नागरिकांना हवी मनपाकडून बससेवा
महा एमटीबी   31-Jul-2018

जळगाव शहरात महापालिकेतर्फे २ बस संस्था १ शहर बस

 
 

 
जळगाव शहरात सरकारी किंवा महापालिकेकडून बससेवेची मागणी होत असतानादेखील महापालिका या नागरिकांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि विकसित अशा शहरांमध्ये ज्याप्रमाणे शहर बससेवा सुरू आहे त्याचप्रमाणे शाळकरी, चाकरमान्यांसाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आज एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी शहरातील प्रवाशांना केवळ रिक्षा या माध्यमाचा आधार घ्यावा लागतो. दरम्यान, सामान्य नागरिकांना तो आधार परवडत नसल्याने महापालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असा सूर आता निघत आहे.
 
जळगाव शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून लोकसंख्याही वाढत आहे. या लोकसंख्येत काही नागरिकांना आपल्या स्थळी पोहोचण्यासाठी स्वतःचे वाहन नाही तर बससेवेची अत्यंत गरज आहे. मात्र, महापालिकेकडून कोणत्याही बससेवेची उपलब्धतता होत नसल्याने सामान्य नागरिकांचे खिसे रिकामे होत असल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज शहरात काही वर्षांपूर्वी दोन संस्था या शहरातील नागरिकांना बस सेवेचा लाभ देण्यासाठी हजर झाल्या होत्या. परंतु, तेव्हाचा शहरातील विस्तार पाहता त्याचबरोबर अरुंद असणार्‍या रस्त्यावर एवढे मोठे वाहन चालवायचे कसे, असा प्रश्‍न पडून त्यांनी आपल्या बसेस बंद करून जळगाव शहरातील नागरिकांना पोरके केल्याची भावना काही नागरिकांशी तरूण भारतने संवाद साधल्यानंतर व्यक्त केली.
 
 
दरम्यान अरुंद असणार्‍या रस्त्यावर चालणार्‍या बसेसला रुंद रस्ते करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा होता. त्याचप्रमाणे बसेसला एमआयडीसीतील फायर स्टेशनजवळ जागा न देता गावात कुठेतरी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यायला हवी होती. जेणेकरून एमआयडीसीत जाण्यासाठी ७ किलामीटर आणि परत येण्यासाठी ७ मिलोमीटरची सेवा प्रवासी नसल्याने त्यांना करावी लागत होती. तसेच वाढते डिझेलचे दर परवडत नसल्याने त्यांना यावर विचार करावा लागला की, आता बससेवतून उत्पन्न नाही, तर ही बससेवा सुरू ठेवून फायदा काय, तसेच महापालिकेने यावर कोणताही तोडगा न काढल्याने त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले असल्याची स्थिती आहे. शहरातील नागरिकांना जर महापालिका योग्य सोयी-सुविधा देत नसेल तर काय कामाची, असा रखरखीत प्रश्‍नही काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. शहरात दोन खासगी कंपन्यांनी बससेवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना पासेस द्याव्या आणि त्याची अर्धवट रक्कम महापालिकेकडून घेण्यात यावी, असे ठरलेले असतानासुद्धा कुठलाही परतावा या संस्थेला न मिळाल्याने त्यांना ही बससेवा परवडेनाशी झाली. याबाबत त्यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केल्याचेदेखील निदर्शनास आले, मात्र महापालिकेने यावर तोडगा न काढल्याने त्या दोन्ही खासगी संस्थांना आपली बससेवा बंद करावी लागली. दरम्यान, शहरात बससेवा ही जीवनदायिनी बनू शकते. कारण आज शहराचा वाढलेला विस्तार पाहून ही काळाची गरज बनलेली दिसून येत आहे. आज कुसुंबा, एमआयडीसी, खेडी, कालिंका माता, महाबळ परिसर, समतानगर, रामानंदनगर, वाघनगर, हुडको, खोटेनगर, बांभोरी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना बससेवा नसल्याने रिक्षाचा सहारा घ्यावा लागतो. पण, एक रिक्षात किमान ७ ते ८ जण रिक्षाचालक बसवत असल्याने नागरिकांना या जिकरीच्या प्रवासाला सामोरे जावे लागते. वाढती वाहतूक पाहता काही रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करून रिक्षा चालवत असतात. दरम्यान, यात बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून बससेवेची शहरात गरज असल्याचे दिसून येत आहे.
 
