गाढवसुद्धा राजा होऊ शकतो...
महा एमटीबी   03-Jul-2018


 

पहिली एकांकिका ‘स्वप्न गर्भाचा मृत्यू बसविली होती. त्याची परीक्षणे वृत्तपत्रात छापून आली होती. त्यात पाचोरे यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. हे सर्व अंक जपून ठेवले आहेत. नंतर त्यांनी सादरीकरण केल्यावर सुधारणा झाली आणि पारितोषिके मिळू लागल्यावर, टीकेचे रुपांतर स्तुतीत झाले.

 

“गाढवसुद्धा राजा होऊ शकतो.” हे वाक्य आहे, नाशिकचे चित्रपट दिग्दर्शक भगवान पाचोरे यांचे. सामान्यपणे पाहिले, तर या विधानाचा अर्थ लागत नाही. एखाद्यावेळी एखाद्याला त्याचा रागदेखील येऊ शकेल. गाढव कसा राजा होऊ शकेल? पण जरा विचार केला, तर लक्षात येईल वेळ आली, तर एखादा माणूस देखील मोठा पदावर जाऊ शकतो. प्रचंड मेहनत, भाग्य आणि आयुष्यात चांगले लोक भेटणे, यावर माणूस राजा होऊ शकेल की नाही हे अवलंबून असते. तो गाढव आहे की नाही हा भाग अलहिदा.

 

भगवान वसंतराव पाचोरे यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात झाली शालेय जीवनापासून. वडील लहानपणीच गेलेले. आई बिड्या वळणे आणि लोकांची कामे करणारी. घरात एक मोठा भाऊ. झोपडीतील राहणीमान. शिक्षण कोणाचेच नाही. भाऊ बाजार समितीत काम करणारा. आपण मात्र शिकायचे असे ठरवून त्यांनी पंचवटीतील पुणे विद्यार्थी गृहातील महाराष्ट्र विद्यालयात प्रवेश घेतलेला. शाळेतच नाटकांची आवड निर्माण झाली. स्नेह संमेलनातील नाटकात काम करू लागले. पहिल्याच बालनाट्यात त्यांनी ‘मोची’ ही भूमिका केली होती. त्यानंतर त्यांचा नाट्य, एकांकिका क्षेत्रात वावर सुरु झाला. या काळात एक जिवलग मित्र कैलास जाधव यांनी सहकार्य केले. नाटकाची आवड पाहून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले ते दिलीप देशपांडे या शिक्षकाने. पुढे श्याम लोंढे, विद्याधर निरंतर, मुरली खैरनार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पाचोरे करतात. प. सा. नाट्यमंदिरात एकांकिका, नाटके असत. मात्र ते पाहण्यासाठी दोन रुपये तिकीट असे. तितके पैसे देखील पाचोरे यांच्याकडे नसत. एक दिवस नाट्यगृहावर घिरट्या घालणाऱ्या पाचोरे यांना कै. मुरली खैरनार यांनी पहिले आणि विचारले,” नाटक पहायचे आहे का?” यावर होकारार्थी उत्तर आले. मग, का पाहत नाहीस? विचारले असता, पैसे नाहीत असे सांगितले. “मी देतो दोन रुपये, नंतर थोडे थोडे करून परत कर.” असे मुरलीने सांगितले. अशा मित्र-मार्गदर्शकामुळे सकारात्मक ऊर्जा भरली गेली, अशी आठवण ते सांगतात. मुरलीने नंतर त्यांना ‘गाढवाचे लग्न’ या नाटकात भूमिका करण्याची संधी दिली. प्रारंभी गाढवाची भूमिका करता करता, पुढे राजाची आणि सर्वच भूमिका भगवान पाचोरे यांनी करून पहिल्या. त्यांना चांगली दाद मिळाली. “तेव्हा गाढवसुद्धा राजा होऊ शकतो, ही बाब समजली” असे ते म्हणतात.

