जपानमध्ये महापूर ; १५ लाख लोकांना पुराचा फटका
महा एमटीबी   08-Jul-2018हिरोशिमा : गेल्या दोन दिवसांपासून जपानमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास १५ लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. दरम्यानदेशात ठिकठिकाणी आलेल्या पुरामध्ये अनेक जण वाहून गेले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे सुरु आहे.


जपानच्या पश्चिम भागासह हिरोशिमा आणि आसपासच्या भागामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून पडल्या आहेत. याचबरोबर डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक ठिकठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.


तसेच येत्या दोन दिवसांमध्ये देशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपापले निवासस्थान सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जपान सरकारने केले आहे.