'बाळू' अम्बॅसिडर ऑफ न्यू इंडिया
महा एमटीबी   30-Jul-2018


 

 

माणसाने शिकत शिकत पुढे जावं आणि शिकलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग आपल्या समाजासाठी करावा. म्हणून आज मी हे सगळं करू शकतो आहे आणि इथून पुढेही करत राहील.
 
 
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या वनवासी पट्यातील जरंग गाव... या गावातील बाळू राठोड हा ऐन तिशीतील उच्चशिक्षित तरुण सध्या त्याच्या कामामुळे प्रकाश झोतात येतोय. युवकांचा सकारात्मक विकास, संघटन, वंचितांचा आधार, फुटपाथ शाळा, कुमारीमाता त्यांच्या मुलांचा विकास, ग्रामविकास अशा विविध विभागात त्याच काम चालूये... आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी आपण ज्या ठिकाणी मोठे झालो अशा ग्रामीण भागासाठी व्हावा, यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. मुळात ग्रामीण भागातील मुलं जास्त शिक्षण घेत नाहीत आणि जरी शिकला तरी घरच्यांची अपेक्षा असते कि, आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी मग भले ती शिपायाची का असेना. असाच घाट बाळूच्या घरच्यांचा देखील होता. वनवासी भागात जन्म आणि घरची परस्थिती हालाकीची असल्याने घरच्यांचा हट्ट सहाजिकच होता मात्र बाळू सुद्धा आपल्या मतावर ठाम होता. कारण आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची आंतरिक तळमळ नेहमीच त्याच्या मनात होती आणि त्याला सोबत शिक्षणाची सोबत मिळाली.
 

 
 

प्रत्येक वेळी नावीन्य आणि सकारात्मक गोष्टी शोधणाऱ्या बाळूने नागपुरात एका महाविद्यालयात सुरू असलेली प्राध्यापकाची नोकरी सोडून पत्रकारितेचा अभ्यास सुरू केला. याच दरम्यान त्याची सामाजिक कामाशी जवळीक निर्माण झाली. काहीतरी वेगळ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याचा शोध सुरु झाला. पत्रकारितेचा अभ्यास करत असताना त्याचा सामाजिक कामाशी जवळीक आणि अभ्यास चालू होता. मात्र कुशाग्र बुद्धीचा बाळू अभ्यासाकडेही दुर्लक्ष करत नव्हता, त्यामुळेच तो पत्रकारितेमध्ये नागपूर विद्यापीठाचा गोल्ड मेडॅलिस्ट’ ठरला. इथून पुढे त्याचा खरा प्रवास सुरु झाला. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी आणि सुखात जगावं असा त्याच्या घरच्यांचा तगादा असायचा आणि तो आज देखील कायम आहे. पत्रकारिताचे शिक्षण करत असताना बाळू नागपूरमधील छोटा ताजबाग परिसरात जात असायचा. याच दरम्यान त्याला गोंड वस्तीवर अनेक मुलं शाळा सोडून अन्य उद्योग करताना दिसून आली. त्यावर बाळूने अभ्यास सुरु केला आणि त्याला असं जाणवलं कि यातील ९९ टक्के मुलांना त्यांच्या घरच्यांना शिक्षणाची पार्श्वभूमीच नाही. शिक्षण क्षेत्र आणि युवक हा त्याच्या कामाचा आवडीचा भाग असल्याने मग बाळूने या मुलांसाठी 'यंग इन्स्पीरेटर नेटवर्क'च्या सहयोगाने २०१५ पासून काम सुरु केले. या उपक्रमाला त्याने 'फुटपाथ शाळा' असे नाव दिले. सुरुवातीला काही मुलांपासून सुरु झालेला प्रवास अल्पावधीतच १०० मुलांपर्यंत पोहचला. दररोज संध्याकाळी दोन तास हि शाळा भरायची. या मुलांना अक्षर ओळख, संगणक प्रशिक्षण, विज्ञानाची ओळख असे नानाविविध प्रयोग त्याने सहकाऱ्यांनी मिळून राबवले.

 

 
 

फुटपाथ शाळेचं काम चालू असताना त्याचा युवकांशी संपर्क यायला लागला. यातूनच त्याने विदर्भातील जवळपास हजार युवकांचं संघटन केलं. या माध्यमातून त्याने युवकांच्या सकारात्मक सर्वांगीण विकासासाठी काम सुरु केलं. या युवकांसाठी तो शैक्षणिक मार्गदर्शन, त्यांच्या कलागुणांना वाव, कौशल्य विकास, सामाजिक जाणीव निर्माण करणे असे विविध कार्यक्रम राबवत असायचा. आजही तो या सर्वांच्या संपर्कात असून विविध उपक्रम राबवत असतो. याचा कामाच्या आधारावर नवभारत टाईम्स Y4D फाउंडेशन यांचा 'अम्बॅसिडर ऑफ न्यू इंडिया' या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. याच दरम्यान मुख्यमंत्री फेलोशिपअंतर्गत व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनसाठी महाराष्ट्रातील गावांमध्ये सामाजिक परिवर्तन करण्याची संधी त्याला मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने रोहडा (ता. पुसद) या गावातील विध्यार्थ्यांना गावातच अभ्यास करता यावे यासाठी गावात पूर्णवेळ अभ्यासिका सुरू केली. दिलासा संस्थेची मदत घेऊन नाला खोलीकरण करण्याचे काम पूर्ण केले. शासनाची मदत घेऊन मागेल त्याला शेततळे मधून २७ शेततळे तयार करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. यासोबतच जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणात काम चालू केले आहे. यासोबतच तो सध्या तेलंगणा सीमेला लागून असलेल्या झरीजामनी वनवासी पट्ट्यातील कुमारीमाता त्यांच्या मुलांच्या विकासासाठी अभ्यास करत असून गेल्या वर्षांपासून तो कुमारी मातांच्या प्रशांसाठी राबत आहे.

 

 
 

त्याच्या याच कामाची दखल घेत दै. 'मुंबई तरुण भारत'ने त्याच्याशी संपर्क साधला असता, तो म्हणाला कि, "आजपर्यंतचे शिक्षण वसतिगृहातून झाल्याने घरच्यांनी दिलेल्या आधारानेच मला एकमेकांना सोबत घेऊन चालण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या या वाटचालीत अनेक लोकांकडून खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्याचे तत्वच आहे 'सीख जब मिले, जीससे मिले, जितनी मिले ले लो.' म्हणतात माणसाने शिकत शिकत पुढे जावं आणि शिकलेल्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग आपल्या समाजासाठी करावा. म्हणून आज मी हे सगळं करू शकतोय, आणि इथून पुढेही करत राहील..."

- विजय डोळे

9890740042