दृष्टिहीनांना मिळाली कॅमेर्‍याची साथ
महा एमटीबी   08-Jul-2018 

आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्य वाटणार्‍या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यातच आदित्य असेरकरसारख्या तरुणामध्ये असलेल्या कौशल्याची साथ तंत्रज्ञानाला मिळाली आहे.

 

शारीरिकदृष्ट्या कोणतीच समस्या नसणार्‍या व्यक्‍तीच आयुष्यात खूप काही करू शकतात, असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे शारीरिक अपंगत्व असणार्‍या व्यक्‍ती नजरेसमोर आल्यास, ’याचं पुढं कसं होणार?‘ असा प्रश्‍न पडतो. खरंतर आज आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या अनेक अपंग व्यक्‍तींनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून त्यांच्यामधील कला-कौशल्य सिद्ध करून दाखवलं आहे. तरीदेखील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना दाखवली जाणारी सहानुभूतीही बंद करायला हवी. पण तसं होत नाही. हे चित्र बदलण्यासाठी एका तेवीस वर्षीय तरूणाने पुढाकार घेत त्यांच्यातला आत्मविश्‍वास वाढवण्याचं काम केलं आहे. आदित्य असेरकर या तरुणाने दृष्टिहीनांसाठी ‘ब्लुम नावाचा प्रोटोटाईप कॅमेरा तयार केला आहे. आदित्य असेरकर याचं बालपण मुंबईमध्ये गेलं. लहानपणापासूनच त्याला समाजाला भेडसावणार्‍या समस्या अस्वस्थ करायच्या. आदित्य सुखवस्तू कुटुंबातला असल्यामुळे लहानपणापासून त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट त्याला सहजपणे मिळायची. पण आजुबाजूला त्याच्या वयाची मुले करत असलेला संघर्ष तो लहानपणापासून पहायचा. त्यामुळे गरजूंच्या मदतीला आपण पुढे आलं पाहिजे, असं त्याला नेहमी वाटायचं. त्यामुळे तो लहानपणापासूनच छोटी-मोठी मदत गरजूंना करायचा. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने प्रोडक्शन इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अहमदाबाद इथल्या ’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये मास्टर पदवी मिळवण्यासाठीचा त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्याच दरम्यान त्याच्या मनात दृष्टिहीन व्यक्‍तींचा विचार आला. त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे.

 
 
जेणेकरून त्यांना रोजगाराचे एक नवीन साधन मिळेल, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. रोजगार मिळवून देण्याबरोबरच दृष्टिदोष असलेल्या व्यक्‍तींमध्ये काही खास कला असल्यास त्यालादेखील वाव मिळेल, असं काही तरी करायला हवं, अशी कल्पना त्याच्या मनात होती. मग त्यातूनच दृष्टिदोष असलेल्या व्यक्तिंसाठी कॅमेरा बनवायचा असं त्याने ठरवलं. मग त्यानंतर त्याने आवश्यक असलेल्या संशोधनाचा श्रीगणेशा केला. त्यासाठी आदित्यने दृष्टिदोष असलेल्या व्यक्‍तीसोबत काही काळ घालवला. त्यांना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या आवडी-निवडी, त्यांना कोणती कामे करायला आवडतील, त्यांच्यामध्ये दडलेले गुण जाणून घेऊन त्यानंतर कॅमेरा नक्‍की कशाप्रकारचे बनवायचा याचा अभ्यास सुरू केला. आदित्यने तयार केलेला कॅमेरा हा इमेज प्रोसेसिंग तंत्रावर आधारीत असून वापरकर्त्याला संवेदनशीलतेने काय पाहिले त्याची माहिती देतो. ही माहिती कोणत्याही मुख्य भाषेत देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जन्मतःच अंध नसलेल्या मात्र नंतर दृष्टी गमावलेल्या व्यक्ती ज्यांना किमान रंगांचे ज्ञान आहे, अशा व्यक्‍तींना डोळ्यासमोर ठेवून हा कॅमेरा तयार करण्यात आला. तशा पद्धतीचे संशोधन करण्यात आले होते. जन्मत:च दृष्टिहीन व्यक्‍तीही हा कॅमेरा हाताळू शकतात. कारण जरी रंगांचे ज्ञान नसले, तरी कानावर सातत्याने पडत असलेल्या चर्चेतून अशा प्रकारचे ज्ञान या व्यक्‍ती सहजपणे आत्मसात करू शकतात. त्यांची आकलनशक्ती तीव्र असते. ते एखादी गोष्ट आत्मसात करू शकतात. या कॅमेराचे संपूर्ण कार्य इंटरनेटच्या माध्यमातून होते. जे काही इंटरनेटला माहीत आहे, त्याची सगळी माहिती कॅमेर्‍याला मिळते. कॅमेरा हाताळणार्‍या हव्या असलेल्या गोष्टींसाठी कार्यरत असतो. कॅमेरा स्वयंचलित पद्धतीने नेमक्या गोष्टी टिपतो. कॅमेरा फ्रेममधील गोष्टींची माहितीदेखील देतो. उदाहरणार्थ, फ्रेममधील व्यक्तीने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे? तो कोणत्या बाजूला बसला आहे? त्याच्या आजूबाजूला नक्‍की काय आहे? हे जाणून त्यानंतर फोटो क्लिक केला जातो. आदित्य याने अनेक दृष्टिहीन व्यक्तिंसोबत या कॅमेर्‍याच्या निर्मितीच्या वेळी अनेक प्रयोग केले आहेत आणि नव्याने अनेक बदल देखील केले आहेत.
 
 
 
या कॅमेर्‍यामध्ये दोन प्रकारच्या युएसबी पोर्ट काम करतात. त्यामुळे फोटोंच्या थ्रीडी प्रिंट काढता येतात. जेणेकरून त्यांना स्पर्श करून जाणून घेता येईल की, फोटो कशा पद्धतीने काढला आहे. या कॅमेर्‍याच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींना त्यांच्या सभोवताली होणार्‍या घटना आणि घडामोडी अनुभवता येतात. ज्यात त्यांना रूची असेल. आदित्य याने यासाठी पेटंट घेण्याचा प्रयत्न सुरु केला असून कॅमेर्‍यात भविष्यात आणखी सुधारणा करण्याचाही त्याचा विचार आहे. यामध्ये आणखी विस्तार तसेच संशोधन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्य सांगतो. आज स्वजिद्दीच्या बळावर दृष्टिहीन व्यक्तीही डोळस व्यक्तीसारखं काम करू शकतात, हाच आत्मविश्वास अन्य दृष्टिहीनांमध्ये निर्माण करण्याचा आदित्यने केलेला हा लाखामोलाचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे.