‘चुंबक’ : स्वार्थ आणि सच्चेपणातलं द्वंद्व
महा एमटीबी   31-Jul-2018
 
 
 
छोट्याश्या पण अर्थपूर्ण गोष्टी सांगणारे चित्रपट हे मराठी सिनेमाचं वैशिष्ट्यं म्हणायला हवं. भरपूर पात्रं, भरपूर बजेट, भरपूर गाणी यातलं काहीही नसलं तरीही गुंतवून ठेवणारे अनेक चित्रपट मराठीत निर्माण झाले आहेत याचं कारण इथल्या माणसांशी, मातीशी, प्रवृत्तींशी, सुख:दुखांशी जवळचं नातं त्यांनी उलगडून दाखवलं आहे. आपल्या आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या स्वप्नांना गाठू पाहणारा एक मुलगा आणि फक्त एका छोट्याश्या परीघापुरतंच विश्व समजणारा एक माणूस यांची कथा असणारा ‘चुंबक’ हाही असाच एक हृद्य चित्रपट.
 
मुंबईत वेटरचं काम करता करता आपल्या गावाकडे स्वतःच्या मालकीचं रसवंतीगृह उभरायचं स्वप्नं पाहणारा एक मुलगा (भालचंद्र) पैशासाठी आपला मित्र (डिस्को) याच्यासोबत लॉटरी लागल्याच्या बहाण्याने कुणालातरी गंडवायचा घाट घालतो. जो पहिलाच मासा या दोघांच्या गळाला लागतो तो असतो काहीसा मंद, डोकं कमी वेगाने चालणारा, जगाची रीत आणि त्यातले छक्के-पंजे ठाऊक नसणारा असणारा प्रसन्न. त्याला पाहूनच फसवायची इच्छा मेलेला भालचंद्र केवळ नाईलाजाने आपल्या मित्राच्या आग्रहाखातर त्याच्याकडून पैसे लंपास करतो. पण पुढे अशा घटना घडत जातात की प्रसन्न या दोघांनाच चिकटतो आणि मग सुरू होते एक तीन पायांची शर्यत. ज्यात एका व्यक्तीला काहीही करून जिंकायचंच असतं आणि दुसरीला खरंतर जिंकायची अजिबात इच्छा नसते पण हारणं परवडणारही नसतं. तिसरी व्यक्ती मात्र शर्यत, हेवेदावे, हारजीत या सगळ्याच्या चक्रात कधी अडकलेलीच नसते. ते वैतागतात, चिडतात, रडतात आणि भांडतातही! पण या सगळ्या जांगडबुत्त्यात त्यांच्यात एक नातंही तयार होत जातं. त्या अजब नात्यातले गुंते, गाठी आणि उकल अनुभवायच्या असतील तर तर ‘चुंबक’ पहावाच लागेल.
 
चित्रपटाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या स्वप्नदृश्याचा एकूणच पोत लाजवाब आहे. तिथूनच चित्रपट पकड घेतो आणि पूर्णवेळ बांधून ठेवतो. यातली तीनही पात्रं समाजातल्या तीन प्रमुख प्रवृत्ती आहेत. ‘डिस्को’ हा मनाचा वाईट किंवा बनेल नाही, पण मुंबईच्या जगण्याने त्याला बरंच काहीसं कठोर बनवलंय. “कुणी आपल्याशी वाईट वागलं तर आपण आणखी कुणाशीतरी वाईट वागून त्याचं उट्टं काढायचं” असं त्याचं रोखठोक तत्वज्ञान आहे. दुसऱ्या टोकाला दुनियादारी कळण्याची क्षमताच नसल्याने आपला निरागसपणा शाबूत असणारा आणि म्हणूनच पूर्वग्रहदूषित न होता पाटी कोरी ठेवून लोकांना सामोरा जाणारा प्रसन्न आहे. खरी गोची आहे ती भालचंद्रची. त्या च्यात दुसऱ्याचं वाईट करण्याची भूक नाहीये पण त्याला स्वतःच्या स्वप्नांशी तडजोडही करायची नाहीये. शेवटच्या प्रसंगापर्यंत त्याचं हे सी-सॉ सारखं वर-खाली होत राहणंच आपल्याला गुरफटून टाकतं. त्याच्यापुढचा पेच हा खरंतर इच्छा नसतानाही खोटेपणा करून पुढे जाणाऱ्या, परंतु त्याबद्दल स्वतःला आतून सतत कुरतडत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढचा पेच आहे.
 
जेमतेम दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक बरेच प्रसंग (आणि तेही अनेक वेगवेगळ्या स्थळी घडणारे) आहेत. पात्रांचे भावनिक चढउतार, भालचंद्र आणि प्रसन्नचे एकमेकांसोबतच्या वागण्यातले बदल यांमुळे चित्रपट पाहून बाहेर पडताना आपण बरंच काही बघितल्याची भावना होते. अनेक छोटे छोटे प्रसंग लक्षात राहणारे आहेत, पण भालचंद्र आणि प्रसन्न यांच्यातला एकमेकांना चिडून दगड मारण्याचा प्रसंग आणि एस.टी.मध्ये खिडकीवरून होणारी नोकझोक हे प्रसंग चित्रपटाचे ‘हायलाईट’ ठरावेत. एकही शब्द न वापरता फक्त पात्रांच्या हालचाली आणि मूड्समधून त्यांच्यातलं नातं कसं ठसवावं याचं उत्तम उदाहरण लेखक सौरभ भावे आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी प्रस्तुत केलं आहे.
 
चित्रपटाचं ध्वनिआरेखन आणि मोजकं परंतु प्रभावी पार्श्वसंगीत, सार्वजनिक ठिकाणी झालेलं छायाचित्रण आणि फ्रेममध्ये तिथल्या अनेक प्रकृती टिपणं या गोष्टींमुळे चित्रपटाची पातळी आणखीन वर गेली आहे. या सगळ्यात दुधात साखर म्हणावी अशी बाजू आहे अभिनयायची. कॅमेऱ्याचा कोणताही पूर्वानुभव नसणारी दोन नवीन मुलं (साहिल जाधव आणि संग्राम देसाई) यात अगदी सराईतपणे वावरली आहेत. प्रसन्नच्या निरागसतेत आपण नकळत गुरफटत चाललो आहोत याची मध्येच जाणीव झाल्यावर अचानक तुसडेपणाने वागणारा भालचंद्र साहिल जाधव याने समंजसपणे साकारला आहे. कलेच्या अनेक प्रांतात भटकंती केल्यानंतर स्वानंद किरकिरेंनी प्रसन्नची मोठी भूमिका साकारून अभिनयातही जबरदस्त ठसा उमटवला आहे. मंदपणा आणि मतिमंदता यांच्यात असणाऱ्या सीमारेषेचं उत्तम भान त्यांना आहे. भविष्यात त्यांच्याकडून अशाच दमदार भूमिका बघायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. भालचंद्र आणि प्रसन्नच्या भाषेवर मात्र दिग्दर्शकाने मेहनत घ्यायला हवी होती असं मात्र प्रकर्षाने जाणवतं. चित्रपटात तपशीलांवर एवढा भर दिलेला असताना सोलापूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातून आलेल्या या दोन पात्रांच्या शब्दोच्चारांमधून तसं काहीच जाणवत हे खटकलं. एवढी एक त्रुटी वगळता हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक सुंदर अनुभव आहे.
 
 
 
 
प्रसाद फाटक