अमरनाथ यात्रेत दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू
महा एमटीबी   04-Jul-2018


श्रीनगर : मुसळधार पावसाने विसावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेवर आज पुन्हा एकदा काळाने घाला घातला आहे. अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान दरड कोसळल्यामुळे बालटाल येथून गुहेकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून जखमी नागरिकांना उपचारासाठी म्हणून जवळ आरोग्य शिबिरात दाखल करण्यात आले आहे.

बालटालपासून अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. बालटालपासून थोड्या अंतरावरील घाटमार्गेवर ही घटना घडली. यामध्ये चार पुरुषांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य सुरु केले. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ उपचारासाठी म्हणून भाविक शिबिराकडे रवाना करण्यात आले. तर मार्गावरील अडथळा दूर करेपर्यंत बालटालचा मार्ग बंद करण्यात आला आहे.


गेल्या २८ तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यंदा या यात्रेसाठी देशभरातून १६०० भाविक जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्यात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या शुक्रवारी राज्यात मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे यात्रा काही काळासाठी थांबण्यात आली होती. त्यानंतर रविवारी वातावरण निवळल्यानंतर यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली होती.