परंपरांसाठी माणूस?
महा एमटीबी   29-Jul-2018
 

या पार्श्‍वभूमीवर कन्फेशन या धर्मपंरपरेवर चर्चा करणे, त्याची तर्कसंगत चिकित्सा करणे यापेक्षा आमच्या धर्मश्रद्धेवर बोलणारे तुम्ही कोण? आमच्या प्रथा बदलून आमच्या धर्मात ढवळाढवळ करणारे तुम्ही कोण? असा सवाल लागलीच त्या त्या धर्माचे ठेकेदार विचारतात.

 

काळानुरूप कितीतरी श्रद्धा, संकल्पना बदलल्या, बदलाव्या लागल्या. केंद्रीय महिला आयोगाने सर्वेक्षण, संशोधन करून सरकारकडे असे निष्कर्ष आणि सूचना दिल्या आहेत की, चर्चमधले कन्फेशन बंद व्हावे. सामान्य माणूस आपण पाप केले, तर मृत्युनंतर आपण नरकात जाऊ या भितीत जगत असतो. पण ते पाप आपण देवाच्या दारात कबूल केले तर त्या पापापासून मुक्‍ती मिळेल, असे त्याला वाटते. ख्रिश्‍चन धर्मातल्या कन्फेशनमागची तीच ही श्रद्धा. आपल्याकडे असा अलिखित नियमच आहे की, प्रचलित सर्वच धर्मांतल्या श्रद्धांबाबत प्रश्‍न उपस्थित करू नयेत. (अर्थात हिंदू समाजाच्या इतिहासात आणि वर्तमानातही हिंदूंनी आपल्या अंतःप्रेरणेने तर कधी नाखुशीने श्रद्धांमध्ये बदल केलेच आहेत.)

 जणू काही जिथे परंपरांचा विचार होतो तिथे सगळे तर्क, विचार सद्सद्विवेकबुद्धी संपूनच जाते. तीच बाब कन्फेशन प्रथेचीही आहे. महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांच्या कन्फेशन प्रथेला बंदी घालावी, या सूचनेनंतरही असेच काहीसे झाले. ते अपेक्षितच होते. केरळचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोंस यांनी तर जाहीरही केले की, ”नरेंद्र मोदी सरकार लोकांच्या धार्मिक आस्थेत बिलकुल दखल देणार नाही.” अल्फोंसच्या विधानाचा उल्‍लेख इथे केला, कारण इंग्रज सरकार भारताच्या धार्मिक परंपरांमध्ये दखलअंदाजी करत नसे, कारण त्यांना लोकांचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता. मरू देत लोक आपल्या धर्माने, कर्माने, अशी त्यांची वृत्ती होती. त्यानंतरच्या काँग्रेस सरकारनेही हीच पद्धत कायम ठेवली. शहाबानो प्रकरण हे उत्तम उदाहरण म्हणू शकू. पण आज केंद्रात भाजप सरकार आहे, ट्रिपल तलाक मामला असो की मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश असो, नरेंद्र मोदी आणि सरकारने महिलांच्या मानवी अधिकाराला, तर्कसंगत मानवी जगण्यालाच सन्मानित केले आहे. त्यामुळे कन्फेशन प्रथेवरही योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईलच, पण तरीही प्रश्‍न उरतो की, परंपरांसाठी माणूस की माणसांसाठी परंपरा?

 

कन्फेशन आणि तर्कसुसंगतता

लीच्या कोरीनाल्डो इथे ११ वर्षाच्या मारियावर अलसान्ड्रो नावाचा प्रौढ इसम बलात्काराचा प्रयत्न करतो. ती त्याला प्रतिरोध करते. तेव्हा तो तिच्यावर चाकूने १४ वेळा हल्ला करतो. तिच्या मारेकर्‍याला पकडले जाते. इथे इस्पितळात पाद्री मारियाला येशूची कहाणी सांगतात की, येशू क्रूसावर गेला असता त्याने मारेकर्‍यांना माफ केले. मरणाच्या दारात अल्पवयीन, निष्पाप मारिया म्हणते, "मीसुद्धा अलसान्ड्रोला माफ करते आणि तो मला स्वर्गात भेटावा, अशी इच्छा करते.” ही गोष्ट १९०२ सालची. अलसान्ड्रोला २७ वर्षांचा कारावास होतो. पण मारियाच्या माफीमुळे तो बदलतो म्हणे, ती त्याला दृष्टांत देते. तो पुढे कन्फेशन करतो आणि धर्माची सेवा करतो. मारियाच्या माफीला आणि अलसान्ड्रोच्या चांगुलपणाच्या बदलाला त्याने केलेल्या कन्फेशनला चमत्काराचा दर्जा देऊन चर्चसंस्थेने १९५० साली मृत मारियाला संतपदाची उपाधी दिली.

 

मारिया गोरट्टीच्या कहाणीवर अनेक प्रश्‍न उपस्थित होतील. ती मरत असताना पाद्रीने तिच्या उशाशी बसून तिने तिच्या मारेकर्‍याला माफ करावे, यासाठी केलेली प्रार्थना, समुपदेश या सर्वांवर अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. निष्पाप बालिका म्हणून आणि माणूस म्हणूनही मारियाचे अस्तित्व, हक्‍क कुठेच अधोरेखित होत नाहीत. उलट तिच्यावर बलात्काराचा आसुरी प्रयत्न करणार्‍या, तिला मारणार्‍याला पुढे समाजात सन्मान द्यावा असेच वातावरण तयार केले गेले. हे सगळे आठवायचे कारण की, कन्फेशन प्रथा बंद करावी, या महिला आयोगाच्या सूचनेला आव्हाहन देत आताही चर्चसंस्था उभ्या राहिल्या आहेत. मारिया गोरेट्टीला चर्चसंस्थेने संत उपाधी का दिली? याचा मागोवा घेताना, चर्चसंस्था कन्फेशनबाबत किती आग्रही नव्हे, दुराग्रही असेल हे स्पष्ट होते. कन्फेशन ही प्रथा असेल तर देव सर्वत्र सर्वज्ञ आहे. भक्‍ताच्या वेदना देवाला न बोलताही समजतात, ही श्रद्धाही माणसाचीच आहे की. देवाच्या सर्वज्ञ आणि तारणहार दयाळू या संकल्पनेला आव्हान देणार्‍या कन्फेशन प्रथेचा तर्कावर आधारित विचार व्हायला हवा. हो, ही प्रथा हिंदू, मुस्लीम किंवा अन्य कोणत्याही समाजात असती तरी हेच म्हणणे असते की, प्रथांना तर्कसंगती हवी. त्यात कन्फेशन प्रथाही आलीच.