 

पहिली एकांकिका ‘स्वप्न गर्भाचा मृत्यू बसविली होती. त्याची परीक्षणे वृत्तपत्रात छापून आली होती. त्यात पाचोरे यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. हे सर्व अंक जपून ठेवले आहेत. नंतर त्यांनी सादरीकरण केल्यावर सुधारणा झाली आणि पारितोषिके मिळू लागल्यावर, टीकेचे रुपांतर स्तुतीत झाले. “सुधारण्याची तयारी आणि इच्छाशक्ती यासाठी कारणीभूत आहे.” असे पाचोरे म्हणाले. नाटकात काम करीत असताना, इ-टीव्हीवरील तेव्हा गाजत असलेल्या ‘क्राईम डायरी’ मध्ये काम मिळाले. सुमारे १०० भागात पाचोरे यांनी काम केले आहे. प्रामुख्याने खलनायकी, दुर्जनांच्या भूमिका त्यांनी केल्या. त्यातून चांगला अनुभव मिळाला. त्यानंतर झी टीव्हीने घेतलेल्या ‘हास्य सम्राट’ स्पर्धेत त्यांनी सेमी फायनल फेरीपर्यंत मजल मारली. त्यांच्या नावाचा चांगला बोलबाला सुरु झाला. हा एक महत्त्वाचा टप्पा मानता येईल. हे करीत असताना, त्यांचे चौफेर निरीक्षण सदैव सुरु होते. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, सजावट, मेक-अप, कॅमेरा अशा विविध बाबींचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर स्वतः चित्रपट निर्माण करण्याचा ध्यास घेतला. छोटे चित्रपट, लघुपट बनविले. ‘लिंबू’ या ३० मिनिटांच्या लघुपटाला पारितोषिक मिळाले आणि पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे दिग्दर्शक बनायचे, असे त्यांनी ठरविले. त्यासाठी मुंबई वाऱ्या सुरु झाल्या. रात्री बाजार समितीत काम करायचे आणि दिवसा मुंबईत जायचे, पुन्हा परत यायचे अशी ड्युटी करायची. असे कष्ट त्यांनी घेतले. ते फळाला आले आणि त्याचा परिपाक म्हणजे ‘गोट्या’ चित्रपट. याचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. प्रमुख्याने सर्व नाशिकचे कलाकार, नाशिक परिसरात चित्रीकरण असले, तरी संगीत अवधूत गुप्ते, राजेश शृंगारपुरे , कमलाकर सातपुते यांच्यासारख्या कलाकारांना त्यांनी घेतले आहे.

 

भगवान वसंतराव पाचोरे यांची श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि जीवनात भेटलेली चांगली माणसे त्यांना चांगल्या वळणावर येऊन गेली आहेत. साधा झोपडपट्टीत राहणारा ‘भगवान्या’ आता चक्क चित्रपट दिग्दर्शक बनला आहे. ही साधी गोष्ट नाही. आज भगवान पाचोरे यांचे वय आहे अवघे ४० वर्षे. शिक्षण बी. कॉम झालेले आहे. अजून त्यांना खूप काही करायचे आहे. त्यांच्याकडे पाच सिनेमे लिहून तयार आहेत. नाशिकचेच सी. ए. व हॉटेल व्यवसायात असलेले केतनभाई सोमय्या यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावताना, आपण नाशिकचे असल्याने नाशिकच्याच कलाकारांना उत्तेजन द्यायचे, असा विचार केला. त्यातून पाचोरे यांचा ‘गोट्या’ चित्रपट निर्माण झाला आहे. प्रचंड परिश्रम घेऊन त्यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाला चांगले यश मिळेल, असा आत्मविश्वास त्यांना आहे. पुढील काळात देखील केतन सोमय्या यांना साथ देण्याचा त्यांचा मनोदय आहे. दोघांच्या सहकार्यातून चांगले चित्रपट मराठीला मिळतील, अशी अपेक्षा त्यातून निर्माण झालेली आहे.

 

- पद्माकर देशपांडे