अपघातांचे प्रमाण कमी होईल
 
आज जळगावातील नागरिक विद्यापीठ, जैन इरिगेशन, सुप्रीम कंपनी आदी ठिकाणी कामानिमित्त जात असतात. दरम्यान, शहरातील रस्त्यावर वाहनचालक बेदरकारपणे अवजड वाहने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचालक तर रोज घरातून निघताना आपले प्राण मुठीत घेऊन निघत असतात. मात्र, जर महापालिकेकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना सुरक्षितता जाणवायला लागेल. आज आपल्या शहरात सोयीचे आणि सुरक्षित साधन मिळेल, याचा विचार आता निद्रित असलेल्या महापालिकेने करायला हवा.
 
वृद्ध, महिला अन् बालकांना आधार
 
शहरात बससेवा सुरू झाल्यास याचा फायदा वृद्ध, महिला आणि बालकांना होईल, कारण बससेवेसारखा दुसरा सुरक्षित प्रवास कोणताच नाही, याचा विचार महापालिकेने करायला हवा. एखाद्या मातेला जर आपल्या शिशुला स्तनपान करायचे असल्यास ती बसमध्ये सहज करू शकते. वृद्धांनाही ही सोय उपलब्ध झाल्यास त्यांना रिक्षात जीवघेणा प्रवास करण्यापासून सुटका मिळेल तर शाळेत जाणार्‍या बालकांनाही ही सेवा महत्त्वाची असेल. महापालिकेने आता तरी नागरिकांच्या सुखाचा विचार करून त्यांना योग्य अशा सुविधा द्याव्या, अशी मागणी आहे.
 
महापालिकेने शहर बससेवा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यायला हवा. काही वर्षांपूर्वी इको बससेवा आणि जेएमटी या खासगी संस्थेनी आपली वाहने नागरिकांच्या सोयीसाठी आणली होती. मात्र, त्यांना माघारी फिरावे लागले. महापालिका नाही, किमान नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीवेळी प्रतिज्ञा घेणार्‍या लोकप्रतिनिधींनी तरी यावर तोडगा काढावा, अशी मागणी आता जळगाववासीयांकडून करण्यात येत आहे.
 
 
  
  
प्रतिक्रिया १
बसचालकाचा पगारही निघेना
 
शहरात बससेवा चालवायची म्हणजे हत्ती पोसण्यासारखे आहे. शहरात बससेवा चालू ठेवायची असल्यास शहराची परिस्थितीही तशी पाहिजे. आजकाल राज्य परिवहनची शहर वाहतूक बसचे डिझेलही निघत नसल्याची स्थिती आहे. आधीच एसटी बस ही घाट्यात चालत असून उत्पन्नासाठी अनेक उपाययोजना करूनही फायदा होत नसल्याने शहरातील नागरिकांसाठी केवळ जुने बस स्टँड ते बांभोरी असा मार्ग सुरू आहे. मात्र, जळगाव शहरातील वाहतूक पाहता बसचालकाला बस चालवणे जिकरीचे होत असून याचा आर्थिक दुर्भंड हा आगाराला सोसावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, खासगी संस्थांनी दोन वेळी बससेवेसाठी ट्रायल केली असून त्यांनाही ही सेवा परवडली नसल्याने त्यांनी माघार घेतली आहे.
- लक्ष्मीकांत चौधरी, माजी परिवहन सभापती
 
प्रतिक्रिया २
शहरात एकच बस असल्याने अडचण
 
शहरात किमान दोन तासांनी एक बस तरी महापालिकेने सुरू करायला हवी. जेणेकरून उन्हातान्हात महिला, वृद्ध, आणि शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. शहरातील बसमध्ये मरणाची गर्दी असल्याने त्या बसमध्ये पाय ठेवणेदेखील मुश्कील होऊन बसते. गरोदर महिलांसाठी तर या बस त्रासदायक असून महापालिकेने नागरिकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष देऊन सुविधा पुरवायल्या हव्या. दरम्यान, आता शहराचा विस्तार वाढला असून या सुविधा जर महापालिकेने दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल.
- सचिन कापडे, नागरिक