंगी याचा जन्म १९६७ मध्ये उत्तर प्रदेशमधील जौनपुरमधील पुरेदयाल या गावात झाला होता. बजरंगी याने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, अशी इच्छा त्याच्या कुटुंबियांची होती. परंतु बजरंगीने पाचवीमधूनच आपले शालेय शिक्षण सोडून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. यानंतर १९८४ मध्ये त्याने एका व्यापाऱ्याची हत्या करून आपल्या गुन्हेगारी कारकीर्दीला सुरुवात केली. दरम्यान मध्यंतरीच्या काळात अनेक खुनाचे आणि खंडणीचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बसपाचे माजी आमदार लोकेश दीक्षित यांना देखील खंडणी मागितल्याचा आरोप बजरंगीवर आहे.