अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचे निदान
महा एमटीबी   04-Jul-2018
  

 
 
 
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला हायग्रेड कॅन्सर झाला असून यापुढील उपचारांसाठी ती आज अमेरिकेतील न्यूयॉर्कसाठी रवाना झाली आहे. कॅन्सरबाबतची धक्कादायक माहिती स्वतः सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
 
 
सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटच्या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, आयुष्यात कधी कधी खूप अनपेक्षित वळणं येतात, ज्याचा आपण कधीच विचारही केलेला नसतो. सतत होत असलेल्या शारीरिक वेदनांमुळे मी काही वैद्यकीय तपासण्या केल्या होत्या त्यामधून मला हायग्रेड कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले आहे. या गंभीर आजारावरील उपचारांसाठी मी न्यूयॉर्कला जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असून या आजाराला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''.
 
 
 
 
 
तिच्या या पोस्टमुळे बॉलिवूडकरांना तसेच तिच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते "सोनाली, लवकर बरी हो" असं म्हणत तिच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोनाली बेंद्रेने १९९४ मध्ये 'आग' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. सोनालीने बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता.